‘राम’ नामाने वाल्या कोळी ज्या ठिकाणी वाल्मिकी ऋषी झाले ते ठिकाण म्हणजे पुरंदर तालुक्यातील वाल्हे गाव. ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेल्या या गावात महर्षी वाल्मिकी ऋषी यांची संजीवन समाधी आहे. गावाच्या परिसरातच सात रांजण डोंगर आहे. जेथे दरोडेखोर वाल्या कोळी वाटसरूंना लुटत असे.
पुरंदर तालुक्यातील जेजुरीपासून १३ किमी अंतरावर असलेले वाल्हे हे गाव रामायणाच्या आधीपासून असल्याचे सांगितले जाते. हिंदू धर्माचा एक आद्यग्रंथ रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या वास्तव्याने हे गाव पावन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार पवार यांचे हे गाव असल्याने महाराजांचेही काही काळ या गावात वास्तव्य होते, असे उल्लेख आढळतात. आळंदी- पंढरपूर मार्गावर असणाऱ्या या गावात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम प्रतिवर्षी होत असल्याने वारकऱ्यांमध्येही हे गाव प्रसिद्ध आहे.
मंदिराबाबत आख्यायिका अशी, नारद मुनी या परिसरातून जात असताना वाल्या कोळी लुटीच्या इराद्याने त्यांना मारण्यासाठी धावून गेला. त्यावेळी नारद मुनींनी ‘तू हे पाप करत आहेस, त्यात वाटेकरी होण्यास तुझे कुटुंबीय तयार आहेत का’, अशी विचारणा केली. नारदांच्या या प्रश्नानंतर वाल्या कोळ्याने येथील पिंपळाच्या झाडाला नारदाला बांधून ठेवले व तो आपल्या पत्नीला आणि मुलाला पापात वाटेकरी होणार का, हे विचारण्यासाठी गेला. कुटुंबीयांनी दिलेल्या नकारानंतर त्याला आपण करत असलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला व तो नारद मुनींना शरण गेला. नारदांनी त्याला ‘राम’ नामाचा जप करण्यास सांगितले. पुढे अनेक वर्ष वाल्या कोळी येथे जप करत राहिले. काही वर्षानंतर याच मार्गाने जात असताना नारदांना वारुळातून ‘राम’ नावाचा जप ऐकू आला. त्यावेळी त्यांनी वाल्या कोळ्याला वारुळातून बाहेर काढले. राम नावाच्या जपामुळे तुझे सर्व पाप मुक्त झाले असून तू त्रिकाल ज्ञानी होशील, असा वर देऊन नारदाने त्याला रामायण लिहिण्यास सांगितले. हाच ग्रंथ वाल्मिकी रामायण म्हणून प्रसिद्ध झाला.
वाल्मिकी मंदिराबाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाला वाल्या कोळ्याने नारद मुनींना बांधून ठेवले होते. त्यामुळे ते झाड पवित्र मानून त्याची पूजा केली जाते. परिसरात असलेले दगडी बांधकामातील हे मंदिर अतिशय पुरातन म्हणून ओळखले जाते. मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपाचे नंतरच्या काळात जीर्णोद्धार केले असावे असे वाटते. या सभामंडपात वाल्मिकी ऋषींच्या जीवनातील अनेक प्रसंग चित्रांद्वारे रेखाटले आहेत. गर्भगृहात वाल्मिकी ऋषींची दगडी समाधी आहे. समाधीला लागून नारद मुनींची मूर्ती आहे, तर समोरच्या बाजुला धनुर्धारी रामाची प्रतिमा आहे.
वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम काव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी ऋषींना आद्य कवी असेही म्हटले जाते. नारद मुनींच्या भेटीमुळे वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी म्हणून नावारूपाला आले. रामायण लिहिल्यानंतर तब्बल एका तपानंतर श्री राम प्रभूंचा जन्म झाला, असे सांगितले जाते.
भाविकांना दिवसभर या मंदिरात देवदर्शन करता येते. भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे ऋषी पंचमीला येथे मोठी यात्रा भरते. त्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात.