पूर्णा, विद्रुपा आणि गौतमा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वांगेश्वर महादेव मंदिर वसले आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की सुमारे २५० वर्षे जुन्या असलेल्या या शिवालयातील शिवलिंग जागृत आहे. तसेच येथील त्रिवेणी संगमावर स्नान करून महादेवाचे दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. सोमवती अमावस्येला येथील संगमावर स्नान व दर्शन करण्यास विशेष धार्मिक महत्त्व आहे. असे सांगितले जाते की निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या मंदिरात येऊन शेगावचे गजानन महाराज ध्यानध्यारणा करीत असत.
हिंदू धर्म परंपरेमध्ये नद्यांना देवतेचा दर्जा दिलेला आहे. नदीसंगमास अत्यंत पवित्र मानण्यात आलेले आहे. तीन नद्यांचा संगम म्हणजेच त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी होतो, त्या स्थानी स्नान केल्याने सर्व पापे धुवून जातात व जन्म-मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्रिवेणी संगमांमध्ये प्रयागराज येथील संगम सर्वात मोक्षदायी मानला जातो. वांगेश्वर महादेवाचे मंदिरही त्रिवेणी संगमावर स्थित आहे. यामुळे हे एक महत्त्वाचे तीर्थ मानले जाते. शेगावचे गजानन महाराजही येथील त्रिवेणी संगमावर स्नान करून वांगेश्वर महादेवाचे दर्शन घेत.
विदर्भातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील शिवलिंग मनोकामनांची पूर्ती करणारे असल्याचे सांगण्यात येते.
अशी अख्यायिका आहे की वांगेश्वर महादेवामुळेच या गावास वांगरगाव असे नाव मिळाले आहे. वांगरगाव येथील हे प्राचीन मंदिर केव्हापासून येथे आहे, याबाबतची ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र अडीचशे वर्षांपासून हे शिवालय येथे असल्याचे बोलले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार १९६९मध्ये करण्यात आला. त्यानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. गावातील मंदिराच्या कमानीपासून हे मंदिर सुमारे एक किमी अंतरावर स्थित आहे.
त्रिवेणी संगमावर असलेला हा परिसर प्रसन्न भासतो. सुमारे २५ पायऱ्या चढून उंचावर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कठडे व वरील बाजूला पाच कळस आहेत. पेव्हरब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात मध्यभागी वांगेश्वर महादेवाचे मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. बंदिस्त सभामंडपातील एका देवकोष्टकात गजानन महाराजांची प्रतिमा आहे. गर्भगृहात मध्यभागी मोठ्या शाळुंकेमध्ये असलेल्या उत्तरमुखी शिवलिंगावर नागाने छत्र धरलेले आहे. शिवलिंगाभोवती पत्र्याचे आवरण आहे. पिंडीच्या पूर्वेला नंदी विराजमान आहे. गर्भगृहातील देवकोष्टकांमध्ये पार्वतीमाता तसेच गणेशाचे स्थान आहे. गर्भगृहाला मागील बाजूलाही एक प्रवेशद्वार आहे. साधे बांधकाम असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहावर घुमटाकार आकाराचे मोठे शिखर आहे. शिखराजवळ जाण्यासाठी मंदिराच्या मागील बाजूने पायऱ्या आहेत.
या मंदिराच्या प्रांगणात असलेल्या मंडपात कालसर्पयोग, पितृदोष शांती केली जाते. येथे नारायण नागबळी पूजाही केली जाते. मंदिर परिसरात भवानीमातेचे छोटे मंदिर असून येथे यज्ञकुंडही आहे. या मंदिराच्या परिसरात वटवृक्षासह अनेक झाडे आहेत. भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी येथे वीस खोल्या असलेले भक्तिनिवास तसेच मोठे भोजनगृहही आहे. येथील गोशाळेत शेकडो गोमातांची सेवा केली जाते.
येथील महादेव कोणालाही रिक्त हस्ते माघारी पाठवत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी विदर्भासह राज्याच्या विविध भागांतील भाविक येतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी अनेक भाविक येथील शिवलिंगावर अभिषेक करतात. महाशिवरात्रीनिमित्त येथे भरणाऱ्या यात्रेदरम्यान असंख्य भाविक ‘हर हर महादेव’चा जयघोष करत येथील शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून अभिषेक करतात. या उत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भाविकांना यावेळी महाप्रसादाचेही वाटप करण्यात येते. ग्रहणकाळातही शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात.