पुराणे व उपनिषदांनी वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा राखणारा, गुरुतत्त्वाचा आदर्श व योगाचा उपदेशक असे म्हटलेल्या दत्ताची उपासना फार प्राचीन काळापासून होत आहे. पंधराव्या शतकात नृसिंह सरस्वती या विभूतीमुळे त्याला संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयाचे पहिले अवतार मानले जातात. नृसिंह सरस्वती हे दुसरे अवतार, तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्ताचे तिसरे अवतार मानले जातात. अक्कलकोटमधील ज्या वडाच्या झाडाखाली बसून ते ध्यानधारणा करीत असत, त्या ठिकाणी असलेले हे प्रसिद्ध वटवृक्ष देवस्थान देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ अशी असंख्य भाविकांची श्रद्धा असलेल्या स्वामी समर्थ यांचे पूर्वचरित्र अज्ञात आहे. ‘श्री स्वामी चरित्र सारामृता’त अशी आख्यायिका आहे की दत्ताचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती हे अवतार समाप्तीवेळी, इ.स. १४५८मध्ये आंध्र प्रदेशातील श्रीशैल कर्दलीबनात गेले. तेथे त्यांनी ३५० वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून या वारुळावर पडली. त्या वारुळातून स्वामी समर्थ प्रकट झाले. येथून ते कलकत्ता, जगन्नाथपुरी, काशी अशा मार्गाने गोदावरीतीरी आले व इ.स. १८३८ मध्ये मंगळवेढ्यास ते प्रकट झाले. ‘स्वामी लीलामृत’ या ग्रंथात असे म्हटले आहे की ‘शके सतराशे साठात। स्वामी जगदुद्धारार्थ। प्रकटले मंगळवेढ्यात। साक्षात दत्त अवतारे॥’ यानंतर शके १७७९ (इ.स. १८५७) मधील अश्विन शुद्ध पंचमीस ते अक्कलकोटात अवतीर्ण झाले. तर काहींच्या म्हणण्यानुसार स्वामी अक्कलकोटास चैत्र शुद्ध द्विताया, ६ एप्रिल १८५६ रोजी प्रकट झाले होते.
स्वामी समर्थ यांच्या पूर्वजीवनाविषयी माहिती अनुपलब्ध आहे. मात्र ‘आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंहभान. काश्यप गोत्र. आमची मीन राशी…’ असे एकदा त्यांनी सांगितले होते. त्यांनी आपल्या जीवनकाळात अनेकांवर कृपा केली. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या आश्वासनातून त्यांनी अनेकांना धैर्य दिले. ‘जो माझी अनन्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो’, असे त्यांचे वचन होते. स्वामी समर्थांनी कर्मकांड, सोवळेओवळे आदी अवडंबर टाळून सामान्यांना नामस्मरणाचा महिमा सांगितला. अक्कलकोटमध्ये त्यांचे सुमारे २० वर्षे वास्तव्य होते. त्यातील बराच काळ ते या वडाच्या झाडाखाली बसून ध्यानधारणा करीत व भक्तांना उपदेश करीत असत. या झाडाखाली त्यांनी अनेक लीला केल्या आहेत. त्यांच्या चमत्काराच्या, प्रचितीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक भक्तांच्या समस्या व दुःख यांचे निवारण त्यांनी येथेच बसून केले आहे. सन १८७८ मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला त्यांनी तेथे समाधी घेतली. आजही चैतन्य स्वरूपात स्वामींचा वास आहे व ‘हम गया नही जिंदा है’ या वचनाची अनुभूती येथे येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींचे सान्निध्य लाभलेला हा वटवृक्ष येथे डौलाने उभा आहे. याच वटवृक्षाजवळ नंतरच्या काळात मंदिर बांधले गेले. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान म्हणून ते ओळखले जाते.
सध्याच्या वटवृक्ष मंदिराचे बांधकाम हे स्वामींचे शिष्य जोतिबा पांडे यांनी केलेले आहे. स्वामी असताना १५ वर्षे आणि त्यांच्या समाधीनंतर ४१ वर्षे जोतिबा यांनी त्यांची सेवा केली. स्वामींनी समाधी घेण्यापूर्वी जोतिबांनी त्यांना ‘माझे कसे होईल?’ असा प्रश्न विचारला. त्यावर स्वामींनी उत्तर दिले की ‘तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा. मी सदैव वटवृक्षाखाली आहे. माझे स्मरण करताच तुमच्या सन्निध आहे.’ त्यानुसार जोतिबा यांनी स्वामींची निरंतर सेवा केली. वटवृक्षाच्या शेजारी स्वामींचे मंदिर आहे. येथेच स्वामींसोबत जोतिबा यांचीही मूर्ती आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. स्वामींचे दर्शन घेण्याआधी येथील वटवृक्षाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे.
सभामंडपात भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांगेची व्यवस्था आहे. येथून गर्भगृहातील स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेता येते. दगडी बांधणीच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार व त्याबाजूला असलेले दोन स्तंभ हे चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहेत. या स्तंभांवर द्वारपाल व पानाफुलांच्या नक्षी कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवरही कलाकुसर आहे. ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती व त्यावरील भागात स्वामी समर्थांची मोठी प्रतिमा आहे. या प्रतिमेच्या वर श्रीदत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ व स्वामी समर्थांच्या निर्गुण पादुका अशा चार प्रतिमा लावलेल्या आहेत. गर्भगृहात चांदीच्या वज्रपिठावर स्वामी समर्थांची समाधी व त्यावर महाराजांची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे.
या गर्भगृहाच्या शेजारी असलेल्या मंदिरात महाराजांच्या पादुका व मूर्ती आहेत. या पादुकांना कान लावल्यावर अनेक वाद्यांचे आवाज ऐकू येतात, असा भक्तांचा अनुभव आहे. जवळच स्वामींचे शेजघर आहे. त्यात स्वामींचा पलंग व त्यांच्या अनेक वस्तू आहेत. येथे असलेल्या संग्रहालयातून स्वामींचे चित्रमय जीवनदर्शन घडते. या संग्रहालयात स्वामींची अनेक जुनी छायाचित्रे पाहायला मिळतात. मुख्य मंदिरासमोर जोतिबा मंडप आहे. या मंडपात पारायण, प्रवचनांचे आयोजन केले जाते. मंडप परिसरात मुंबईतील जोगेश्वरी येथील भक्तांनी ४० हजार पंचमुखी रुद्राक्ष वापरून बनवलेली स्वामी समर्थांची वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा आहे.
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात वर्षभरात अनेक उत्सव होतात. त्यामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन, पुण्यतिथी, वटपौर्णिमा, गुरुपौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, श्रीपाद वल्लभ पुण्यतिथी, ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी, दत्तजयंती, नृसिंह सरस्वती जयंती, गुरुप्रतिपदा, रामदास नवमी, महाशिवरात्री, तुकाराम बीज हे मुख्य उत्सव साजरे केले जातात. याशिवाय श्रीरामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी आणि नवरात्र महोत्सवही येथे होतो. स्वामी समर्थांच्या प्रकटदिन उत्सवात पाळणा सोहळा व पालखी असते. या उत्सवांच्या वेळी लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. दर गुरुवारीही हजारोंच्या संख्येने भाविक येथे येतात. दररोज सकाळी ५.१५ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेता येते. दररोज पहाटे ५ ते ५.१५ या वेळेत काकड आरती, सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत अभिषेक, सकाळी ११.३० ते ११.४५ या वेळेत नैवेद्यारती आणि रात्री ७.४५ ते ८.४५ या वेळेत शेजारती होते. मंदिर समितीतर्फे आलेल्या भाविकांना येथील अन्नछत्रामध्ये दररोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची व्यवस्था केली जाते.