विठ्ठल रुक्मिणी मंदिर

पिंपळखेड बुद्रुक, ता. घनसावंगी, जि. जालना

रागावून आलेल्या रुक्मिणीच्या शोधात श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेहून पंढरपूरला आले, तेव्हा त्यांना आपल्या आई-वडिलांच्या सेवेत गुंतलेल्या पुंडलिकाच्या भेटीचा मोह आवरता आला नाही. प्रत्यक्ष पांडुरंग भेटीला आलेले असतानाही पुंडलिकाने आपल्या आई-वडिलांच्या सेवेत कोणताही खंड पडू दिला नाही आणि देवाला विटेवर उभे राहण्यास सांगितले. तेव्हापासून गेली अठ्ठावीस युगे पांडुरंग विटेवर उभा आहे. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाची महाराष्ट्रात खेडोपाडी हजारो मंदिरे उभारलेली आहेत. त्यांपैकीच एक प्रसिद्ध मंदिर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात असलेल्या पिंपळखेड बुद्रुक या गावात वसलेले आहे. या परिसरातील भाविक दरवर्षी आषाढी वारीला या विठ्ठल मंदिरात मोठ्या श्रद्धेने दिंडी घेऊन एकत्र येतात.

हे मंदिर सुमारे चारशे वर्षे प्राचीन असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मंदिराच्या स्थापनेबाबत गावकऱ्यांमध्ये एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. ती अशी की प्राचीन काळी या पिंपळखेड गावात विठ्ठलाचा एक परमभक्त राहत होता. दिवसाचे चोवीस तास भगवंताच्या नामस्मरणात रमणाऱ्या या भाविकाला विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाची मोठी आस लागली होती. तो रोज देवाने आपल्याला दर्शन द्यावे म्हणून प्रार्थना करत असे. त्याच्या या निःस्सीम भक्तीने प्रसन्न होऊन देवाने त्याला स्वप्नात एक दृष्टांत दिला. ‘मी गावातील नदीच्या पात्रात पाषाणमूर्तीच्या रूपात आहे,’ असे देवाने त्याला स्वप्नात सांगितले. या दृष्टांतानुसार त्या भक्ताने नदीच्या पात्रात शोध घेतला असता त्याला तिथे पाषाणाची एक सुंदर मूर्ती सापडली. गावकऱ्यांच्या मदतीने त्याने ती मूर्ती नदीच्या पाण्यातून बाहेर काढली आणि ती एका बैलगाडीत ठेवून तो गावाकडे निघाला. मात्र, आज ज्या ठिकाणी हे मुख्य मंदिर उभे आहे, अगदी त्या जागेपर्यंत आल्यावर बैल अचानक थांबले. गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले तरीही ती बैलगाडी पुढे गेली नाही. हा दैवी संकेत मानून सर्व गावकऱ्यांनी एकत्र होऊन याच जागेवर मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि येथे भव्य मंदिर उभारले.

या मंदिराबाबत दुसरी आख्यायिका अशी की देवावर रागावलेली रुक्मिणी जेव्हा द्वारकेहून निघून दिंडीर वनात आली, तेव्हा तिच्या शोधात श्रीकृष्ण पांडुरंग रूपात पंढरपूरला जात होते. या प्रवासादरम्यान ते काही काळ या पिंपळखेड गावात मुक्कामासाठी थांबले होते. त्या कालखंडात पिंपळासूर नावाच्या एका राक्षसाने या परिसरात मोठा उच्छाद मांडला होता. या राक्षसाचा पूर्णपणे नाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने महादेवाला मोलाचे साहाय्य केले. त्यानंतर पुढे येथे पिंपळेश्वर महादेव शिवलिंगाच्या रूपात आणि श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कायमचे स्थापित झाले, अशी या भागातील लोकांची श्रद्धा आहे.

गावातील नदीवरील पूल पार करून पिंपळखेडमध्ये प्रवेश करताना सर्वप्रथम मंदिराची एक भव्य स्वागतकमान दृष्टीस पडते. या कमानीच्या उजव्या बाजूला हे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच्या भागात भाविकांसाठी एक प्रशस्त वाहनतळ तयार करण्यात आलेले आहे. या वाहनतळावर भाविकांना विश्रांतीसाठी आणि बसण्यासाठी अनेक आसने आहेत. मंदिराच्या सुरक्षेसाठी चहूबाजूंनी तटबंदीआहे आणि या तटबंदीमध्येच मुख्य प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रांगणात येताच एक प्राचीन शिवलिंग पाहायला मिळते. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना जमिनीखाली हे शिवलिंग सापडले होते. ते पूर्वी मंदिराच्या बाहेर काढण्यात आले होते, परंतु त्यानंतर मंदिर समितीला काही वाईट अनुभव आले. त्यामुळे हे शिवलिंग पुन्हा एकदा प्रांगणात सन्मानपूर्वक स्थापित करण्यात आले असल्याचे येथील विद्यमान विश्वस्त सांगतात. या प्रांगणामध्येच एक तुळशीवृंदावन बांधलेले आहे. त्याच्या बाजूला असलेल्या तटबंदीच्या भिंतीत सात सुंदर देवकोष्टके बनवलेली आहेत. या देवकोष्टकांमध्ये विविध संतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. याच प्रांगणात एका बाजूला मुंजोबाचे पवित्र पाषाणही पूजले जाते.

या मंदिराची संपूर्ण रचना मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी पारंपरिक पद्धतीची आहे. मुखमंडपामध्ये समोरील बाजूला दोन स्तंभ आहेत. मुखमंडपाच्या तिन्ही बाजूंच्या स्तंभांवर आकर्षक महिरप तोरणे कोरलेली आहेत. या मुखमंडपामधून पुढे आल्यावर सभामंडपाचे मुख्य प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारापाशी जाण्यासाठी तीन पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यातील सर्वात वरच्या पायरीवरील मेघडंबरीत संत नामदेवांचा मुखवटा बसवलेला आहे. पंढरपूरप्रमाणे येथेही नामदेवाची पायरी असल्याचे सांगितले जाते. सभामंडपामध्ये प्रवेशद्वाराच्या अगदी समोर जमिनीवर एक कासवशिल्प कोरलेले आहे. सभामंडपात भक्कम चौकोनी स्तंभ आहेत आणि त्यातील गरुड स्तंभ विशेष नक्षीकामाने सुशोभित केलेले आहेत. सभामंडपाचे छत स्तंभांवरील तुळईवर तोललेले आहे आणि या छताला एक मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. छताच्या वितानावर म्हणजेच आतील भागावर चक्रनक्षी आहे. सभामंडपामध्ये गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दोन देवकोष्टके बनवलेली आहेत. त्यामध्ये उत्तरेश्वर महाराज आणि अनुसया माता यांच्या मूर्ती विराजमान आहेत. तसेच प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला तीन देवकोष्टके आहेत आणि त्यांमध्ये केशवराज विष्णू यांची काळ्या पाषाणातील आकर्षक मूर्ती, श्रीगणेशाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आणि एक पवित्र नागशिळा स्थापित केलेली आहे.

मुख्य गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर आणि ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीचे छोटे शिल्प विराजमान आहे. गर्भगृहामध्ये एका उंच पीठावरील मखरात विठोबाची काळ्या पाषाणातील अत्यंत विलोभनीय मूर्ती प्रतिष्ठापित आहे. देवाच्या डोक्यावर स्पष्टपणे शिवलिंग कोरलेले आहे आणि त्यांचे दोन्ही हात कटीवर ठेवलेले आहेत. मूर्तीच्या मागील पाठशिळेवर देवाच्या पायाजवळ गरुड आणि हनुमंत यांची स्थानशिल्पे अतिशय बारकाईने कोरलेली आहेत. या मुख्य मूर्तीला दररोज नित्यनियमाने सुंदर वस्त्रे आणि सोन्या-चांदीचे विविध अलंकार परिधान केले जातात.

विठ्ठलाच्या या मुख्य गर्भगृहाच्या डाव्या बाजूला पिंपळेश्वर महादेवाचे स्वतंत्र गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर सभामंडपात एका पीठावर नंदीची काळ्या पाषाणातील एक मूर्ती बसवलेली आहे. महादेव मंदिराचे हे गर्भगृह सभामंडपाच्या जमिनीच्या पातळीपेक्षा थोडे खोल आहे. त्यात खाली उतरण्यासाठी चार पायऱ्या बांधलेल्या आहेत. या गर्भगृहात जमिनीवर एक स्वयंभू शिवलिंग आहे. या मंदिराच्या छतावर एकूण तीन आकर्षक शिखरे बांधलेली आहेत. मुखमंडपाच्या छतावर चौकोनी आकाराचे सुंदर शिखर आहे आणि या शिखराच्या शीर्षभागावर एकावर एक असे दोन आमलक व त्यावर सोनेरी कळस आहे. दोन्ही गर्भगृहांच्या छतावर स्वतंत्र चौकोनी शिखरे उभारलेली आहेत. या दोन्ही शिखरांच्या शीर्षभागावर प्रत्येकी दोन आमलक आणि त्यांवर कळस बसवलेले आहेत.

विठ्ठल मंदिराच्या शेजारी एक मोठे सभागृह बांधलेले आहे. विविध सण आणि उत्सवकाळात येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अखंडपणे अन्नछत्र चालवले जाते. मुख्य मंदिराच्या समोरच्या प्रांगणात रुक्मिणी मातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. रुक्मिणी मंदिराच्या अगदी बाजूलाच पावन महारुद्र मारुतीचे मंदिर उभे आहे. या मंदिराच्या सभामंडपासमोर विशाल आकाराचे प्राचीन गोटे ठेवलेले आहेत. हे गोटे दीर्घकाळापासून याच ठिकाणी असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या गर्भगृहात एका पीठावर मारुतीची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती विराजमान आहे. या पीठाच्या समोरच मारुतीची एक पितळी उत्सवमूर्तीही दर्शनासाठी ठेवलेली आहे. या गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. मंदिराच्या समोरील बाजूस जमिनीमध्ये अर्धी पुरलेली संत चोखोबांची प्राचीन पाषाणमूर्ती आहे. याशिवाय प्रांगणातील एका उंच चबूतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अर्धपुतळा बसवलेला आहे. या पुतळ्याच्या शेजारी जुन्या काळात बांधलेली एक प्राचीन बारव म्हणजेच ऐतिहासिक विहीर आजही अस्तित्वात आहे.

आषाढी एकादशी हा या विठ्ठल मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव मानला जातो. या निमित्ताने आषाढी एकादशी ते पौर्णिमा असा सलग पाच दिवसांचा जत्रोत्सव येथे साजरा केला जातो. या काळात परिसरातील अनेक गावांमधून विविध दिंड्या आणि पालख्या घेऊन हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरामध्ये वैकुंठ चतुर्दशी आणि महाशिवरात्री हे उत्सवही अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. तसेच हनुमान जयंतीचा सोहळा येथे दरवर्षी पार पडतो. श्रावण महिन्यात तर महिनाभर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत असा सलग एक महिना चालणारा भव्य काकडा महोत्सव येथे दरवर्षी साजरा केला जातो. याशिवाय देवदिवाळी, मकर संक्रांत, दसरा, दिवाळी आणि नागपंचमी या पारंपरिक हिंदू सणांच्या व उत्सवांच्या वेळी देखील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात हजेरी लावतात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरामध्ये कीर्तन, भजन आणि प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर सोमवार, शनिवार, एकादशी आणि पौर्णिमा या विशेष दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नेहमीच मोठी वर्दळ पाहायला मिळते. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • घनसावंगी येथून १७ किमी अंतरावर
  • जालना शहरापासून ६७ किमी अंतरावर
  • घनसावंगी शहरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९१४६४५९९९९

विट्ठल रुक्मिणी मंदिर

पिंपलखेड बुद्रुक, घनसावंगी, जिला। जलना

Back To Home