वरदविनायक मंदिर

महड, ता. खालापूर, जि. रायगड 

अष्टविनायक तीर्थस्थानांपैकी मुंबईपुणे महामार्गावर असलेले महड येथील वरदविनायक हे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. इच्छापूर्ती गणेश नावानेही या देवस्थानाची ओळख आहे. मुंबईपुणे मार्गावर खोपोलीपासून पाच किमी अंतरावर वरदविनायकाचे स्थान आहे. अष्टविनायकांपैकी २४ तास खुले असणारे हे एकमेव मंदिर आहे. या मंदिराचा गाभारा पेशवेकालीन आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे १८९२ पासून मंदिरात अखंड नंदादीप तेवत आहे

गणेश पुराणात या मंदिराविषयीची आख्यायिका आहे. ‘गणेश पुराणहा देशात नवव्यादहाव्या शतकात उदयास आलेल्या गाणपत्य संप्रदायातील महत्त्वाचा ग्रंथ. त्याचा रचनाकाल .. १००० ते ११०० हा आहे. या पुराणातील प्रथम खंडातील पाचव्या अध्यायातील कथा अशी की कौंडिण्यपूरचा राजा भीम यास गणेश्वराच्या कृपेने रुक्मांगद हा पुत्र झाला. एकदा तो शिकारीसाठी वनात गेला असता, त्यास वाचक्नवी ऋषींचा आश्रम दिसला. त्या आश्रमात जाऊन त्याने ऋषींना प्रणाम केला. तेथील एका कुटीत त्याची विश्रामाची व्यवस्था करण्यात आली होती. ऋषी सरोवरावर स्नानास गेले असता त्या कुटीत ऋषीपत्नी मुकुंदा आली मी तुझ्यावर मोहित झाली आहे, मला प्रसन्न कर, असे म्हणू लागली. तेव्हा रुक्मांगदाने मी असे दुष्कर्म करणार नाही, असे सांगितले. त्यावर मुकुंदाने त्याला कुष्ठरोग होईल, असा शाप दिला. ही गोष्ट इंद्रास समजल्यावर तो ऋषीपत्नीकडे रुक्मांगदाच्या रूपात आला त्यांच्या संयोगातून ऋषीपत्नीला गुत्समद हा पुत्र झाला.

एकदा मगध देशातील एका राजाकडे श्राद्धाचा सोहळा होता. त्याकरीता अनेक ऋषीमहर्षींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात गुत्समद यांचाही समावेश होता. तेथे ऋषी विद्वानांत शास्त्रचर्चा सुरू असताना त्यात गुत्समद यांनी सहभाग घेतला. ते पाहून एका ऋषीस क्रोध आला. तो म्हणाला की तू व्यर्थ मोठेपणा सांगू नकोस. वस्तुतः तू ऋषीपुत्र नाहीस, तर क्षत्रियपुत्र आहेस. तुला आमच्यासोबत बसण्याचा अधिकार नाही. ते ऐकून गुत्समद तेथून ताडकन् उठला आपली माता मुकुंदा हिच्याकडे आला. तिला विचारले की मी कुणाचा पुत्र आहे? त्यावर ती ऋषीपत्नी म्हणाली की पुत्र आपल्या पित्याचाच असतो. त्यात कसली शंका? तेव्हा गुत्समदास क्रोध आला. त्याने संतापून मातेस खरे बोलण्यास सांगितले. तेव्हा तिने त्यास खरी गोष्ट सांगितली की तो रुक्मांगदाचा पुत्र आहे. त्यावर गुत्समदाने आपल्या मातेस कंटकी म्हणजे काटेरी झाड होशील, असा शाप दिला. मंदिराजवळील बोरीचे झाड म्हणजेच ऋषीपत्नी मुकुंदा आहे, असे भाविक मानतात. यानंतर गुत्समद ऋषींनी पुष्पक वनात पंधरा हजार वर्षे घोर तपश्चर्या केली. ते पाहून गणेश त्यांना प्रसन्न झाला. गुत्समदाने त्याला नमन करून वरदान मागितले की यापुढे हे पुष्पकवन गणेशपूर या नावाने ओळखले जावे आपण स्वतः येथे वास्तव्य करून भक्तांची कामना पूर्ण करावी. या ठिकाणी गुत्समद ऋषींनी मंदिर स्थापन करून त्यास वरदविनायक असे नाव दिले. ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलातील तेविसाव्या सूक्तामध्येगणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवनीनामुपमश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रह्णणां ब्रह्मणस्पत नः शृष्णन्नूतिभिः सीद सादनम्ही ऋचा आहे. त्यात ब्रह्मणस्पतिदेवास, तुम्ही गणसमूहात गणपती असे म्हटलेले आहे. हे सूक्त गुत्समद ऋषींच्या नावावर आहे. मात्र ऋग्वेदातील गुत्समद ऋषींच्या वडिलांचे नाव वीतहव्य ऋषी असे आहे

पौराणिक समजुतीनुसार, गुत्समद ऋषींनी बांधलेल्या मंदिरातील वरदविनायकाची मूर्ती युद्धाच्या धामधुमीत, आक्रमकांच्या भयाने मंदिरानजीकच्या तळ्यात लपवून ठेवण्यात आली होती. याबाबत अशी कथा सांगण्यात येते की .. १६९० मध्ये धोंडू पौडकर नावाच्या गणेशभक्तास देवाने दृष्टान्त दिला त्यानुसार त्याला तळ्यात ही मूर्ती आढळली. ही मूळ मूर्ती काही काळ गावदेवीच्या मंदिरातील उत्तरेकडील कोनाड्यात होती. पुढे .. १७३० च्या सुमारास आताचे मंदिर बांधून झाल्यावर वरदविनायकाची नवीन मूर्ती बनवून तिची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली, तर जुनी मूर्ती भग्न स्वरूपात असल्याने ती बाजूलाच असलेल्या दत्तमंदिरात ठेवण्यात आली. तेथे जाऊन मूळ मूर्तीचे दर्शन घेता येते.

आताचे हे नवीन मंदिर कल्याणचे सरसुभेदार पेशव्यांच्या आरमाराचे सेनाखासखेल रामाजी महादेव बिवलकर यांनी बांधले असे सांगण्यात येते. विवेकानंद गोडबोले यांच्यासुभे कल्याणया १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या इतिहास संशोधन ग्रंथातया देवाची स्थापना शके १६९४ (.. १७७२) चैत्र शु. मध्ये झाली. स्थापनेस १५८ रु. १५ आणे खर्च आला’, असे म्हटलेले आहे. मात्र ही तिथी मंदिराच्या जीर्णोद्धाराची असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे. याचे कारण १७५७ मध्ये सरसुभेदार रामाजी बिवलकर यांनी महड गाव देवस्थानच्या नावे करून दिल्याची नोंद आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. त्याचे बाह्यरूप एखाद्या कौलारू घराप्रमाणे आहे. मुख्य मंदिर कोरीव दगडांचे असून मागे देवाचे तळे आहे. गाभाऱ्याच्या दारावर रिद्धीसिद्धी कोरलेल्या आहेत. दगडी सिंहासनावर गणेशमूर्ती विराजमान आहे. सिंहासनावर गजराज कोरलेले असून त्यांच्यामध्ये देवाची मूर्ती आहे. मूर्ती डाव्या सोंडेची बैठी आहे. देव्हाऱ्याच्या चारही बाजूंना हत्तीच्या आकृत्या कोरल्या आहेत. घुमटावर सोनेरी कळस आहे

येथील वरदविनायकाची त्रिकाल पूजा होते. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश जयंतीस येथे मोठा उत्सव असतो. त्या वेळी देवाची पालखी निघते तलावाला प्रदक्षिणा घालून परत येते. काही भक्त महडच्या वरदविनायकापासून पालीच्या बल्लाळ विनायकापर्यंत ३६ किमीची पदयात्रा करतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन उत्सव येथे साजरे होतात. पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या स्त्रियांची येथे ओटी भरण्यात येते. प्रत्येक संकष्टीला येथे उत्सव असतो. अष्टविनायकाचे क्षेत्र असल्यामुळे येथे दररोज भक्तांची गर्दी असते. त्यासाठी मंदिराबाहेर दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर समितीतर्फे भाविकांसाठी दुपारी १२ ते या वेळेत प्रसादाची सुविधा करण्यात आली आहे. याशिवाय भक्त निवासाचीही व्यवस्था आहे. नवसाला पावणारा देव, अशी येथील वरदविनायकाची ख्याती आहे

उपयुक्त माहिती

  • खोपोलीपासून किमी, तर मुंबईपासून ८२ किमी अंतरावर
  • पनवेल, कर्जत, खोपोली येथून एसटीची सुविधा
  • खोपोली शिळफाटा येथून महडसाठी रिक्षाची सोय
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home