विरेश्वर मंदिर

आसरे, ता. सुधागड, जि. रायगड

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात सुधागड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ साली सुधागड किल्ला जिंकून घेतला होता. सुधागड तालुक्यातील पालीचे बल्लाळेश्वर मंदिर पुराणकालीन आहे व त्याचा उल्लेख अनेक ग्रंथात सापडतो. तालुक्यात ठाणाळे, गोमाशी येथे सुमारे २ हजार वर्षे प्राचीन लेणी आहेत. याच सुधागड तालुक्यात आसरे गावात विरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. येथील जागृत महादेव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात ईश्वर सेवा केल्याने मानसिक आजार दूर होतात, अशीही मान्यता आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे यादव कालीन असल्याचे सांगितले जाते. अनेकवेळा जिर्णोद्धार झाला असल्याने मंदिराचे स्वरूप बदलले असले तरी येथील गर्भगृह मूळ स्वरूपातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीनशे वर्षापूर्वी पेशव्यांचे सरदार जोशी हवालदार हे बंगुलर राज्यातील बदामी किल्ला सर करण्यासाठी सैन्य लवाजम्यासहीत दक्षिणेकडे जात असताना त्यांनी या मंदिराच्या परिसरात तळ टाकला होता. त्यावेळी आपली मोहीम फत्ते झाल्यास मंदिराचा जिर्णोद्धार करू, असा नवस त्यांनी विरेश्वर महादेवाला केला होता. पुढे मोहीम फत्ते करून परत आल्यावर जोशी सरदारांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
हे मंदिर गावाजवळ तलावाच्या काठावर आहे. मंदिरासमोरील मोकळ्या मैदानात पाषाणी चौथरा व चौथऱ्यावर दीपमाळा आहे. पाच थरांच्या चौकोनी दीपमाळेच्या शीर्षभागी वर्तुळाकार पट आहे. दीपमाळेजवळ प्राचीन विरगळ व तुलसी वृंदावन आहे. मंदिराचे प्रांगण मोकळ्या मैदानापेक्षा सुमारे सहा फूट खोल आहे व त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिराच्या सभोवती पाषाणी आवारभिंत आहे. या भिंतीत अनेक प्राचीन विरगळ शिल्पे व शिलालेखपाषाण आहेत. प्रांगणात मंदिरासमोर काही वीरगळ स्तंभ व दगडी दीप आहेत.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप दुमजली आहे. मुखमंडप प्रांगणापेक्षा सुमारे चार फूट उंच आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या मुखमंडपात दोन्ही बाजूला कठडे आहेत. मुखमंडपात चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मोठी मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी तीन चौकोनी लाकडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. सभामंडपाच्या छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत. सभामंडपात भिंतीलगत नगारा व उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी ठेवलेली आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन देवकोष्टके आहेत. त्यापैकी डावीकडील देवकोष्टकात गणपती व उजवीकडे विष्णूची मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास वेलबुट्टीशाखा व पर्णशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपती शिल्प व ललाटपट्टीत पानाफुलांच्या नक्षी आहेत. मंडारकास चंद्रशिळा व कीर्तीमुख आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी व त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीतील देवकोष्टकात चतुर्भुज भैरवी शिल्प आहे. देवीच्या हातांत त्रिशूल, डमरू व कमंडलू आहेत आणि एक हात अभयमुद्रेत आहे.
गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखराच्या पहिल्या चौकोनी थरात चारही बाजूंना देवकोष्टके, चारही कोनांवर लघुशिखरे आणि त्यावर आमलक आहेत. शिखराच्या दुसऱ्या अष्टकोनी थरावर आठ देवकोष्टके आहेत. देवकोष्टकांच्या शीर्षभागी लघुशिखरे व त्यावर आमलक आहेत. शिखराचा तिसरा थर अष्टकोनी व वर निमुळता आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक, कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला सुमारे शंभर वर्षापूर्वीची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेच्या इमारतीमागे लहान शिवमंदिर आहे. या मंदिरासमोर प्राचीन पाषाणी दीप (माल्टा) आहे. मंदिरात जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील लिंगपाषाणावर चार मुखे कोरलेली आहेत. त्यास चतुर्मुख शिवपिंडी म्हणतात. अशा प्रकारची शिवपिंडी दुर्मिळ मानली जाते.
मंदिराच्या मागील बाजूला विस्तीर्ण तलाव आहे. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. तलावाच्या काठावर भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. या परिसरात जनन शांती व श्राद्ध विधी केले जातात. महाशिवरात्री हा येथील वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमेस दीपोत्सव साजरा केला जातो. श्रावण महिन्यात भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी आदी दिवशी शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

उपयुक्त माहिती:

  • खोपोली येथून ३२ किमी व पाली येथून १४ किमी अंतरावर
  • खोपोली व पाली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home