विठ्ठल मंदिर (प्रतिपंढरपूर)

दौंड, ता. दौंड, जि. पुणे


पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या दौंडमध्ये प्रतिपंढरपूर अशी ख्याती असलेले प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे राही व रुक्मिणीसह विठ्ठलाची मूर्ती आहे. अशा प्रकारची मूर्ती इतर विठ्ठलाच्या मंदिरांमध्ये क्वचितच आढळते. पंढरपूरप्रमाणेच येथील भीमा नदीच्या प्रवाहाला चंद्रकोरीचा आकार आलेला आहे.

पांडवांचे कुलपुरोहित धौम्य ऋषींनी येथे येऊन विठ्ठल मंदिराची उभारणी करून गावाचा विकास केला. त्यामुळेच गावाला दौंड असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. हेमाडपंथी प्रकारातील हे मंदिर पूर्णपणे दगडांमध्ये बांधलेले आहे.

मंदिराचे प्रवेशद्वार अखंड शिळेत कोरलेल्या लेण्यांप्रमाणे भासते. सभामंडपाची ठेवण हेमाडपंथी प्रकारातील आहे. सभामंडप प्रशस्त असून या मंडपात १८ दगडी खांब आहेत. या प्रत्येक खांबावर कोरीव काम आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराला ८१ फूट उंचीचा भव्य कळस आहे. या कळसाला सहा उपकळस आणि एक घंटा कळस आहे.

मंदिराचा मुख्य गाभारा सुमारे १६ फूट लांब आणि १६ फूट रुंद आहे. गाभाऱ्यात राही रुक्मिणीसह विठ्ठलाची मूर्ती आहे. या तिन्ही मूर्ती सुबक व तेजस्वी भासतात. विठ्ठलाच्या उजव्या बाजूस राही आणि डाव्या बाजूस रुक्मिणी आहे. श्री विठ्ठलाची मूर्ती कंबरेवर हात ठेवून विटेवर उभी आहे. विटेवर मोडी लिपीतील काही अक्षरे आहेत. श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर प्रत्यक्ष शिवलिंग असून, त्यामुळेच या मूर्तीच्या डोक्यावर बेलाचे पान वाहण्याची येथे प्रथा आहे.
आषाढी एकादशीला पंचक्रोशीतील १३ ग्रामदेवतांच्या पालख्यांसह येथे वारकऱ्यांचे आगमन होते. या पालख्या भीमा नदीवर आपापल्या ग्रामदैवतांना अंघोळ घालण्यासाठी येतात. यावेळी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात परिसर दुमदुमून जातो. ज्या भाविकांना आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही, असे पुणे जिल्हा आणि परिसरातील हजारो भाविक दौंड येथील प्रतिपंढरपूर मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. येथील भीमा नदीत स्नान केल्याने पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान केल्याचे पुण्य मिळते, असा भाविकांचा विश्वास आहे.
या विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराजांनी अनेकदा कीर्तन केले होते, अशा नोंदी आहेत. असे सांगितले जाते की, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे भूमिगत असताना त्यांनी या मंदिरात गुरुचरित्राचे पारायण केले होते. मंदिरात दररोज सकाळी पूजा आणि आरती होते. सायंकाळी हरिपाठ होतो. भाविकांना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत गाभाऱ्यात जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • दौंड एसटी स्थानकापासून दोन किमी; तर पुण्यापासून ८२ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून दौंडसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : पुजारी : ८३९००९९२११
Back To Home