व्याघ्रेश्वर मंदिर

पाचगणी, ता. पेण, जि. रायगड

दास डोंगरी राहतो।साता समुद्रा वाहतो।

घोंगावून लक्ष वारे। दुर्ग दुर्ग हादरतो।। 

या बा. . बोरकरांच्या कवितेतील वर्णन अक्षरशः लागू पडावे, असे एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर पेण तालुक्यातील महालमिरा डोंगरावरील पाचगणी गावाजवळ आहे. पेण शहरातील चावडी नाका परिसरातून एक रस्ता पाचगणीकडे जातो. बोरगावमार्गे विराणी, धनगरमाळ, आसाणी अशी एक एक गावे मागे टाकत पाचगणीला पोहचल्यावर लक्षात येते की या गावाचे फक्त नावच नव्हे, तर निसर्गही त्या (महाबळेश्वरजवळच्या) पाचगणीशी नाते सांगणारे आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या दुर्गम भागात स्थित असलेल्या या मंदिरास भेट देण्यासाठी अनेक भाविक पर्यटक येथे येतात. मंदिर परिसरात बारमाही वाहणारा झरा आहे. त्याची धार गोमुखातून येते. जवळूनच वाहणारा एक धबधबाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही आपल्या काही पुस्तकांत या स्थानाचा उल्लेख केलेला आहे. मंदिराचे हेमाडपंती स्थापत्यशैलीतील जांभ्या दगडातील बांधकाम असलेले गर्भगृह, येथील प्राचीन मूर्ती वीरगळ पाहता हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. परंतू याबाबत कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही.

पेण, चावडी नाका येथून बोरगाव, विराणी, धनगरमाळ, असाणी या गर्द वनराईने व्यापलेल्या डोंगर चढाच्या रस्त्याने पाचगणी गावात पोहोचल्यावर लक्षात येते की आपण समुद्रसपाटीपासून बरेच उंचावर आलो आहोत. पाचगणी गावाजवळून व्याघ्रेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. गर्द वनराईचे दर्शन घडवत जाणाऱ्या या छोट्या रस्त्याने थेट मंदिरापर्यंत जाता येते. या रस्त्याने उन्हाळ्यात खाजगी वाहनाने मंदिरापर्यंत पोहोचणे शक्य असले तरी पावसाळ्यात मात्र पायीच यावे लागते.

डोंगराच्या माथ्यावर असलेल्या या मंदिराच्या डाव्या बाजूला गोमुख कुंड आहे. येथे गोमुखातून पडणाऱ्या वाहत्या पाण्याचा अखंड स्रोत आहे. येथील कुंडातील पाण्याने शुचिर्भूत होऊन दर्शनास जाण्याची प्रथा आहे. कुंडातील पाण्याचा वापर पिण्यासाठी देवाच्या अभिषेकासाठी केला जातो. कुंडापासून मंदिरापर्यंत घडीव दगडात बांधलेल्या पायऱ्या आहेत. मंदिराच्या आवारभिंतीच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ एक प्राचीन दीपस्तंभ आहे. तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या फरसबंदी असलेल्या प्रांगणात मंदिरासमोर तुलसी वृंदावन आहे. प्रांगणात लोखंडी स्तंभांवर सिमेंट पत्र्यांचे छत आहे. मंदिरासमोर डाव्या बाजूच्या चौथऱ्यावर वीरगळ, काही प्राचीन मूर्ती, पाषाणी पादुका शिलालेख आहेत.

सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरांच्या सभामंडपास लाकडी प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पर्ण पुष्पलता नक्षी आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात (गूढमंडप) प्रकाश हवा येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात मध्यभागी षटकोनी लाकडी मखर आहे. या मखरास महिरपी कमानीने जोडलेले सहा गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभांवर शिखर कळस आहे. मखरात मध्यभागी शेंदूरचर्चित खांबलिंग इतर देवतांची पाषणे आहेत. मखरापुढे चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. नंदीच्या गळ्यात कोरलेल्या घुंगरमाळा गोंडे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नंदीच्या पुढील पायांच्या मध्यभागी ध्यानस्थ मुनीची मूर्ती आहे.

पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळात दोन नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. पाषाणी स्तंभपाद काहीसे रूंद असून स्तंभांच्या शीर्षभागी कणी त्यावर तुळई आहेत. तुळईवरील लाकडी रचनेवर कौलारू छत तोलून धरले आहे. तुळईना पितळी घंटा टांगलेल्या आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीस लागून प्राचीन शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणेशाच्या दोन मूर्ती एक गौरीहर मूर्ती आहे. डाव्या बाजूला एक चतुर्भुज भैरव एक विष्णू मूर्ती आणि त्यासमोर शिवपिंडी आहे.

हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेल्या गर्भगृहाच्या द्वारशाखांवर खालील बाजूस कमळ फुलांची नक्षी वर वेलबुट्टी नक्षी आहे. स्तंभशाखांवर उभ्या धारेची नक्षी आणि ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. अंतराळाच्या कौलारू छताखाली असलेल्या गर्भगृहाच्या छतावरील शिखराची रचना पिरॅमिडसारखी आहे. अंतराळापेक्षा खोलवर असलेल्या गर्भगृहात चार पायऱ्या उतरून यावे लागते. गर्भगृहाच्या सर्व भिंती शेंदूरचर्चित आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी त्यावर छत्र धरलेला तांब्याचा नाग आहे. उत्सवादरम्यान या पिंडीवर चांदीचा मुखवटा ठेवला जातो. गर्भगृहाच्या मागील भिंतीत एक अरूंद दरवाजा आहे. दर्शन झाल्यावर या दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रघात आहे. मंदिराच्या प्रांगणात तटबंदीला लागून अर्धखुल्या स्वरूपाचे बांधकाम असलेले दालन आहे. त्याचा वापर येथे येणाऱ्या भाविकांच्या विश्रांती भोजन व्यवस्थेसाठी केला जातो.

महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी मंदिरात लघूरूद्र, महाअभिषेक, भजन, किर्तन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रायगडसह मुंबई पुण्यातील भाविकही येथे दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी यावेळी येतात. या यात्रेत विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. डोंगर माथ्यावर दुर्गम भागातील या मंदिराच्या यात्रोत्सवात विविध वस्तूंच्या खरेदीविक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. नवरात्री होळी आदी वार्षिक उत्सवही येथे साजरे केले जातात.

मंदिरात श्रावणी सोमवार, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मंदिरापासून जवळच असलेल्या व्याघ्रेश्वर धबधब्यावर येणारे पर्यटकही या मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येतात. महालमिरा डोंगर कास माळ परीसर पर्यटकांचे खास आकर्षण असल्याने मंदिर परीसरात कायम वर्दळ असते

उपयुक्त माहिती

  • पेणपासून १५ किमी, तर पनवेलपासून ४८ किमी अंतरावर
  • पेण येथून पाचगणीसाठी एसटी रिक्षांची सुविधा
  • खासगी वाहने उन्हाळ्यात मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर ट्रस्टी, मो. ८९८३७७१६१७, ९९६०४४७५४५
Back To Home