सरदार खंडेराव दाभाडे यांचे गाव असलेल्या तळेगावला मोठी धार्मिक पार्श्वभूमी आहे. या गावात अनेक सुंदर मंदिरे आहेत. त्यापैकी विठ्ठल मंदिर हे एक. हे मंदिर प्राचीन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ते कधी आणि कुणी बांधले याविषयी निश्चित नोंद नाही. या मंदिराचा उल्लेख दास संप्रदायातील तंजावरचे श्री भीमस्वामी यांनी केले आहे. याबाबतचे बाड धुळे शहरात आजही जतन करण्यात आलेले आहे.
ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर संत नामदेवांच्या काळात आळंदीच्या पंचक्रोशीत प्रदक्षिणा सोहळा झाला. त्यात एक दिवसाचा मुक्काम या विठ्ठल मंदिरात झाला होता आणि ती प्रथा आजही अविरत सुरू आहे. या ठिकाणी असलेली लक्ष्मीची मूर्ती अकराव्या शतकातील आहे. यावरून मंदिराची प्राचीनता लक्षात येते.
मंदिराबाबतची आख्यायिका अशी, संत तुकाराम महाराज यांची या मंदिरात अनेकदा कीर्तने होत असत. कीर्तन ऐकण्यासाठी तळेगाव व परिसरातील अनेक ग्रामस्थ विठ्ठल मंदिरात उपस्थित राहत. या गावातील एक महिला तिचे मूल लहान असल्याने इच्छा असूनही या कीर्तनांसाठी उपस्थित राहू शकत नसे, परंतु ती तिच्या शेजारणीकडून दुसऱ्या दिवशी तुकोबांच्या कीर्तनाचे वर्णन ऐकत असे. तिला तुकोबांच्या कीर्तनाचा आस्वाद घेता यावा यासाठी शेजारणीने एक युक्ती सांगितली. त्यानुसार लहान बाळाला थोडेसे अफू चाटवायचे की ज्यामुळे ते बाळ झोपी जाईल व या महिलेला कीर्तनाचा आनंद घेता येईल. त्यानुसार बाळाला अफूची मात्रा चाटवली व त्याला घेऊन ती महिला कीर्तनात सहभागी झाली. तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐन रंगात असताना त्या महिलेला जाणवले की, बाळाची हृदयाची धडधड थांबली आहे. तिने तिथेच टाहो फोडला व ते मृत मूल तुकारामांच्या चरणाशी ठेवले. तुकोबांनी विठ्ठलाला साकडे घातले आणि काही वेळाने ते मूल जिवंत होऊन रडायला लागले. या घटनेनंतर या विठ्ठल मंदिराची व तुकोबांची महती सर्वदूर पसरली.
आकर्षक प्रवेशद्वारातून आत गेल्यावर या विठ्ठल मंदिराची भव्यता जाणवते. या वास्तूला करण्यात आलेली सुंदर रंगरंगोटी आणि बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात केलेला लाकडाचा वापर पाहायला मिळतो. विठ्ठलाच्या आरतीत ‘जयदेव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा’ असा उल्लेख आहे. त्यानुसार या ठिकाणची विठ्ठलमूर्ती ही रखुमाई आणि राई किंवा राही सोबत आहे, हे येथील एक वैशिष्ट्य. ‘कर कटेवर’ अशा स्थितीतील या तीनही मूर्ती पाषाणातील आहेत.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचे समग्र वाङ्मय सार्थ करणारे श्रीगुरू वि. ना. तथा दादामहाराज साखरे या ठिकाणी राहत असत. आळंदीत वारकरी शिक्षण संस्था व साधकाश्रम सुरू करण्याआधी दादांनी याच मंदिरात प्रवचने व कीर्तने केली. या मंदिरातील ग्रंथालय अतिशय समृद्ध असून अंदाजे २००० हजार धार्मिक ग्रंथ येथे आहेत. तुकोबारायांच्या गाथेचे जे हस्तलिखित संताजी जगदाडे यांनी तयार केले, ते आजही या ग्रंथालयात आहेत. तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यांपैकी गंगाधरपंत मवाळ हे तळेगावचेच. याच मंदिरात अनेक वारकरी व वैदिक परंपरा पूर्वापार सुरू असून येथे रोज काकड आरती होते. पंचक्रोशीतील एका भाविकांच्या हस्ते रोज पूजा केली जाते. दररोज हरिपाठ, शेजारती होते. शुद्ध एकादशीला कीर्तन व प्रवचन असते. तसेच येथे सर्व संतांच्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात. जन्माष्टमी सप्ताह, आद्य शंकराचार्य जयंती, दासनवमी उत्सव, दादामहाराज पुण्यतिथी उत्सव व भागवत सप्ताह आदी कार्यक्रम होत असतात. या वेळी विजेची रोषणाई आणि मंदिरासमोर भव्य रांगोळी काढण्यात येते. या सर्व उपक्रमांत तळेगाव दाभाडे पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.