वटेश्वर महादेव मंदिर

पिंपळगाव – नेर, ता. जालना, जि. जालना

जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यात कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेले पिंपळगाव नेर हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले स्थान आहे. येथील श्री वटेश्वर महादेव मंदिर हे संपूर्ण परिसराचे मुख्य श्रद्धास्थान व ग्रामदैवत मानले जाते. हे प्राचीन मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. ऐतिहासिक वारशाचा एक अत्यंत सुंदर नमुना असलेले हे मंदिर नेरचे वटेश्वर महादेव मंदिर किंवा स्थानिक भाषेत कात्नेश्वर शिव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराला ऐतिहासिक, धार्मिक आणि पौराणिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. देवगिरीच्या यादव राजांच्या काळातील वैभवशाली स्थापत्यकलेची साक्ष देणारे हे मंदिर असल्याचे मानले जाते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील सोमवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

या परिसरात प्राचीन काळापासून शिवउपासनेची मोठी परंपरा चालत आली आहे. मंदिराची मूळ रचना साधारणपणे ११व्या ते१२ व्या शतकातील म्हणजेच यादवकालीन मानली जाते. देवगिरीच्या यादव राजांच्या काळात मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणावर भक्कम आणि कोरीव मंदिरांची निर्मिती झाली. हे मंदिर त्या काळातील वास्तुरचना आणि संस्कृती कशी होती, हे स्पष्टपणे दाखवते. काळ्या पाषाणापासून बनलेल्या या मंदिरावर प्रामुख्याने हेमाडपंती स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो आणि त्यासोबतच दाक्षिणात्य स्थापत्य शैलीची छाप देखील या वास्तूवर स्पष्टपणे जाणवते. मंदिराचा मूळ भव्य सभामंडप कालपरत्वे पडला होता, त्यामुळे पुढे १८ व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि एका महत्त्वाच्या स्तंभावर कोरलेला शिलालेख हा या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या शिलालेखामध्ये “1863 नेर श्रीवटेश्वर महादेव मंदिर 1863” असा स्पष्ट उल्लेख आढळतो.

बाहेरील मुख्य रस्त्यापासून मंदिराच्या दिशेने जाताना एक भव्य दगडी स्वागत कमान लागते. ही कमान प्राचीन मंदिराच्या रचनेशी पूर्णपणे साम्य साधणारी आहे. या स्वागत कमानीवर भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे तशीच गोपुराप्रमाणे रचना या प्रवेशद्वारावरही पाहायला मिळते. या कमानीपासून मंदिरापर्यंत यायला फरसबंदी केलेला रस्ता आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला अनेक झाडे लावलेली आहेत. मंदिराचे पटांगण प्रशस्त आहे. त्यात उजव्या बाजूला भाविकांना थांबण्यासाठी तसेच सण, उत्सव आणि विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी एक मोठा निवारा म्हणजेच शेड बांधलेली आहे. पटांगणात डाव्या बाजूला एक छोटेसे महादेवाचे मंदिर दिसते आणि मंदिर परिसरात भग्नावस्थेतील काही प्राचीन ऐतिहासिक मूर्तीही जतन करून ठेवलेल्या आहेत. या विशाल पटांगणात डाव्या बाजूला जुन्या काळातील एक ऐतिहासिक षटकोनी आकाराची दगडी बारव म्हणजेच पायविहीर अस्तित्वात आहे.

मुख्य मंदिराकडे येताना सर्वप्रथम एक मोठी प्राचीन पितळी घंटा लक्ष वेधून घेते. या घंटेचे वजन तब्बल २५६ किलो इतके आहे. या घंटेच्या अगदी मागे आणि मुख्य मंदिराच्या समोर काळ्या पाषाणातील एक नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाची वास्तू आणि रचना मुख्य मंदिराच्या मूळ रचनेशी जुळणारी आहे. चार भक्कम दगडी स्तंभांवर या नंदीमंडपाचे छत तोललेले आहे. या मंडपाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यात दोन सारख्याच आकाराचे पाषाणी नंदी बसवलेले आहेत. या दोन्ही नंदींवर अलंकारांची उठावदार नक्षी कोरलेली आहे.

वटेश्वर महादेव मंदिराचे मुख्य प्रवेशद्वाराच्या वर दाक्षिणात्य शैलीतील गोपुरासारखी सुंदर रचना आहे. त्यात मध्यभागी महादेवांची आणि त्यांच्या दोन्ही बाजूंच्या देवकोष्टकांमध्ये गणपती व कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दगडातच अतिशय उत्कृष्ट कोरीव काम केले आहे. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक मोठा धातूचा त्रिशूळ ठेवलेला आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो.

हा सभामंडप एकूण सोळा भक्कम दगडी खांबांवर उभारलेला आहे. या खांबांवर कोरीव काम आणि कलाकुसर केलेली असून त्यावर विविध देवदेवतांच्या मूर्ती, गणपती आणि भगवान विष्णूच्या विविध अवतारांचे पौराणिक प्रसंग व शिल्पे कोरलेली आहेत. या सभामंडपाचा एक भाग १८ व्या शतकातील पुनर्बांधणीचा आहे. या सभामंडपाच्या छतावर मध्यभागी उजेड आणि हवा येण्यासाठी चौकोनी जागा मोकळी सोडलेली आहे.

छतावर गोलाकार नक्षीकाम असून संपूर्ण सभामंडपाचे छत गोलाकार आणि आयाताकृती रचनांचे बनलेले आहे. या सभामंडपाच्या भिंतींमध्ये नक्षीदार देवकोष्टके आहेत. त्यातील एका कोष्टकात गरुडावर स्वार झालेल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत. अंतराळात डाव्या आणि उजव्या बाजूला दोने नक्षीदार देवकोष्टके आहेत. उजव्या कोष्टकात गणपतीची आणि डावीकडे सरस्वतीची मूर्ती स्थापित आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच द्वारशाखांवर सप्तमातृका आणि इतर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

येथील कलाकुसर ही पाषाणावरील नक्षीकामाचा एक उत्तम नमुना समजली जाते. येथील शिव-पार्वतीची युगल प्रतिमा, त्यांच्या हातातील कमळपुष्प आणि त्यांची अभयमुद्रा प्राचीन मूर्तीशास्त्राच्या नियमांना अनुसरून अचूक कोरलेली आहे.

उपदेवतांच्या मूर्तींसोबत सिंह, गरुड आणि मयूर या वाहनांचे अंकन पौराणिक महत्त्व अधोरेखित करते. अनेक शिल्पांमध्ये देवतांच्या हातात पाश, अंकुश, गदा आणि चक्र ही महत्त्वाची आयुधे स्पष्टपणे ओळखता येतात.

मंदिराचे गर्भगृह आकाराने लहान असून त्यात मध्यभागी शिवपिंड प्रतिष्ठित आहे. गर्भगृहाच्या समोरील भिंतीवरील कोष्टकात माता पार्वतीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचे छतही विविध भौमितिक रचनांनी सजलेले आहे.

मंदिराला प्रदक्षिणा घालताना बाहेरील भिंतींवर दगडी नक्षीकामाचे अद्वितीय रूप दिसते. प्रदक्षिणा मार्गावर डाव्या बाजूला आणखी एक छोटे महादेवाचे मंदिर असून त्यासमोर स्वतंत्र नंदी आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतींवर म्हणजेच जंघेवर अनेक उपदेवतांच्या मूर्ती आणि नक्षीदार कोष्टके आहेत.

त्यामध्ये भगवान शिवाच्या विविध मुद्रांमधील प्रतिमा कोरलेल्या आहेत. पाषाणामध्ये वेलबुट्टी आणि गोलाकार नक्षी अतिशय बारीकपणे कोरलेली आहे. मंदिराचे मुख्य शिखर विटांनी बांधलेले असून त्यावर नंतरच्या काळात आकर्षक रंगकाम केलेले आहे.

मंदिरात दररोज सकाळी आणि सायंकाळी पूजा व आरती केली जाते. महाशिवरात्री हा या मंदिरातील सर्वात मोठा आणि मुख्य उत्सव मानला जातो.

महाशिवरात्रीला वटेश्वर महादेवाची मोठी जत्रा म्हणजेच जत्रोत्सव भरतो. हा उत्सव महाशिवरात्रीच्या एक आठवडा आधीपासूनच अतिशय उत्साहात सुरू होतो.

या निमित्ताने मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, रामायण पठण, काकडा आरती आणि कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते.

नेर गावातील आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातील हे अत्यंत प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे येथे दर्शनासाठी रोजच भाविकांची मोठी गर्दी असते. दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • जालना शहरापासून सुमारे ४६ किमी अंतरावर
  • जालना शहरापासून एसटीची बस सुविधा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही

वटेश्वर महादेव मंदिर

पिम्पलगांव – नेर, जालना, जिला। जलना

Back To Home