विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

विष्णूच्या चोवीस अवतरांहून भिन्न म्हणून ज्यास संतांनी ‘चोविसांवेगळा’ म्हटलेले आहे, त्या ‘बापरखुमादेवीवरू’ विठ्ठलाची राजधानी म्हणजे पंढरपूर. महाराष्ट्राच्या धर्मसंस्कृतीचे मुख्य केंद्र आणि येथील भक्तीपरंपरेचे चिरंतन स्फूर्तीस्थान म्हणजे पंढरपूर. अठ्ठावीस युगांपासून कटेवर हात ठेवून ही विठोबा माऊली येथे उभी आहे. विठोबाच्या या स्थानामुळेच या क्षेत्रास भूलोकीचे वैकुंठ असे म्हणतात. संत नामदेव महाराजांनी तर ‘आधी रचली पंढरी। मग वैकुंठ नगरी’ अशा शब्दांत या स्थानाचा महिमा गायलेला आहे. येथील विठ्ठल मंदिरावरूनच भागवत संप्रदायाची पताका डौलाने फडकत आहे.

विठ्ठल आणि पंढरपूर यांचे माहात्म्य सांगणारी तीन स्थलपुराणे आहेत. त्यातील एक पांडुरंगमाहात्म्य स्कंदपुराणात, दुसरे पद्मपुराणात, तर तिसरे विष्णुपुराणात आहे. यातील स्कंद पांडुरंगमाहात्म्य हे हेमाद्रीपंडिताच्या पूर्वीचे म्हणजे संत ज्ञानोबांच्या उदयापूर्वीचे आहे. पांडुरंगमाहात्म्यात या क्षेत्राचा उल्लेख पांडुरंगक्षेत्र, पुंडरीकक्षेत्र अथवा पौंडरीकक्षेत्र या नावांनी केलेला आहे, तर विविध शिलालेखांत पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरी, पांडरीपूर अशी क्षेत्रनामे आलेली आहेत. होयसळवंशीय वीर सोमेश्वर यादव याच्या शिलालेखात कन्नड व संस्कृत अशा दोन्ही भाषांमध्ये पंढरपूरचा उल्लेख पंडरगे असा आहे. हे या क्षेत्राचे मूळ नाव असल्याचे रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या प्रख्यात संशोधकांचे मत आहे. स्कंदपुराणातील पांडुरंगमाहात्म्यात येथील मंदिराचा उल्लेख आहे आणि हे क्षेत्र अर्धयोजन लांब व एक कोस रुंदी आहे, असे म्हटलेले आहे.

‘भारतीय संस्कृती कोशा’च्या पाचव्या खंडानुसार, पंढरपूरचा पहिला उल्लेख इ.स. ५१५च्या राष्ट्रकूट राजा अविधेय याच्या ताम्रपटात ‘पांडरंगपल्ली’ या नावाने आहे. येथील विठ्ठल मंदिराची स्थापना व पूजन कधी सुरू झाले याची ठोस माहिती अनुपलब्ध आहे. मात्र शिलालेखीय व वाङ्मयीन पुराव्यांच्या आधारे या स्थानाची व मंदिराची प्राचीनता सहाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जाते. विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारासमोरील ‘बायकांची बारी’ या नावाने परिचित असलेल्या भागात ‘पंढरपूर शिलालेख, विठ्ठलदेव’ या नावाने ओळखला जाणारा शिलालेख सापडला आहे. मुंबईच्या ‘डायरेक्टर ऑफ अर्काईव्हज्’ कार्यालयामध्ये सध्या हा शिलालेख आहे. त्यात ‘सौम्य संवत्सर, शालिवाहन शके ११११’ (इ.स. ११८९) अशी वर्ष व तिथी नोंदवलेली आहे. ‘समस्त चक्रवर्ती यादव भिल्लम राज्य करीत असताना महाजन, देव परिवार व मुद्रहस्त विठ्ठलदेव नायक या सर्वांनी हे लहान देऊळ बांधले’, असे त्यात नमूद केलेले आहे. तसेच जो कोणी मंदिराला पीडा देईल त्याला विठ्ठलाची आण घातलेली आहे. गावाचा व देवाचा उल्लेख असलेला यानंतरचा शिलालेख इ.स. १२३७चा (शके ११५९) आहे. मंदिरातील सोळाखांबी मंडपात तो आहे. त्यात होयसळ यादव वीर सोमेश्वर याने विठ्ठलाच्या अंगभोगासाठी एक गाव दान केल्याचे म्हटलेले आहे. तर ‘चौऱ्यांशीचा शिलालेख’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिलालेखामध्ये मंदिरास देणग्या दिलेल्यांची नावे कोरलेली आहेत. ही यादी इ.स. १२७३ पासून १२७७ पर्यंतची आहे. त्यात यादव नृपती रामचंद्रदेव, हेमाद्रीपंडित यांचीही नावे आहेत. विशेष म्हणजे, मराठवाडा, कर्नाटक येथील व्यक्तींप्रमाणेच त्यात ‘कोंकणचा महुसुद’ असेही एक नाव आढळते. एकंदर, या मंदिराचा इतिहास असा सांगता येतो की ११८९मध्ये येथे लहान मंदिर बांधण्यात आले. १२३७मध्ये या मंदिरास होयसळ यादव राजा वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिले. १२७३ मध्ये यादव राजा रामचंद्रदेव व त्याचा करणाधिपती हेमाद्रीपंडित यांनी पुढाकार घेऊन देवळाची वाढ केली. इ.स. १३०३ पर्यंत हे मंदिर बऱ्यापैकी मोठे झाले होते. यानंतर अनेकदा या मंदिराचे नूतनीकरण, तसेच त्याच्यात वाढ करण्यात आली. मुस्लिम आक्रमकांच्या काळात, विशेषतः अफझलखानाच्या व नंतर औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी मंदिराला इजा पोचली होती. असे सांगितले जाते की १६, १७ आणि १८व्या शतकात या मंदिराचे वेगवेगळे बांधकाम झालेले आहे.

पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका उंच जागेवर हे मंदिर स्थित आहे. या भागाला पूर्वीपासून विठ्ठल टेकडी असे संबोधले जाते. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची पूर्व-पश्चिम लांबी ११७ मीटर व दक्षिणोत्तर रुंदी ५८ मीटर आहे. या मंदिराच्या पश्चिम भागाला गड असे म्हटले जाते. मंदिराला पूर्वेकडून नामदेव पायरी, पुरषांच्या बारीचा दरवाजा व तरटी दरवाजा असे तीन दरवाजे आहेत. याशिवाय दक्षिणेकडे दोन, पश्चिमेकडे एक आणि उत्तरेकडे तीन असे एकूण नऊ दरवाजे आहेत.
मंदिराच्या पूर्वद्वाराला महाद्वार अथवा नामदेव पायरी असे म्हटले जाते. या दरवाजाच्या पहिल्या पायरीला संत नामदेवांनी समाधी घेतली म्हणून संत नामदेवांची पायरी हे नाव पडले. ही पायरी पितळी पत्र्याने मढविलेली आहे. पायरीच्या उजवीकडे नामदेवांचा पितळी मुखवटा आहे. वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, याच ठिकाणी संत नामदेवांसह त्यांच्या कुटुंबातील १४ जणांची समाधी आहे. या पायरीनजीक संत चोखोबा यांचीही समाधी आहे. नामदेव पायरीपासून पाच पायऱ्या चढून प्रवेशमंडपात प्रवेश होतो. या मंडपात ३३ कोटी देवतांच्या मूर्ती आहेत, असे म्हटले जाते. प्रवेश मंडपाच्या पुढे गणेशमंडप आहे. पाच कमानींवर आधारलेल्या या मंडपाच्या दोन्ही बाजूला ओवऱ्या आहेत. यापैकी शेवटच्या एका ओवरीत मोठी गणेशमूर्ती आहे. गणेश मंडपाच्या वरच्या बाजूस नगारखाना आहे. येथील सर्व बांधकाम दगडी व मजबूत आहे.

गणेश मंडपातून पुढे मुख्य मंडपात प्रवेश होतो. यास सांस्कृतिक मंडप असेही म्हणतात. या मंडपाच्या वरील बाजूस सागवानी छत आहे. ४५ फूट उंचीच्या या मंडपात ३० फूट उंचीच्या दोन दीपमाळा आहेत. या मंडपात संत बोधलेबुवा, थोर कवी प्रल्हादबुवा बडवे व कान्होबा हरिदास यांच्या समाध्या आणि सात फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की या मारुती मूर्तीची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केली होती. दररोज पहाटे काकड आरतीच्या वेळी कान्होबा हरिदासांनी लिहिलेल्या आरतीचे येथे गायन होते. कान्होबा हरिदास यांचे वंशज पहाटेच्या पुजेच्या वेळी विठ्ठलासमोर गायनसेवा करतात आणि आषाढी व कार्तिकी एकादशीदिवशी विठ्ठल रथासमोर पंचपदी म्हणतात.

मुख्य मंडपातून खजिनामंडपात प्रवेश होतो. या मंडपाच्या मध्यभागी पेशव्यांनी दिलेली मोठी घंटा आहे. या युरोपियन बनावटीच्या घंटेवर ‘VENTVRAFES 1636’ असे कोरलेले आहे. खजिनामंडपाच्या डावीकडे अलंकारगृह आहे. अलंकारगृहाच्या पुढे सोळाखांबी मंडप आहे. हा मंडप सोळा दगडी खांबांवर उभा आहे. येथील खांबांवर महाभारतातील प्रसंग असणारी ६४ शिल्पे आहेत. याशिवाय गरुड, नाग, युद्ध करणारा राजा, व्यास, हत्ती, देवी, कमळ अशी अनेक शिल्पे आहेत. यापैकी काही शिल्पे पुसट व अस्पष्ट झालेली आहेत. या मंडपात संत तुकाराम महाराज आणि व्यास नारायण यांच्या प्रतिकात्मक समाध्या आहेत. या मंडपातील एक खांब चांदीच्या पत्र्याने मढविलेला आहे. भाविकांमध्ये तो ‘गरुडखांब’ म्हणून प्रसिद्ध आहे. याच खांबाजवळ बसून कर्नाटक येथील संत पुरंदरदास यांनी विठ्ठलभक्तीची स्त्रोत्रे गायली होती म्हणून यास ‘पुरंदरदास खांब’ असेही म्हणतात. शेणवी समाजातील श्रीमंत दौंडकर यांनी १८०२ मध्ये हा सोळाखांबी मंडप बांधल्याची नोंद आहे.

सोळाखांबी मंडपातून चौखांबी मंडपात प्रवेश होतो. या मंडपाच्या दरवाजाजवळ दोन हत्ती कोरलेले आहेत. त्यामुळे त्याला हत्ती दरवाजा असेही म्हणतात. मंदिराचे सर्व सेवाधारी या दरवाजातून प्रवेश करतात. तसेच पुजेचे साहित्य आणि महानेवैद्य याच दरवाजाने आणला जातो. भाविकांच्या महापुजेचा संकल्पही येथेच सोडला जातो. चौखांबी मंडपाच्या एका बाजूला देवाचे शेजघर आहे. शेजारतीच्या वेळी ते उघडले जाते. त्यात चांदीचा पलंग व पांढरीशुभ्र गादी आणि उशा आहेत. शेजारतीच्या वेळी शयनगृहात जाताना पायघड्या घालत (नमस्कार) जाण्याची पद्धत आहे.

चौखांबी मंडपापुढे लाकडी कठडा व त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. असे सांगितले जाते की पूर्वी हा दरवाजा अतिशय लहान होता. ३० एप्रिल १९५३ रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या सूचनेनुसार खालचा उंबरा काढून दरवाजाची चौकट रुंद करण्यात आली. त्यामुळे भाविकांची अडचण दूर झाली. या दरवाजातून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात तीन फूट उंचीचे चांदीचे नक्षीदार वज्रपीठ आहे. या वज्रपिठावर दोन्ही बाजूला दोन गाई कोरलेल्या आहेत. मध्यभागी कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची काळ्या पाषाणातील, साडेतीन फूट उंचीची, कटेवर कर असलेली सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीवर मूळ कोरीव अलंकार आहेत. त्यात डोक्यावर उंच टोपीसारखा मुकुट, कानात मकराकार कुंडले व गळ्यात कौस्तुभ मण्यांचा हार आहे. डाव्या आणि उजव्या छातीवर एक खळगी व वर्तुळखंड आहे. त्यास ‘श्रीवत्सलांछन’ व ‘श्रीनिकेतन’ असे म्हटले जाते. दोन्ही दंडांवर बाजुबंद आणि मणिबंद आहेत. विठ्ठलाच्या कमरेस तीन पदरी मेखला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सातारचे शाहू महाराज, पुण्याच्या पेशव्यांनी अनेकदा या विठ्ठलाला अनेक अलंकार अर्पण केले आहेत. हे अलंकार हिरे, मोती, माणीक व सुवर्ण स्वरूपात आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा, भाऊबीज, दसरा, नवरात्र, गोकुळ अष्टमी व रामनवमी या दिवसांत या दागिन्यांनी देवाला मढविले जाते. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला या विठ्ठलाच्या पायावर डोके ठेऊन दर्शन घेता येते. विशेष म्हणजे इ.स. १८७३ पर्यंत भक्तांना देवाच्या पायांस कवटाळता येत असे. इतिहासकार ग. ह. खरे यांच्या ‘श्रीविठ्ठल आणि पंढरपूर’ (१९५३) या पुस्तकात अशी हकीकत देण्यात आली आहे की १८७३ साली पांडुरंगाच्या दर्शनासाठी कोणी बैरागी आले होते. दर्शनाच्या वेळी त्यांनी देवाच्या पायांवर धोंडा टाकला. त्यामुळे मूर्ती दुखावली. त्यानंतर पायाला मागे ‘धीरा’ देण्यात आला. त्यामुळे आता फक्त पायांवर डोके ठेवता येते. कवटाळता येत नाही.

विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहावर असलेले शिखर हे तुलनेने साधेसे आहे. या त्रिस्तरीय शिखरावर आठ गोपुरे आहेत. पहिल्या स्तरावर हत्तीस्वार, घोडेस्वार व भजनात तल्लीन असलेले वारकरी यांची शिल्पे आहेत. त्यावरच्या स्तरात गणेश, शांकंबरी, नरसिंह, गरूड, मारुती, श्रीकृष्ण व गौळणी यांच्या मूर्ती व शिल्पे आहेत. याशिवाय संत तुकाराम, समर्थ रामदास व चैतन्य महाप्रभू यांच्या मूर्तीही शिखरावर आहेत. शिखराच्या शिर्षभागी सोन्याचा कळस आहे. या शिखराची जमिनीपासून कळसापर्यंतची उंची ४८ फूट आहे. हे मराठा स्थापत्यशैलीतील शिखर १८३० मध्ये भोर संस्थानतर्फे बांधण्यात आले आहे.

विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहाच्या मागील बाजूस रुक्मिणी मंदिराचा मोठा सभामंडप आहे. हा सभामंडप निजामाचा दिवाण चंदूलाल याने बांधल्याची नोंद आहे. या सभामंडपात अलिकडील काळात सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. रुक्मिणी स्वयंवरातील अनेक प्रसंगांची तैलचित्रे येथे लावण्यात आलेली आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर रुक्मिणी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. रुक्मिणीचे दर्शन घेऊन बाहेर पडताना सत्यभामा व त्याला लागून राहीचे मंदिर आहे. या मूर्तीही पाषाणाच्या आहेत. रुक्मिणी मातेप्रमाणेच सत्यभामा व राहीचे येथे नित्योपचार होतात. मंदिरात दररोज पहाटे चार वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येते. विठ्ठल मंदिरातील नित्योपचार हे वैदिक परंपरेनुसार होतात. देवाला जागृत करण्यापासून ते शेजारतीपर्यंतच्या सर्व नित्योपचारांमध्ये मागील २०० वर्षांपासून बदल झालेला नाही. दररोज पहाटे काकडआरती होते.

आरतीनंतर दही, दूध, लोणी, मध व साखरयुक्त पुजा होते. त्यानंतर देवाचा अभिषेक केला जातो. नेवैद्य व आरतीनंतर भक्तांना विठ्ठलाचे दर्शन खुले होते. त्यापुढे पंचामृतपुजा, मध्यान्हपुजा (दुपारी १२ वाजता), अपरान्हपुजा (सायंकाळी ३ ते ४ वाजेदरम्यान), धुपारती (सायंकाळी ७ वाजता) आणि रात्री ११ वाजता शेजारती होते. ही शेजारती एक ते दीड तास चालते. याशिवाय आषाढी व कार्तिकी एकादशी, माघी व चैत्री एकादशी, जन्माष्टमी आणि दहीहंडी, दिवाळीत तुलसी विवाह यासारखे अनेक उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीस येथे महायात्रा भरते. संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे यांच्या मते, आषाढी आणि कार्तिकी वारीची परंपरा किमान तेराव्या शतकापासून सुरू आहे. सोळाखांबी मंडपाच्या तुळईच्या पूर्वभागातील शिलालेखाच्या ७१व्या ओळीत वारीचा उल्लेख आलेला आहे. हा शिलालेख इ.स. १२३७चा आहे व त्यातील वारीचा उल्लेख सर्वात प्राचीन आहे. आजही महाराष्ट्रातील विविध भागांतून विविध संतांच्या पालख्या या काळात पांडुरंगाच्या दर्शनासाठी येथे येतात. विशेष म्हणजे, न्या. रानडे यांनी पुण्यातून जाणाऱ्या पालख्यांची यादी दिली होती. त्यात, तसेच १९२०मध्ये लिहिल्या गेलेल्या एका पंढरीवर्णनात उत्तर हिंदुस्थानातून येथे कबीराची पालखी येत असे, अशी नोंद आहे.

उपयुक्त माहिती

  • पंढरपूर बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पंढरपूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दू. ०२१८६ २२४४६६
Back To Home