विठ्ठल-रखुमाई मंदिर

पिंजर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

पुंडलिकाच्या भेटीसाठी अठ्ठावीस युगे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या किनाऱ्यावर विटेवर उभी असलेली महाराष्ट्राची लोकदेवता विठ्ठल आणि रखुमाई पिंजरमध्येही आपल्या भक्ताकरीता येऊन वसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच कोट्यवधी भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या विठ्ठल आणि रखुमाईच्या पिंजर येथील मंदिराने अकोला जिल्ह्यातील ‘प्रति पंढरपूर’ असा लौकिक संपादन केलेला आहे. येथील विठ्ठल-रखुमाईचे स्थान सुमारे तीन ते चार शतकांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. सावळ्या विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ न शकणारे हजारो भाविक या मंदिरात येऊन विठ्ठलचरणी लीन होतात.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की पिंजर येथील कल्याणस्वामी महाराज हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. ते नित्यनेमाने पंढरीची वारी करत. वृद्धापकाळामुळे त्यांना एके वर्षी वारीला जाणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांचे मन व्याकुळ झाले होते. अशात एके रात्री पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला की माझ्या दर्शनासाठी तुला पंढरपूरला येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे येईन. तू पिंजरनजीकच्या पार्डी गावातील तीन नद्यांच्या संगमावर जा. तेथे खोदकाम केल्यास तुला माझे दर्शन घडेल. दुसऱ्या दिवशी त्यांनी पार्डी गावातील संगमावर काही ग्रामस्थांसह जाऊन खोदकाम केले असता तेथे त्यांना विठ्ठल-रखुमाईच्या वालुकाष्मातील मूर्ती आढळल्या. ग्रामस्थांनी या मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही.
त्यानंतर कल्याणस्वामींनी विठ्ठलाची करूणा भाकणारे अभंग म्हणण्यास प्रारंभ केला. तेव्हा मात्र ही मूर्ती अलगदपणे उचलली गेली. त्यानंतर या मूर्ती बैलगाडीतून वाजतगाजत पिंजर गावात आणण्यात आल्या. गावाबाहेर नदीच्या तीरावर गाडीचे बैल आपोआप थांबले. ते मागे-पुढे सरकेनात. तेव्हा कल्याणस्वामींना विठ्ठलाने पुन्हा दृष्टांत देत या ठिकाणीच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा केली. त्यानुसार येथे मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराचा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’च्या ‘अकोला डिस्ट्रिक्ट – व्हॉल्यूम १’ (१९१०) मध्ये करण्यात आलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की ‘येथील तत्कालिन सावकार वामन सावजी यांच्या अनेक पिढ्यांपूर्वीच्या पूर्वजाने येथे लहानसे विठ्ठल मंदिर उभारले. येथे मंदिर उभारल्यास त्यास पंढरपूरसारखे माहात्म्य प्राप्त होईल व दूर पंढरपूरची वारी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे स्वप्न त्या पूर्वजास पडले. त्यामुळे त्याने हे मंदिर बांधले.’ १९०९ मध्ये वामन सावजी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी त्यांनी दोन हजार रुपये खर्च केला, असेही गॅझेटियरमध्ये म्हटले आहे. अलिकडेच या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर या वास्तूला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
पिंजर गावच्या वेशीवर तीन नद्यांच्या संगमावर असलेले हे मंदिर उंच अधिष्ठानावर आहे. काही पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. प्रांगणात मंदिरासमोर कल्याणस्वामी महाराजांचे संजीवन समाधी स्थान आहे. मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी संरचना असलेल्या या मंदिराचे रूप एखाद्या किल्याप्रमाणे भासते. पाच पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या मंडपात प्रवेश होतो. दुमजली असलेल्या या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभशाखा व त्यांवर दीपकोष्टके आहेत. वरच्या मजल्यावर नगारखाना आहे.
बंदिस्त असलेल्या येथील सभामंडपाच्या भिंतींमधील देवकोष्टकांत अनेक देव-देवता व संत मूर्ती आहेत. सभामंडपाच्या पुढे प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात वज्रपिठावर विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. या मूर्तींच्या दर्शनाने पंढरपूरच्या पंढरीनाथाचेच दर्शन घेतल्याची अनुभूती येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मखराच्या मागील बाजूस विठ्ठलाची मोठी प्रतिमा आहे. मंदिरात हनुमान व गजानन महाराज यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिरावर गर्भगृहावरील मुख्य शिखरासह आणखी दोन शिखरे आहेत. त्यापैकी एक मुख्य प्रवेशद्वारावर व दुसरे गजानन महाराजांचे मंदिरात जेथे स्थान आहे त्यावर आहे.
मंदिर परिसरात आषाढ व कार्तिक महिन्यांतील पौर्णिमेपासून अडीच दिवस मोठ्या यात्रा भरतात. या यात्रांना विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील हजारो भाविक हजेरी लावतात. विविध भागांतून टाळ-मृदुंगाच्या गजरात अनेक पालख्याही येथे येतात. यात्रांदरम्यान येथे होणारा दहीहंडी सोहळा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या यात्रांदरम्यान भजन-कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. यात्रांच्या दुसऱ्या दिवशी रात्री विठ्ठलाच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होते.

उपयुक्त माहिती

  • बार्शीटाकळी येथून २४ किमी अंतरावर
  • बार्शीटाकळी व अकोला येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
Back To Home