विठ्ठल मंदिर

कसबा पेठ, माढा, ता. माढा, जि. सोलापूर

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत पंढरपूरचा पांडुरंग आपले मंदिर सोडून कधी कधी मोहोळ प्रांतातील देगाव व इतर भागात जात असे. परकीय आक्रमणे व मंदिरावरील गंडांतर थांबले म्हणजे तो परतही येत असे. या सर्व गडबडीत आज पांडुरंगाची मूळ मूर्ती कुठे आहे याबाबत अनेक अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक ग. ह. खरे यांना पंढरपुरातील विठ्ठल मूर्ती ही मूळ मूर्ती नसावी, असे वाटते. तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे मात्र या संशोधकांचे दावे ताकतीने परतवतात. इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या म्हणण्यानुसार विठ्ठलाची मूळ मूर्ती माढा येथील विठ्ठल मंदिरात आहे. हरिभक्तांची पंढरपूर इतकीच श्रद्धा माढा येथील पांडुरंगावर आहे व तो हाकेला धावून येतो, असा त्यांना विश्वास आहे.
असे सांगितले जाते की जहागिरदार रंभाजी उर्फ रावरंभा निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांनी सन १७३० ते १७६० दरम्यान माढा येथील विठ्ठल मंदिर बांधले. मात्र इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांचा असा दावा आहे की सन १६५९ साली अफजल खानाच्या आक्रमणाच्या वेळी पंढरपूर येथील मूर्ती माढा येथे निंबाळकर यांच्या जहागिरीत हलवण्यात आली होती. माढा येथील विठ्ठल मंदिरातील मूर्तीवरील खाणाखुणा दाखवून हीच विठ्ठलाची मूळ मूर्ती असल्याचा दावा श्री. ढेरे करतात. मात्र ढेरे यांचा मूळ
मूर्तीबाबतचा दावा चुकीचा असल्याचे डॉ. सदानंद मोरे यांचे म्हणणे आहे. मंदिरात असलेल्या शिलालेखावरून हे मंदिर कमीतकमी ३०० वर्षे प्राचीन असल्याचे सिद्ध होत आहे. मूर्तीच्या प्राचीनत्वाबाबत अथवा हीच पंढरपूर येथील मूळ मूर्ती असण्याबाबत तज्ञांचे एकमत दिसत नाही.
जागतिक स्तरावर प्रसिद्ध व अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापिठांपैकी एक असलेल्या एरिझोना राज्यातील एरीझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका एने फेल्डहाऊस या विठ्ठल मूर्तीवर संशोधन करण्यासाठी भारतात आल्या होत्या. त्यांनी रा. चिं. ढेरे यांच्या ‘विठ्ठल एक महासमन्वय’ या ग्रंथाचे ‘Rise of a Folk God: Vitthal of Pandharpur’ असे इंग्रजीत भाषांतर करून २०१२ मध्ये ते प्रकाशित केले. एने यांनी ‘In search of original image of Vitthal’ या त्यांच्या शोधग्रंथात येथील विठ्ठलमूर्ती व मंदिराची जुनी छायाचित्रेही प्रकाशित केली होती.
हे मंदिर गावातील कसबा पेठेत रस्त्यालगत आहे. रांगमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. रांगमंडप नव्याने उभारण्यात आलेला आहे. या रांगमंडपात लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत आहे. त्यापुढे हेमाडपंती स्थापत्यरचनेचा दगडी बांधकाम असलेला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कक्षासने आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. मध्यभागी असलेल्या चार स्तंभांपैकी तीन स्तंभांच्या स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर फणाधारी नागशिल्पे आहेत व या नागांनी छताचा भार आपल्या मस्तकी तोलला असल्याचे शिल्पातून निर्देशित होते. चार स्तंभांच्या मधील वितान अष्टकोनी आहे. या चार स्तंभांपैकी पुढील डाव्या कोपऱ्यातील स्तंभावर गरूडशिल्प कोरलेले असल्याने त्यास गरुडस्तंभ म्हणून संबोधले जाते. या स्तंभास पितळी आच्छादन केलेले आहे व आच्छादनावर स्तंभावरील मूळ नक्षी साकारली आहे.
सभामंडपातील मध्यभागी असलेले चार स्तंभ सोडून इतर स्तंभांवर तुलनेने नक्षीकाम कमी आहे. सभामंडपातील जमीन पाषाणी फरसबंदी केलेली आहे. सभामंडपात मधल्या चार स्तंभांच्या मधील जागेत सुमारे एक फूट आकाराची वर्तुळाकार शिळा आहे व त्यावर मध्यभागी चक्र कोरलेले आहे. सभामंडपापुढे अंतराळ व अंतराळात जमिनीवरील पाषाणात कोरलेले कासव शिल्प आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखानुसार महादजी निंबाळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले आहे.
अंतराळाच्या उजवीकडे रुख्मिणी देवीचे लहानसे गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा सपाट व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात भिंतीतील देवकोष्टकात रुख्मिणी देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या गर्भगृहाचे छत भिंतींवर आहे व येथील वितान अष्टकोनी आहे. अंतराळाच्या डावीकडे श्रीविष्णूचे गर्भगृह आहे. या गर्भगृहाची रचना रुक्मिणीच्या गर्भगृहासारखीच आहे. पाषाणी वज्रपिठावर विष्णूची संगमरवरी चतुर्भुज मूर्ती आहे. देवाच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. विष्णू मूर्तीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या वज्रपिठावर काळ्या पाषाणातील गणपतीच्या दोन मूर्ती व एक शिवपिंडी आहे.
अंतराळातून पुढे मुख्यगर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार पंचद्वारशाखांनी सुशोभीत आहे. त्यात वेलबुट्टीशाखा, पर्णशाखा, पुष्पशाखा, स्तंभशाखा समाविष्ट आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व ललाटपट्टीवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. त्यावरील तोरणात पुष्पनक्षी व मंडारकास चंद्रशिळा आहे. गर्भगृहात वज्रपिठावर विठ्ठलाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मूर्तीच्या वक्षस्थळी कुटमंत्र लिहिलेला आहे. मूर्तीच्या हृदयस्थानी पिंपळपत्र कोरलेले आहे. मूर्ती दिगंबर अवस्थेत आहे. कमरेला कटीदोरा, गळ्यात माळ, पायात तोडे व मनगटात वाळे आहेत. देवाच्या एका हातात काठी व दुसऱ्या हातात शंख आहे. मस्तकावर शिवपिंडी आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीत सूर्य, चंद्र, पंचफणी नाग, पर्ण, पुष्प आदी नक्षीकाम आहे. ही सर्व लक्षणे सावता माळी यांच्या अभंगात वर्णित असल्याने हीच विठ्ठलाची मूळ मूर्ती असल्याचा दावा रा. चिं. ढेरे यांनी केला होता.
गर्भगृहाच्या छतावर नव्याने उभारण्यात आलेले चार थरांचे चौकोनी शिखर आहे. प्रत्येक थरात चारही दिशांना प्रत्येकी एक देवकोष्टक आहे. शिखराच्या चौथ्या थरात चारही कोनांवर चार लघुशिखरे व त्यावर आमलक आहेत. घुमटाकार मुख्य शिखरावर कळस आहे.
आषाढी व कार्तिकी एकादशी हे येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यानिमित्ताने देवाच्या पादुका बैल गाडीत ठेवून ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळीत ग्रामप्रदक्षिणेला नेल्या जातात. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येऊन ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकीत सहभागी होतात. यानिमित्ताने मंदिरात महाअभिषेक भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वर्षभरातील सर्व एकादशी सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. दररोज पहाटे ५.३० वाजल्यापासून रात्री ८.३० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात विठोबारायाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • माढा बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • सोलापूर जिल्ह्यातील अनेक शहरांतून माढा येथे येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : पुजारी, मो. ९९७०९५९८१०
Back To Home