जेथे देवांचा वास ते आवास, असे म्हटले जाते. यामुळेच अलिबाग तालुक्यातील आवास या गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे असलेल्या वक्रतुंड मंदिरामुळे या गावाचा उल्लेख स्कंदपुराणातही आलेला आहे, असे सांगितले जाते. आंग्रेकालीन ‘अष्टागर’ या पुस्तकातील माहितीनुसार, या जागृत देवस्थानाबद्दल समजल्यावर श्रीमंत नानासाहेब पेशवे स्वतः येथे आले व त्यांनी सध्याचे मंदिर बांधून दिले. तसेच पूजा–अर्चेसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाची व्यवस्थाही करून दिली होती. येथील गणेशाच्या सोंडेचा आकार हा ओमसारखा आहे. अशाप्रकारची मूर्ती दुर्मिळ समजली जाते.
या मंदिराची आख्यायिका अशी की अभिजित नावाच्या राजाला अपत्य नव्हते. अपत्यप्राप्तीसाठी येथून जवळच असलेल्या कनकेश्वर क्षेत्री महादेवाची उपासना करण्यासाठी तो गेला. त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याला वक्रतुंड मंत्राचा उपदेश केला. या मंत्राच्या उपासनेमुळे वक्रतुंड गणेश प्रगट झाले व त्यांनी राजाला पुत्रप्राप्तीचा वर दिला. तेव्हा राजाने वक्रतुंड गणेशाला येथेच राहण्यास विनविले. गणेशानेही भक्ताच्या विनंतीला मान देऊन येथे राहण्याचे मान्य केले. प्रत्यक्षात गणेशाचा म्हणजेच देवाचा येथे वास आहे, म्हणून हे गाव आवास या नावाने प्रचलित झाले.
असे सांगितले जाते की पाचशे वर्षांपूर्वी ही मूर्ती निर्जन भागात सापडली होती. तेव्हा या परिसरात केवड्याचे बन होते. येथून जवळच माईणकर नावाचा ब्राह्मण राहत असे. या भागाची साफसफाई करीत असताना एके दिवशी त्याला ही मूर्ती सापडली. त्याने सध्या जेथे मंदिर आहे, तेथे या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पुजाविधी सुरू केली. पुढे या ब्राह्मणाचा वंश वाढला नाही तरी परिसरातील ब्रह्मवृंदांकडून गणेशाची पुजाअर्चा सुरू होती. गावात आलेल्या एका प्रांत निरीक्षकाने ब्रह्मवृंदांस सांगितले की या गणेशाची पुजा माईणकर आडनावाच्या ब्राह्मणाकडूनच झाली पाहिजे. पुढे त्यानेच आपल्या ओळखीच्या यशवंत बल्लाळ माईणकर या आपटा येथील ब्राह्मणास कुटुंबासह आवासला आणले. त्यानंतर अनेक वर्षे हे झोपडीवजा मंदिर होते. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर बांधून घेतले. ‘वक्रतुंड गणपती देवालय। महाल आवास तर्फ अष्टागर मामले चेऊल जीर्णोद्धार कर्दे आपाभट भाटे मुतालिक देशमुख दि॥ बाळाजी बाजीराव पेसवे तर्फ साष्टी.’ अशी नोंद ‘आंगरेकालीन अष्टागर‘ या पुस्तकातील पृष्ठ २२ वर आहे.
आवास गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मंदिर गावातील इतर मंदिरांप्रमाणे कौलारू आहे. मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या एका मोठ्या वटवृक्षाखाली पारावर गजलक्ष्मीचे शेंदूरचर्चित शिल्प आहे. मंदिराबाहेर प्राचीन दगडी दीपस्तंभ व तुलशी वृंदावन आहे. दुमजली असलेल्या या मंदिराचे बांधकाम जुन्या पद्धतीचे व लाकडी आहे. सभामंडप व त्यामध्ये स्टेप पिरॅमिड पद्धतीची घुमटी (मुळ प्राचीन मंदिर) अशी या मंदिराची रचना आहे. जमिनीपासून काहीसे उंच असलेल्या या मंदिरात येण्यासाठी तिन पायऱ्या आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार लाकडी आहे व त्यावर कोरीव नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या वरील उत्तररांगेवरही वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडील भिंतीवर खिडक्या आहेत व त्यांच्या दोन्ही बाजूला दीपकोष्टके आहेत. या खिडक्यांच्या बाजूने दोन स्तंभ व त्यावर महिरपी कमान, अशी कलाकुसर आहे.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. दुमजली व बंदिस्त असलेल्या या सभामंडपाच्या कामात जास्तीत जास्त लाकडाचा वापर केलेला आहे. सभामंडपात असलेल्या स्तंभांवर सज्जा आहे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या सज्जावर भाविकांना बसण्याची सुविधा आहे. येथील लाकडी स्तंभांवर वरील बाजूस अतिशय नक्षीदार कलाकुसर आहे. या सभामंडपाच्या पुढील बाजूला मंदिराचे गर्भगृह आहे. येथील गर्भगृह हेच पूर्वीचे मंदिर होते. त्यानंतर मंदिराचे बाहेरून बांधकाम केले असल्याचे येथील रचनेवरून जाणवते.
गर्भगृहात एका कमी उंचीच्या वज्रपिठावर असलेल्या मखरात वक्रतुंड गणेशाची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती खूपच वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. मूर्तीचा मागील भाग पश्चिमेकडे, तर छाती व पोट पूर्वेकडे आहे. मात्र मुख उत्तरेकडे आहे. सोंड ओंकाराप्रमाणे वळलेली आहे. अशा प्रकारची मूर्ती ही दुर्मिळ मानली जाते. गाभाऱ्याला संपूर्ण दगडी असा स्वतंत्र कळस आहे. याच मूर्तीच्या बाजूला पितळी गणेशाची मूर्ती आहे. पेशव्यांनी या मंदिरासाठी दिलेल्या पालखीत ही पितळी मूर्ती ठेऊन मिरवणूक काढली जाते. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर मागच्या बाजूला मोठ्या आकाराच्या दोन शिवपिंडी आहेत. त्या अतिप्राचीन आहेत, असे सांगितले जाते. दरवर्षी भाद्रपद महिन्यात येथे दिड दिवसाचे गणपतीपूजन होते.