पुणे-पंढरपूर मार्गावरील सासवड आणि जेजुरीदरम्यान शिवरी या गावात मुख्य मार्गाला लागूनच यमाई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. आदिमाया, आदिशक्ती अशी यमाई देवी ही नवसाला पावणारी म्हणून तिची संपूर्ण तालुक्यात ख्याती आहे. आळंदीहून निघणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी माऊलींच्या पादुका या मंदिरात येतात. केवळ निराघाट आणि शिवरी येथील या मंदिरात पालखीतील माऊलींच्या पादुका आणल्या जातात.
पुरंदर तालुक्यातील शिवरी हे प्राचीन गाव. या गावातील यमाई देवीचे मंदिर हे नेमके कधी बांधले गेले याचा निश्चित असा उल्लेख नसला तरी त्याच्या बांधणीवरून ते फार पुरातन असावे, असे वाटते. आळंदी ते पंढरपूर मार्गावर सुरू झालेल्या पालखी सोहळ्याच्या आधीपासूनच हे मंदिर असल्याच्या नोंदी संत साहित्यात आढळतात. सध्या असलेल्या पुजाऱ्यांची सातवी पिढी येथील देवीच्या सेवेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेजुरी येथील खंडोबा व यवतमधील भुलेश्वर मंदिरात दर्शनाला येत तेव्हा या देवीचेही आवर्जून दर्शन घेत, असे सांगितले जाते.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी, की शेतकऱ्याची एक गाय या ठिकाणी असलेल्या वारुळावर पान्हा सोडत होती. अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार लक्षात आल्यावर शेतकऱ्याने या वारुळावरून नांगर फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देवीची ही तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. अजूनही देवीला नांगराचा फाळ लागल्याची खूण असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीच्या खाली जिवंत पाण्याचा झरा असून बाराही महिने तो वाहत असतो. वर्षभरात या पाण्याची पातळी कमी जास्त होत नाही. हे पाणी अंगाला लावल्यास त्वचारोग बरे होतात, अशी पंचक्रोशीतील नागरिकांची श्रद्धा आहे.
यमाई देवीचे हे मंदिर प्रशस्त आहे. रस्त्याला लागून मंदिरासमोर एक पार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरपूरला येताना या पारावर विश्रांती घेतली होती, असे सांगितले जाते. या पारावरच मोठ्या वृक्षाबरोबर दगडी शिळा व सतीशिळा आहेत. येथेच अनेक पूजा साहित्याची दुकाने आहेत. एका तटबंदीयुक्त भव्य प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश करावा लागतो. संपूर्ण दगडी बांधकामातील हे मंदिर सभागृह व गाभारा अशा स्वरूपात आहे. सभागृहात तीन कमानी आहेत. गाभाऱ्याच्या दाराजवळील देवडीमध्ये डाव्या बाजूला नागदेवता व उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे.
गाभाऱ्यात वारुळाखाली सापडलेल्या मूळ मूर्तीसोबतच चांदीच्या मखरामध्ये रेड्यावर स्वार झालेली अष्टभूजाधारी यमाई देवी स्थानापन्न आहे. देवीच्या आठ हातांत विविध शस्त्रे आहेत. डोक्यावर शिवलिंग तर पायात नवग्रहांचे पैंजण कोरलेले दिसतात. ही देवी पार्वतीचे रूप समजले जाते.
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्यावेळी माऊलींच्या पादुका या मंदिरात आणल्या जातात. त्यानंतर येथे त्यांची पूजा केली जाते. आरती व महाप्रसादानंतर त्या पंढरपूरसाठी रवाना होतात. चैत्य वद्य अष्टमीला देवीची तीन दिवस यात्रा भरते. त्यावेळी त्यात हजारो भाविक सहभागी होतात. या यात्रेच्यावेळी शिंगणापूर देवस्थानाकडून या देवीला साडी- चोळीची कावडी येते. नवरात्रीच्या नऊ दिवसांसोबतच दर पौर्णिमेला देवीचा भंडारा असतो. यावेळी संपूर्ण गावाला महाप्रसादाचे वाटप होते.
दररोज सकाळी साडेपाच वाजता मंदिराची दारे खुली होतात. यावेळी देवीला जागे करण्यासाठी नगारा वाजविला जातो. याशिवाय तिन्हीसांजेच्या वेळीही नगारा वाजविला जातो. सकाळी ६.१५ वाजता आरती होते. रात्री ८.३० पर्यंत भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. दर मंगळवारी, शुक्रवारी व अमावस्येच्या दिवशी देवीला कन्हेरीच्या फुलांचा कौल लावला जातो. नवसाला पावणारी ही देवी असल्याने अनेक भाविकांकडून नवसपूर्तीनंतर देवीला पितळी समई अर्पण करण्याची पद्धत आहे.