वैद्यनाथ (तळ्यातला महादेव) मंदिर

लातूर, ता. जि. लातूर

लातूर शहर हे राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असण्यासोबतच ते प्राचीन काळापासून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. मराठवाड्याच्या पठारावर वसलेले हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या ‘लत्तलूर’ या नावाने प्रसिद्ध होते. ते राष्ट्रकूट राजांचे उगमस्थान मानले जाते. या शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी जागृत देवस्थान असलेले वैद्यनाथ (तळ्यातला) महादेव मंदिर हे लातूरच्या समृद्ध जलव्यवस्थापन परंपरेचा आणि स्थापत्यशास्त्राचा एक महत्त्वाचा पुरावा मानले जाते. लातूर शहराच्या भरवस्तीत एका मोठ्या तलावाच्या काठी हे मंदिर वसलेले आहे. असे सांगितले जाते की या मंदिराच्या खाली एक भुयार आहे आणि ते थेट परळी वैजनाथ येथील मंदिरापर्यंत जाते.

‘वैद्यनाथ’ या नावाचा उगम संस्कृतमधील ‘वैद्य’ (डॉक्टर किंवा चिकित्सक) आणि ‘नाथ’ (स्वामी) या शब्दांपासून झाला आहे. भगवान शिव हे विश्वाचे आरोग्य राखणारे आणि व्याधींचा नाश करणारे दैवत मानले जातात. पौराणिक कथेनुसार, लंकेचा राजा रावण हा शिवाचा निस्सीम भक्त होता. त्याने हिमालयात कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले. रावणाची इच्छा होती की शिवाने लंकेत कायमस्वरूपी वास्तव्यास यावे, जेणेकरून त्याची राजधानी अजिंक्य होईल. त्यासाठी शिवाने त्याला एक ‘आत्मलिंग’ दिले आणि एक अट घातली की ‘हे लिंग तू लंकेत पोहोचेपर्यंत कुठेही जमिनीवर ठेवू नकोस. जिथे तू हे लिंग जमिनीवर ठेवशील, तिथेच ते कायमचे स्थापित होईल’.

रावण जेव्हा हे शिवलिंग घेऊन दक्षिणेकडे निघाला, तेव्हा यामुळे रावणाची शक्ती अफाट वाढेल अशी देवतांना भीती वाटली. त्यासाठी भगवान विष्णूंनी वरुणाला रावणाच्या पोटात शिरण्यास सांगितले. त्यामुळे रावणाला तीव्र लघुशंकेची इच्छा झाली. त्याच वेळी विष्णू एका गोपाळाच्या वेषात तिथे प्रकट झाले. रावणाने त्या गोपाळाकडे काही काळ शिवलिंग धरण्याची विनंती केली. मात्र, गोपाळाने ते लिंग जमिनीवर ठेवले. रावण परत आल्यावर त्याने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते हलले नाही. या प्रयत्नात रावणाला जखमा झाल्या होत्या. शिवशंकरांनी रावणाच्या जखमा बऱ्या केल्या, म्हणून त्यांच्या या रूपाला ‘वैद्यनाथ’ (वैद्यांचा राजा) असे नाव पडले.

असे सांगितले जाते की पूर्वी घुमटीवजा असलेल्या या वैद्यनाथ मंदिराच्या थेट गर्भगृहापर्यंत पाणी येत असे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. या मंदिरातील शिवपिंडीची स्थापना पांडवांनी केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथाची प्रतिकृती मानले जाते. काही भक्तांच्या मते, मंदिराखालचे भुयार थेट परळी वैजनाथ मंदिरापर्यंत जाते. सध्या या भुयारात पाणी शिरल्याने ते बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते.

जुन्या मंदिराच्या जागी नव्याने करण्यात आलेल्या बांधकामात आधुनिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. नव्याने उभारलेली ही वास्तू सुंदर दिसते. या मंदिरावर नक्षीदार कोरीवकाम आणि अनेक पौराणिक प्रसंगांची सजावट करण्यात आलेली आहे. मंदिराच्या तलावाकडील प्रवेशद्वारावर गोपुर शैलीची सजावट आहे. या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर अनेक उठावशिल्पे कोरलेली आहेत. त्यात डाव्या बाजूला विठ्ठल-रखुमाई आणि उजव्या बाजूला शिवपिंडीसह शंकराचार्य दिसतात. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. ललाटबिंबावर गणपतीसोबतच त्यांच्यावर चामर ढळणाऱ्या सेविकाही दिसतात. त्यावरील कमानदार देवकोष्टकात शंकर-पार्वती यांची आशीर्वाद देणारी मूर्ती आहे.

प्रवेशद्वारातून बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपाच्या डावीकडे व उजवीकडे आणखी दोन दरवाजे आहेत. गर्भगृहासमोर कोरीव काम असलेली, काळ्या पाषाणात घडवलेली नंदीमूर्ती आहे. या नंदीच्या पाठीवर असलेले वाशिंड वैशिष्ट्यपूर्ण आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर कैलास पर्वतावर विराजमान शिव-पार्वती यांची उठावशिल्पे आहेत; त्यांच्यासोबत गजानन आणि कार्तिकेयही आहेत. या सर्वांची वाहने म्हणजेच नंदी, सिंह, मूषक आणि मोर हे देखील तेथे अंकित केलेले आहेत. या आकर्षक शिल्पाखालीच गर्भगृहात प्रवेश करण्यासाठीचे प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या ललाटबिंबस्थानी गणपतीची प्रतिमा आहे. दरवाजाच्या शेजारी द्वारपाल आहेत. गर्भगृहात जाण्यासाठी तीन ते चार पायऱ्या उतराव्या लागतात. गर्भगृहात जमिनीशी समतल अशी शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या समोरच्या भिंतीवर मुख्य देवकोष्टकात देवी पार्वतीची भवानी स्वरूपातील मूर्ती आहे. शेजारी छोट्या उपकोष्टकात देवतांच्या धातूच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाला प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूने अनेक पौराणिक प्रसंग उठावशिल्पांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत. गर्भगृहाच्या चारही बाजूंना शोभिवंत खांब आहेत. त्यावर असलेल्या शिखराची रचना दाक्षिणात्य पद्धतीची आहे. मुख्य चार टप्प्यांत विभागलेल्या या शिखराच्या वर आमलक आणि कळस आहे.

मंदिरासमोर असलेल्या तळ्याभोवती महानगरपालिकेने ‘जॉगिंग ट्रॅक’ आणि ‘नाना-नानी पार्क’ उभारले आहे. या मंदिरात दररोज भक्तांची वर्दळ असते. महाशिवरात्रीला येथे होणाऱ्या उत्सवाच्या वेळी तर मोठी गर्दी होते. श्रावण महिन्यातही येथे विशेष उत्सव साजरा होतो. श्रावणातील प्रत्येक सोमवारी अभिषेक आणि पूजा केल्या जातात. त्या वेळी या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. दररोज सकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत या मंदिरात भाविकांना वैद्यनाथ महादेवाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • लातूर बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून लातूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२५६००८५

वैद्यनाथ (तालाब में महादेव) मंदिर

लातूर, ताल. जिला. लातूर

Back To Home