अलिबाग शहराला लागून असलेल्या वरसोली येथे विठ्ठल-रखुमाईचे सुंदर व मोठे मंदिर आहे. ‘प्रति पंढरपूर’ म्हणून या क्षेत्राची ख्याती आहे. हे मंदिर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पुतणे राघोजी आंग्रे यांनी बांधले होते. १७७८ साली त्यांची पत्नी नर्मदाबाई आंग्रे यांनी विठ्ठल, रुक्मिणी व गरुड या तीन मूर्तींची येथे स्थापना केली. तसेच आषाढी व कार्तिकी एकादशी असे दोन उत्सव सुरू केले. हे उत्सव आजही येथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यावेळी तालुक्यातील अनेक गावांतून वारकरी दिंड्या येथे येतात. त्यावेळी टाळ-मृदुंगाच्या गजरात हा संपूर्ण परिसर दुमदुमून जातो.
नैऋत्य मोसमी वारे कोकणात दाखल झाले की कोर्लई किल्ल्याच्या डोंगरामुळे ढग अडतात. त्यामुळे किल्ल्याच्या नैऋत्य दिशेला असलेल्या या गावात आसपासच्या परिसराच्या तुलनेत जास्त पाऊस होतो. त्यामुळे या गावाचे नावच वर्षाग्राम, म्हणजे पावसाचे गाव असे पडले. कालांतराने त्याचा अपभ्रंश झाला आणि त्याला वरसोली म्हणून ओळख मिळाली. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या घराण्याने हे मंदिर बांधले. राघोजी आणि नर्मदाबाई हे दरवर्षी नित्यनेमाने या मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत असत. सुरुवातीला हे मंदिर लाकडी खांब आणि दगडी बांधकाम असलेले होते. २००८ साली वरसोली ग्रामपंचायतीने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर येथे नवे मंदिर उभे राहिले.
वरसोली गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिरासमोर मोठे प्रांगण आहे. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे दीपमाळ आणि त्याशेजारी चौथऱ्यावर मोठे तुळशीवृंदावन आहे. मुख्य मंदिरासमोर एक मध्यम आकाराचे गरुड मंदिर आहे. त्यात गरुडाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती व मंदिरावर नक्षीदार शिखर आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील लाकडी द्वारशाखेवर आकर्षक नक्षीकाम आहे. बंदिस्त सभामंडपात हवा व प्रकाशासाठी मोठ्या खिडक्या आहेत.
सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर सज्जा आहे. उत्सवप्रसंगी भाविकांना येथे बसता येते. अंतराळात डावीकडे गरुडखांब, पालखीकक्ष व शयनकक्ष आहेत. गरुडखांबावर हनुमंताची धातूमध्ये घडविलेली मूर्ती आहे. २४ फेब्रुवारी १७८९ रोजी काढलेले जुन्या मंदिराचे छायाचित्र येथील भिंतीवर लावलेले आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार सुबक नक्षीकाम केलेल्या चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. ललाटबिंबावर नृत्यगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृहात उंच वज्रपिठावर काळ्या पाषाणातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. नर्मदाबाई आंग्रे यांनी स्थापिलेल्या मूर्तींची झीज झाल्यामुळे २००८ साली मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी पंढरपूरहून नव्या मूर्ती आणून त्यांची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरातील मूळ मूर्ती सभामंडपात काचेच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत.
मंदिररचनेप्रमाणेच त्याचा परिसरही प्रेक्षणीय भासतो. तेथे एक जुना वटवृक्ष असून त्याला चौकोनी पार बांधण्यात आलेला आहे. देवस्थानाने विकसित केलेल्या देवराईमध्ये नवग्रहांचे वृक्ष, राशींचे वृक्ष, पंचवटी वाटिका वृक्ष, नक्षत्रांचे अराध्य वृक्ष आणि गणपतीच्या पूजेला लागणाऱ्या २१ पत्रींच्या वनस्पतींची लागवड केलेली आहे. हे वृक्ष व वनस्पती दुर्मिळ आणि आयुर्वेदामध्ये महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. मंदिराबाहेर असलेल्या प्रदक्षिणा मार्गावर हे वृक्ष पाहता येतात. त्यांची सविस्तर माहिती देणारा फलक मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेला आहे.
प्रत्येक एकादशीला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी स्थानिकांकडून येथे छोटेखानी बाजार भरविला जातो. पंढरपूरप्रमाणेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीला दशमी, एकादशी आणि द्वादशी असा तीन दिवस उत्सव चालतो. या काळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन होते. एकादशीला काकड आरती, विठ्ठल-रखुमाईची महापूजा, महानैवेद्य असा सोहळा रंगतो. द्वादशीला दहिकाल्याच्या किर्तनाने उत्सवाची सांगता होते. याखेरीज कार्तिक वद्य एकादशीपासून अमावास्येपर्यंत पाच दिवस येथे जत्रा असते. ही जत्रा सुरू होण्यामागची एक कथा शां. वि. आवळस्कर लिखित ‘आंग्रेकालीन अष्टागर’ या ग्रंथात विषद केलेली आहे. १८४० साली मंदिराच्या रंगरंगोटीचे काम सुरू होते. कळसाला रंगकाम केले जात असताना एक रंगारी खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी आंग्रे यांच्या हत्तीखान्याला मोठी आग लागली व त्यात प्रचंड हानी झाली. या घटनांचे विस्मरण व्हावे आणि पुन्हा वातावरण पवित्र व्हावे, यासाठी ही जत्रा भरविली जाऊ लागली. मंदिर देवस्थान आणि वरसोलीच्या ग्रामस्थांनी जत्रेची परंपरा अखंड सुरू ठेवलेली आहे. प्रत्येक एकादशीला गावात विठ्ठलाची पालखी निघते. याप्रसंगी शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात.