
सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील भूमीला येथून वाहणारी तापी नदी समृद्ध करते. जिल्ह्यातील धडगावचा दयादरा धबधबा, सातपुडा अभयारण्य, शिल्पानेश्वर अभयारण्य पर्यटकांची खास आकर्षणे आहेत. भिल्ल, पावरा व कोकणा या आदिवासी जमाती येथे हजारो वर्षापासून आहेत. आदिवासी समाजाचे होळी, दिवाळी आणि भिलत देवाची जत्रा हे सण खास प्रसिद्ध आहेत. याशिवाय येथील तारपा आदिवासी नृत्यही प्रसिद्ध आहे. अशा या जिल्ह्यातील नंदुरबार शहरालगत असलेल्या डोंगरावरील वाघेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे.
हे मंदिर सोळाव्या शतकातील आहे. परंतु मंदिरातील वाघेश्वरी देवीची मूर्ती ही स्वयंभू असल्यामुळे ती अनादी काळापासून पुजली जात असावी, असे सांगितले जाते. मंदिराची अख्यायिका अशी की गुजरातमधील सौराष्ट्र हे देवीचे मुळ स्थान आहे. तेथून देवी सिंहावर बसून सातपुडा पर्वत रांगेतून फिरत असताना येथील निसर्गसौंदर्य आणि उंचावरील हे स्थान देवीस पसंत पडले व
देवी येथेच स्थानापन्न झाली. उंच डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायथ्यापासून पक्का रस्ता आहे. डोंगराच्या पायथ्याशी मंदिराची कमान आहे. वाहनतळापासून सुमारे वीस पायऱ्या चढून मंदिरापर्यंत येता येते. पायऱ्यांच्या एका बाजूला डोंगरकडा तर दुसऱ्या बाजूला सुरक्षा कठडा आहे. बाजूला असलेल्या कातळावर महादेव व गणेशाचे चित्र रंगविलेले आहे. पायऱ्या चढून मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो.
हे मंदिर सोळाव्या शतकातील आहे. परंतु मंदिरातील वाघेश्वरी देवीची मूर्ती ही स्वयंभू असल्यामुळे ती अनादी काळापासून पुजली जात असावी, असे सांगितले जाते. मंदिराची अख्यायिका अशी की गुजरातमधील सौराष्ट्र हे देवीचे मुळ स्थान आहे. तेथून देवी सिंहावर बसून सातपुडा पर्वत रांगेतून फिरत असताना येथील निसर्गसौंदर्य आणि उंचावरील हे स्थान देवीस पसंत पडले व देवी येथेच स्थानापन्न झाली. उंच डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायथ्यापासून पक्का रस्ता आहे. डोंगराच्या पायथ्याशी मंदिराची कमान आहे. वाहनतळापासून सुमारे वीस पायऱ्या चढून मंदिरापर्यंत येता येते. पायऱ्यांच्या एका बाजूला डोंगरकडा तर दुसऱ्या बाजूला सुरक्षा कठडा आहे. बाजूला असलेल्या कातळावर महादेव व गणेशाचे चित्र रंगविलेले आहे. पायऱ्या चढून मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो.
गर्भगृहाच्या छतावर चतुरस्र शिखर व चारही बाजूंना भिंतीत मध्यभागी देवकोष्टके आहेत. देवकोष्टकांच्या दोन्ही बाजूस वामन स्तंभ व त्यावर कमान व कलश आहेत. शिखराच्या चारही भिंतीवर प्रत्येकी तीन अंगीशिखर आहेत. शिखरात शीर्षभागी स्तुपी व त्यावर कळस आहे. मंदिराच्या मागील बाजूस नैसर्गिक खडकांच्या रचनेतून साकारलेले म्हसोबा मंदिर आहे. येथे दगडांच्या नैसर्गिक वज्रपिठावर म्हसोबा देवाची डोक्यावर शिंगे व कान असलेली स्वयंभू पाषाणमूर्ती आहे. येथील उभ्या सपाट कातळावर विविध देवतांची चित्रे रंगविलेली आहेत. बाजूला वटवृक्षाखाली मारूतीची मूर्ती आहे.
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कमानीपासून काही अंतरावर कुंदकेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या सभामंडपात वज्रपिठावर नंदी व गर्भगृहात शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेल्या पाच फण्यांच्या नागाची पितळी प्रतिकृती, छताला टांगलेले अभिषेक पात्र व बाजूला त्रिशूल डमरू आहेत. शिवपिंडीच्या मागे भिंतीतील देवकोष्टकात गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. शिवमंदिराच्या बाजूला हिंगलाज देवीचे मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर हिंगलाज देवीची सिंहासनारूढ अष्टभुजा संगमरवरी मूर्ती आहे. देवीच्या हातात त्रिशूल, खड्ग, धनुष्य, अग्निकुंड, पद्मफुल, पाश, शंख व एक हात अभयमुद्रेत आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट, अंगावर उंची वस्त्रे व अलंकार आहेत. देवीच्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे.
मंदिरात चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिरात ग्रंथपठन, भजन, किर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दरम्यान परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात सर्व उत्सवांच्या वेळी व दर पौर्णिमेस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार, शुक्रवार व रविवारी येथे भाविकांची गर्दी होते.