व्यंकटेश बालाजी मंदिर

वरचे गाव, शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे 

आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान हे रोममधील व्हॅटिकन सिटीनंतरचे जगातील सर्वांत श्रीमंत देवस्थान गणले जाते. दरवर्षी या मंदिराला जगभरातून लाखो भाविक भेट देतात. तिरुमला डोंगरावर स्थित असलेले ते मंदिर किमान दीड हजार वर्षे प्राचीन आहे. या मंदिराच्या उभारणीत देखभालीमध्ये चोल, पल्लव राजांप्रमाणेच मराठा सेनापती रघुजी भोसले यांचाही सहभाग आहे. या देवाची देशभर अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्याच पंक्तीतील असलेले शिरपूर येथील बालाजी मंदिर हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे

श्री विठ्ठल : एक महासमन्वयया अभ्यासपूर्ण ग्रंथात थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांनी असे नमूद केले आहे की पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरुपतीचा वेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णूच्या पुराणप्रसिद्ध अवतारांशी अथवा रूपांशी संबंध नसणारे आणि तरीही विष्णुरूप पावलेले आहेत. विठ्ठल हा बाळकृष्ण मानला जातो, तर वेंकटेश हा बालाजी या नावाने ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रुसून बसलेली, तर वेंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सोसल्यामुळे चिडून प्रथम करवीरात आणि नंतर तिरुचानूरमध्ये दूर वेगळी राहिलेली. वेंकटेशाच्या पत्नीचे नाव पद्मावती, तर विठ्ठलाच्या प्रेयसीचे नाव पद्मा असे आहे. वेंकटेश हा विठ्ठलाप्रमाणेच शस्त्रहीन, मौनी आहे आणि डावा हात कटीवर ठेवून, उजव्या हाताने भक्तांना वरप्रदान करीत आहे. अशा या बालाजीचे भक्त आंध्राप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर आहेत

शिरपूर येथील हे मंदिर सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिराच्या निर्मितीची कथा अशी की पूर्वी शिरपूर शहराचे खालचे गाव वरचे गाव असे दोन भाग पाडणारा नाला शहराच्या मधून वाहत होता. त्याकाळी खालच्या गावात बालाजी मंदिर होते. या मंदिराचा रथ उत्सवाच्या वेळी दोन्ही गावातून फिरायचा. खालच्या गावचे चतुर शेठ वरच्या गावचे गणपत शेठ हे दोघे बालाजी रथाची पूजा करीत त्यानंतर रथोत्सवास सुरूवात होत असे. एकदा पूजेसाठी यायला गणपत शेठ यांना उशीर झाल्याने त्यांच्या शिवाय रथोत्सवाला सुरूवात करण्यात आली. यामुळे गणपत शेठ यांचा अहं दुखावला गेला त्यांनी आपल्या गावी (वरचे गाव) बालाजी मंदिर बांधून स्वतंत्र रथोत्सवास सुरूवात केली

एके वर्षी दोन्ही रथ वरच्या गावातील एका अरुंद गल्लीत आमने सामने आले कोणीही रथ मागे घेण्यास तयार झाल्याने मोठा वाद झाला. तहसीलदार पोलीस अधिकारी सतत तीन दिवस समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते. शेवटी तिसऱ्या दिवशी गणपत शेठ यांनी रथ मागे घेतला. त्यानंतर दोन्ही रथयात्रा वेगवेगळ्या दिवशी निघाव्यात, असा तोडगा काढण्यात आला. त्यामुळे खालच्या गावची रथयात्रा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी वरच्या गावची रथयात्रा दसऱ्याच्या तिसऱ्या दिवशी निघते. तेव्हा पासून वरच्या गावच्या रथाची नायाधिशांच्या हस्ते पूजा करण्याची प्रथा आजही येथे कायम आहे

हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात दाटीवाटीच्या परिसरात आगे. रस्त्यापेक्षा सुमारे दहा फूट उंच असलेल्या मंदिराच्या मुखमंडपात येण्यासाठी १५ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. मुखमंडप, दुमजली सभामंडप गर्भगृह अशी संरचना असलेल्या मंदिराच्या मुखमंडपास समोरील बाजूला चार गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. दुसऱ्या मजल्याच्या दर्शनी भिंतीत तीन देवकोष्टके आहेत. त्यापैकी मधल्या देवकोष्टकात गणपती, डाव्या उजव्या बाजूला लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. डाव्या बाजूच्या देवकोष्टकात राधाकृष्ण उजव्या बाजूच्या देवकोष्टकात विष्णूलक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. सर्व मूर्तींच्या मागे नक्षीदार पाठशिळा आहेत

सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी ललाटबिंबस्थानी बालाजी देवाचे मुख कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस सभामंडपात चार स्तंभांवर सोनेरी छत असलेल्या नक्षीदार मखरात विष्णूचे वाहन असलेल्या गरूडाची मूर्ती आहे. गर्भगृहासमोर स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे. येथून भाविकांना गर्भगृहातील बालाजीचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला असलेल्या चौथऱ्यांवर चतुर्भुज प्रतिहारी द्वारपालांची पितळी शिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर श्रीदेवी, वेंकटेश भुदेवी यांच्या मूर्ती त्याशेजारी उत्सवमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने सांधार प्रकारचा प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहाच्या भिंतींत देवकोष्टके त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत

मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. त्यात चारही बाजूला असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. सुरक्षा कठड्यात प्रवेशद्वाराकडील बाजूला तीन देवकोष्टके आहेत. त्यापैकी मधल्या देवकोष्टकात बालाजी, पद्मावती लक्ष्मी, उजव्या डाव्या बाजूच्या देवकोष्टकात गरुड आणि हनुमंत यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावरील दक्षिणी शैलीतील शिखरात कुट शाल रचना शिल्प आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तुपिका, त्यावर कळस ध्वजपताका आहे

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्यापर्यंत सलग दहा दिवस येथे बालाजीचा ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी मंदिरात देवाची विशेष पूजा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अश्विन शुद्ध द्वादशीस देवाच्या उत्सवमूर्ती रथारूढ होऊन नगरप्रदक्षिणेला निघतात. या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत नगरप्रदक्षिणा सुरू होते. यात नगरातील सांस्कृतिक सामाजिक मंडळे विविध देखावे सादर करतात. नगरप्रदक्षिणा चोवीस तासांहून अधिक काळ चालते त्यानंतर देव पुन्हा मंदिरात स्थापित केले जातात

चैत्र पाडवा ते वसंत पंचमी हा देवाचा पाच दिवसांचा वसंतोत्सव विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्त, विविध ग्रंथांचे वाचन विशेष पूजा करून साजरा केला जातो. याशिवाय मार्गशीर्ष, श्रावण अधिक मासात विशेष उत्सव साजरे केले जातात. मंदिरात एकादशी, प्रदोष, शनिवार, गुरुवार, पौर्णिमा अमावस्या आदी दिवशी भाविकांची विशेष गर्दी असते

 

उपयुक्त माहिती

  • शिरपूर बस स्थानकापासून पायी १० मिनिटांवर अंतरावर
  • धुळे जिल्ह्यातील अनेक शहरांतून शिरपूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home