
पौराणिक आख्यायिकांमध्ये कौंडिण्यपूर म्हणून उल्लेख असलेल्या कुंडल गावाचा इतिहास सुमारे १५०० वर्षे प्राचीन आहे. ही राजा हिंगणदेवाची राजधानी असल्याचे पुराणांत म्हटले आहे. चालुक्यवंशीय राजा सत्येश्वराच्या राजधानीचे ठिकाणही हे होते, असे सांगितले जाते. जैन धर्मात कुंडलला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. येथील डोंगरावर भगवान पार्श्वनाथ, तसेच वर्धमान महावीर यांनी धर्मसभा घेतली होती. राजा विजयादित्याने इ.स. ७०५ मध्ये कुंडल जिनालयाला दान दिले होते. याच कुंडलच्या डोंगरावर शंकराचा सेनापती असलेल्या वीरभद्राचे प्राचीन मंदिर आहे.
हे मंदिर सुमारे ९०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराची आख्यायिका अशी की कुंडल येथील सत्यप्पा लुपने हे येडूर येथील वीरभद्राचे परमभक्त होते. ते दर अमावास्येला येडूर येथील वीरभद्राच्या मंदिरात दर्शनासाठी जात असत. पुढे वार्धक्यामुळे सत्यप्पा यांना येडूर येथे दर्शनासाठी जाणे अशक्य झाले. तेव्हा देवाने आपल्यासाठी कुंडल येथील डोंगरावर यावे,
अशी विनवणी त्याने देवास केली. सत्यप्पाच्या परमभक्तीने प्रसन्न झालेल्या वीरभद्राने त्याच्या इच्छेनुसार या ठिकाणी वास्तव्य केले. यानंतर सत्यप्पाने येथे वीरभद्राचे मंदिर उभारले. सत्यप्पा लुपने यांच्या वंशजांनी त्यांची ही भक्तीपरंपरा पुढे चालवली. इ.स. १८७० मध्ये या मंदिराच्या पायरी मार्गावर सत्यपा लुपने यांचे वंशज बसप्पा यांनी २५००० रुपये खर्च करून दोन महाद्वारांची निर्मिती केली.
हे मंदिर डोंगर माथ्यावरील गुहेत आहे. डोंगराच्या पायथ्यापर्यंत पक्की सडक आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंत सुमारे दीडशे पायऱ्या असलेला पायरी मार्ग आहे. पायथ्यापासून वीस पायऱ्या चढल्यावर मंदिराचे पहिले स्वागतद्वार आहे. अर्धवर्तुळाकार कमान असलेल्या या स्वागतद्वाराच्या दोन्ही बाजूंस भिंतीत दीपकोष्टके आहेत. स्वागतदाराच्या पुढे पायरी मार्गाच्या उजव्या बाजूला महादेवाचे अर्धखुल्या स्वरूपाचे मंदिर आहे. मंदिरात जमिनीवर शिवपिंडी व समोर नंदी आहे. पायरी मार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या आणखी एका मंदिरात शिवपिंडी आहे.
पुढे वीरभद्राचे भक्त सत्यपा लुपने यांची समाधी आहे. समाधीच्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. मंदिरात मारुतीरायाची स्वयंभू पाषाण मूर्ती व त्यामागील भिंतीवरील अखंड शिळापटावर मारुतीच्या अकरा मूर्ती कोरलेल्या आहेत. पायरी मार्गाच्या अंतिम टप्प्यावर मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर महिरपी कमान व आतील भिंतीत तीन देवकोष्टके आहेत. वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला डोंगराची नैसर्गिक तटबंदी व उजव्या बाजूला तटबंदीची दगडी भिंत आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गोड्या पाण्याचे कुंड आहे. येथून काही पायऱ्या चढून मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात पोहोचता येते. पुढे मंदिराचा सभामंडप आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या सभामंडपात वर चढण्यासाठी मध्यभागी तीन व डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी दोन पायऱ्या आहेत. सभामंडपात समोरील बाजूस चार स्तंभ, स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. सभामंडपातील जमिनीवर मध्यभागी कूर्मशिल्प आहे. सभामंडपाचे बांधकाम अलीकडील काळातील आहे. 
पुढे डोंगराच्या गुंफेत गर्भगृह आहे. गर्भगृहात वज्रपिठावर वीरभद्राची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवाच्या डोक्यावर पाच फण्यांच्या नागाचे छत्र, हातात त्रिशूल, खड्ग, धनुष्य व दंड आणि गळयात नरमुंडांच्या माळा आहेत. देवाच्या उजव्या व डाव्या बाजूस शक्तीमूर्ती आहेत. मूर्तीच्या मस्तकी चांदीचा मुकुट आहे. वज्रपिठावर उजव्या बाजूला गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग गुंफेतून आहे. या प्रदक्षिणा मार्गाच्या बाजूला गोड्या पाण्याचे कुंड आहेत.
या मंदिराच्या बाजूला दानम्मा देवीचे मंदिर व महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला गुहेत साठवण कक्ष आहेत. येथून काही अंतरावर असलेल्या गुहेत ब्रम्हानंद स्वामींची समाधी व बाजूला पाण्याचे कुंड आहेत. संपूर्ण डोंगर परिसरात अनेक गोड्या पाण्याचे कुंड व गुहा कक्ष आहेत. काही गुहाकक्षांच्या समोरील भिंती पाषाणात बांधलेल्या आहेत. या कक्षांमध्ये प्राचीन काळी अनेक संन्यासी तपासाधना करीत असत. कार्तिक अमावास्या हा देवाचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या वेळी देवाचा विवाह सोहळा संपन्न होतो. गावातून लुपने यांच्या घरातून देवाची पालखी निघून ग्रामप्रदक्षिणा करते व मंदिरातील सोहळा संपन्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा लुपने यांच्या घरात विसर्जित होते. देवाच्या पालखी व पूजेचा मान वंशपरंपरेने आजही लुपने घराण्याकडे आहे. पूजाअर्चनेचा मान जंगम समाजाचा आहे. हरडे, बिडवे समाजास देवाच्या दिवटीचा मान आहे.
देवाच्या वार्षिक उत्सवाच्या वेळी तीन दिवस मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन, जागरण, गोंधळ, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेच्या वेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात दर अमावास्येला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. ही प्रथा मागील शंभर वर्षांपासून सुरू आहे.