वेताळदेव मंदिर

पेंडूर, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

मालवण तालुक्यातील ऐतिहासिक पेंडूर हे गाव येथील वेताळदेव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दर तीन वर्षांनी येथे साजरा होणारा मांड उत्सव संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. त्यावेळी येथे १५ दिवस मोठी यात्रा असते. ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक समजली जाते.

पेंडूर हे गाव पूर्वीच्या काळी सागरी व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण होते. या गावच्या अस्तित्वाच्या खुणा मध्ययुगीन काळापासून सापडतात. येथे काही जैनमूर्ती आहेत. त्याची प्राचीनता दहाव्या शतकापर्यंत सिद्ध होते. या गावात एक पाच फुटांचा राजाचा वीरगळ आढळतो. यावरून मध्ययुगामध्ये जैन धर्मियांची येथे वस्ती होती, असे स्पष्ट होते. असे सांगितले जाते की सावंतवाडी संस्थानचे लखम सावंतभोसले यांना पेंडूर गाव मिळाले आणि त्यांनी बारा बलुतेदारांच्या साह्याने येथील कारभार चालवला. या घराण्याच्या वाड्यातील जोत्यावरच ग्रामदैवत वेताळदेव मंदिराची स्थापना केली. या देवतांसोबतच परिसरात सातेरी, लिंगेश्वर, रवळनाथ पावणाई देवी अशी मंदिरेही स्थापन करण्यात आली.

या गावाचा इतिहास असा सांगण्यात येतो की एप्रिल १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि लखम सावंत यांच्यात पाच कलमांचा तह झाला. त्यानुसार लखम सावंत याला कुडाळ प्रांताची देशकत बहाल करण्यात आली. मात्र लखम सावंत नंतर पुन्हा विजापूरच्या आदिलशहास जाऊन मिळाला. त्याने कुडाळ प्रांतातील शिवाजी महाराजांची सर्व ठाणी उठवून तेथे विजापूर सरकारची ठाणी बसविली. त्यामुळे बादशहाने खूष होऊन .. १६६४ मध्ये लखम सावंत यांस मालवण गाव इनाम दिला. नंतर काही दिवसांनी बादशहाने अजीजखान सुभेदार याच्या शिफारशीवरून लखम सावंत याला कुडाळ परगण्याची नाडगौडकी आणि काही गावे दिली. त्यात मसुरे, घावनळे, मळगाव, मठ, होडावडे, आरवली, रेडी, आरवंदे या गावांबरोबरच पेंडूर हे गावही होते. सावंत घराण्याच्या येथील वाड्याच्या जोत्यावर वेताळदेवाची स्थापना करण्यात आली होती.

येथील वेताळदेवाचे मंदिर प्रशस्त आहे. लहान लहान टेकड्यांनी वेढलेला हा परिसर निसर्गसमृद्ध आहे. या मंदिराला समोरून दोन, तर मागून एक अशी तीन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेद्वारातून आत आल्यावर मंदिराचे प्रशस्त प्रांगण दिसते. प्रांगणात मंदिराच्या समोर एका चौथऱ्यावर दोन उंच दीपस्तंभ आहेत. शेजारी तुळशी वृंदावन, एक वीरगळ दोन स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप दुमजली अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. यात भाविकांना बसण्यासाठी बाजूने कक्षासनांची रचना आहे. या सभामंडपाची उंची इतर मंदिरांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. येथील प्रसिद्ध असलेला मांड उत्सव याच सभामंडपात होतो. या सभामंडपाच्या पुढील बाजूला काहीशा उंचीवर उपसभामंडप (गोपूर) आहे. या गोपुरातून काही पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात मानाच्या तरंगकाठ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात देव वेताळाची काळ्या पाषाणातील उभी मूर्ती आहे. लांबसडक नाक, भरदार मिशा, तेजस्वी डोळे कपाळावर चंदनाच्या आडव्या तीन रेषा असे या मूर्तीचे स्वरूप आहे. मूर्तीच्या डावीकडे एका कमी उंचीच्या वज्रपीठावर गजान्त लक्ष्मी डाव्या बाजूला काळ्या पाषाणातील देवीची कोरीव मूर्ती आहे. याशिवाय येथे वेताळ देवाची पंचधातूची लहान उत्सवमूर्ती आहे.

वेताळदेव मंदिरात पौष महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये होणारा मांड उत्सव हा मालवणसह कोकणात प्रसिद्ध आहे. हे पंधरा दिवस येथे मोठी यात्रा असते. या उत्सवामागची एक कथा अशी की देवी जुगाई ही वेताळदेवाची बहीण आहे. दर तीन वर्षांनी वेताळदेव या बहिणीला माहेरपणासाठी घेऊन येतो. जुगाई देवी १४ दिवस वेताळाच्या घरी म्हणजे पेंडूर येथील वेताळदेव मंदिरात राहते. तिच्या या माहेरपणाचा काळ म्हणजेच हा मांड उत्सव. यानुसार दर तीन वर्षांनी हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या दिवशी गावकरी वाजतगाजत मिरवणूक काढतात. त्यावेळी तेथे एखाद्या स्त्रीच्या अंगात जुगाई देवीचा संचार होतो. संचार झाल्यानंतर वेताळदेव तिचा हात पकडून तिला मंदिरात घेऊन येतो. त्यानंतर देवीला पाटावर बसवून तिची ओटी भरली जाते पूजा केली जाते. या ओटी भरणाच्या कार्यक्रमाने उत्सवाची सुरुवात होते. या उत्सवाच्या आधी दोन दिवस गावातील अनेक कुटुंबांकडून येथे दिवे लावले जातात. या दीपप्रज्वलनालालक्षदीपाचा उत्सवअसे म्हटले जाते.

तिसऱ्या दिवशी पाच मानकरी १२ सेवक यांच्या ओट्या त्यानंतर देवाच्या कौलानुसार भाविकांच्या ओट्या भरल्या जातात. उत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्य़ंत हा ओटी भरणीचा कार्यक्रम सुरू असतो. हा कार्य़क्रम वेताळदेव मंदिराच्या सभामंडपात होतो. तेराव्या दिवशी रात्री देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम होतो. चौदाव्या दिवशी पहाटे देवी ओट्यांचा स्वीकार करते. देवीने ओट्या स्वीकारल्यावर मानकरी त्यातील नारळ आणि तांदळाचे ग्रामस्थांना वाटप करतात. मंदिराची प्रदक्षिणा घालून वेताळदेव आणि देवी जुगाई ढोलताशांच्या गजरात कर्ली खाडीत स्नानासाठी जातात. स्नानविधी आटोपल्यावर भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप केले जाते. त्यानंतर देवाची खणानारळाने ओटी भरली जाते तिला सन्मानाने घरी पोहोचवले जाते. उत्सवकाळात जमलेल्या ओट्यांचा अर्धा भाग हा देवीला दिला जातो उर्वरित भाग वेताळदेव मंदिरात ठेवला जातो. या उत्सवासाठी मालवणसह जिल्ह्यातील अनेक स्त्रिया ओटी भरण्यासाठी येथे आवर्जून येतात.

वेताळदेव मंदिरापासून काही अंतरावर सातेरी देवीचे मंदिर आहे. वेताळदेवाच्या मंदिरात मांड उत्सव सुरू असतो, त्यावेळी सातेरी देवीच्या मंदिरातही ओट्या भरल्या जातात. सातेरी मंदिराच्या मागच्या बाजूला जंगलात जैनाचा डोंगर नावाचा एक भाग आहे. तेथील विरळ जंगलास रानवटा म्हणतात. या भागात साधारण १२०० वर्षांपूर्वीच्या काळातील जैन मंदिराचे भग्नावशेष दिसतात. मंदिराचा समूह तिथे होता, पण काळाच्या ओघात त्याचे विखुरलेले अर्धवट रूप पाहायला मिळते. एक मोठा चौथरा, अर्धवट खांब, चिऱ्यांच्या अर्धवट भिंती दिसतात. येथे भगवान वर्धमान महावीर यांची पद्मासनातील मोठी मूर्ती, पार्श्वनाथांची मस्तकहीन मूर्ती, तसेच गोमेधा देवी, कुबेर (जांभाळ), गजलक्ष्मी कालिका यांच्या मूर्ती आहेत. येथे पूर्वी असलेल्या काही मूर्ती आता नाहीशा झाल्या आहेत. जैनांच्या मूर्ती असलेल्या या भागाला डंकिनीशांकिनी असे म्हणतात. येथील एका यक्षिणीला डंकिनी तर यक्षाला शांकिनी म्हटले जाते. जैनांची डंकिनी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान बनलेली आहे. रानवट्यातील या देवीला अंबिका मानून अपत्यसुखासाठी नवस बोलण्याची प्रथा आहे. लग्न व्हावे यासाठी अविवाहित मुंडावळ्याचा, तर लग्न झाल्यावर विवाहित बांगड्यांचा नवस फेडायला येतात.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून २४ किमी, तर कुडाळपासून १२ किमी अंतरावर
  • मालवण व कुडाळ येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home