पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर इ.स. १७६६ ते इ.स. १७९५ अशी सुमारे ३० वर्षे इंदौरच्या गादीवर होत्या. या काळात त्यांनी देशभरातील शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. यामध्ये महाराष्ट्रातील मंदिरांची संख्याही लक्षणीय आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव येथे असलेले वंखनाथ मंदिर हे त्यापैकी एक असून हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानला जातो. या मंदिरातील बांधकामाचे वैशिष्ट्य असे की मंदिरासमोर रस्त्याच्या पलिकडे ७० ते ८० फूटांवर असलेल्या दीपमाळेच्या वरच्या टोकावर जेव्हा दिवा लावला जातो, तेव्हा त्याचा प्रकाश थेट गर्भगृहातील पार्वती मूर्तीच्या मुखावर पडतो.
अलिबाग-रेवदंडा मार्गावर नागाव हे गाव आहे. शांताराम विष्णू अवळसकर लिखित ‘आंग्रेकालीन अष्टागर’ या ग्रंथात नागावचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आढळतात. अष्टागर म्हणजे आठ मुख्य ठाणी… ही अष्टागरे नेमकी कोणती याबाबत मतमतांतरे आहेत. काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये अलिबाग, नागाव, थळ, सासवणे, अक्षी, किहीम, साखर आणि आवास ही गावे अष्टागरात असल्याचा उल्लेख आहे, तर काही ग्रंथांमध्ये रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे अष्टागरात असल्याचे लिहिले आहे. या दोन्ही याद्यांमध्ये नागावबाबत एकमत असल्याचे लक्षात येते. १६६२च्या सुमारास कोकणातील या अष्टागराचा बराचसा भाग छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याला जोडला. १७१० साली कान्होजी आंग्रे यांनी पोर्तुगिजांचा पराभव करून हा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला.
गावात प्रवेश करताना नागाच्या प्रतिमा कोरलेली नऊ शिल्पे आहेत. त्यावरून गावाचे नाव नागग्राम झाले असावे, असे सांगितले जाते. या नावाचा अपभ्रंश नागाव असा झाला. या गावातील वंखनाथ हे शिवमंदिर प्रसिद्ध आहे. ‘आंग्रेकालीन अष्टागर’ या ग्रंथामध्ये मंदिराच्या बांधकामाचे वर्ष १७६३ दिले आहे. तर ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’च्या ‘कुलाबा गॅझेट’मध्ये बांधकामाचा काळ १७९०च्या आसपास असल्याचा उल्लेख आहे. मात्र दोन्ही संदर्भांनुसार अहिल्याबाई होळकर यांनी दिलेल्या निधीमधून नागावचे रहिवासी केशव महाजन यांनी हे मंदिर बांधले.
वंखनाथ मंदिर आणि दक्षिण दिशेले डोंगराजवळ असलेली एक मशीद उभारण्यासाठी महाजन यांना साधारण ७५ हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते.
चौलकडे जाताना मुख्य रस्त्याच्या उजवीकडे आटळे येथील खारगल्लीमध्ये हे वंखनाथ मंदिर आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या परिसरातून नंतर रस्ता बांधला गेल्यामुळे मंदिराची दीपमाळ रस्त्याच्या डावीकडे आहे. मंदिरासमोर ५० फूट लांबी व रुंदी असलेली चौरसाकृती प्राचीन दगडी पुष्करणी आहे. मोठमोठ्या काळ्या घडीव दगडांचे बांधकाम केलेल्या या पुष्करणीच्या आतमध्येही पाषाणात कोरलेली शिल्पे आहेत. उन्हाळ्यात पाणी खाली गेल्यानंतर त्यातील काही शिल्पे पाहता येतात. तसेच चारही बाजुंना कोष्टकांमध्ये सुंदर नक्षीकाम केलेले आहे. पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी रस्त्याच्या व मंदिराकडील बाजूने पायऱ्या आहेत.
मंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुळ मंदिरासमोर नंतरच्या काळात येथील मंडप बांधलेला आहे. या मंडपाच्या वरील बाजुस पत्र्याची शेड आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृहाचे बांधकाम हे काळ्या घडीव दगडांत केलेले आहे. सभामंडपाचा दरवाजा काळ्या पाषाणात कोरलेला आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला स्तंभशाखा व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. येथील स्तंभशाखांवर सुंदर नक्षीकाम आहे. सभामंडपात एका चौथऱ्यावर अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. अतंराळाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकांत गणपती व भैरवाच्या काळ्या दगडात घडविलेल्या मूर्ती आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या द्वारावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. त्यात श्रीकृष्णाच्या चरित्रातील काही देखाव्यांचा समावेश आहे. मुरली वाजविणारा कृष्ण, त्याचे सवंगडी, समोर गोमाता असलेले शिल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैष्णवांचे दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्णाला शिवमंदिरात मिळालेले मानाचे स्थान हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य सांगितले जाते. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर द्वारपाल शिल्पे व नक्षीकाम आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. येथील गर्भगृह हे काहीसे खोलवर आहे. त्यामुळे प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी वंखनाथ महादेवाची पिंडी आहे. या पिंडीवर धातूच्या पत्र्याचे आवरण व नागाची प्रतिमा आहे. समोरच्या भिंतीतील देवकोष्टकात काळ्या पाषाणातील पार्वतीची मूर्ती आहे.
या गर्भगृहाच्या कळसाचे काम नागर शैलीतील आहे व त्यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला वंखनाथाची पालखी निघते. कोकणातील पारंपरिक वाद्यांचा गजर करत पालखी गावातून फिरविली जाते. त्यानंतर मंदिरामध्ये रात्रभर भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतात. याखेरीज मंदिरामध्ये दैनंदिन पूजा, आरती होते. सोमवारी आणि विशेषतः श्रावणी सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते.