उत्तरेश्वर मंदिर

केम, ता. करमाळा, जि. सोलापूर

करमाळा तालुक्यातील केम हे गाव दर्जेदार कुंकवासाठी प्रसिद्ध आहे. क्षेमवती नगरी म्हणून ओळख असणाऱ्या या ठिकाणाचे नाव बोलीभाषेत क्षेम असे झाले. त्याचाच अपभ्रंश मग केम असा झाला. या क्षेमवती नगरीचा राजा क्षेम याला झालेली गंभीर व्याधी येथील कुंडातील पाण्याने नष्ट झाली होती. त्या पवित्र कुंडात सापडलेल्या सप्तलिंगांची राजाने याच परिसरात सात मंदिरे उभारली. त्यापैकी एक प्रमुख देवालय म्हणजे उत्तरेश्वर मंदिर होय. केमचे ग्रामदैवत असलेल्या या उत्तरेश्वराची यात्रा तालुक्यात सर्वात मोठी मानली जाते.

केम परिसरात कुंकू उत्पादन कसे सुरू झाले, यासंदर्भात एक आख्यायिका आहे. त्यानुसार, क्षेमराजाची व्याधी दूर झाल्याने आनंदित झालेल्या त्याच्या राणीने पार्वतीमातेचा जप करण्याचे ठरवले. याच कुंडाच्या परिसरात नियमितपणे ती पार्वतीमातेचा जप करीत असे. एके दिवशी तिचा जप सुरू असताना साक्षात पार्वतीमाता प्रकट झाली. राणीने देवीच्या पायावर लोटांगण घातले. तिने राणीला पोटाशी धरत, सौभाग्यचिन्ह म्हणून राणीच्या कपाळावर कुंकू लावले. ते जमिनीवर सांडू नये यासाठी समोर धरलेल्या राणीच्या ओंजळीत कुंकू पडत राहिले. ओंजळ भरली तरी ते संपेना. सौभाग्यचिन्ह असलेले कुंकूच या स्थानाची खरी ओळख ठरेल, हे सांगण्यासाठीच देवीने हा चमत्कार घडवून आणला होता. तेव्हापासून कुंकू उत्पादनात केम कायम आघाडीवर राहिल्याचे सांगितले जाते.

केम नावाची जननी असलेली क्षेमवती नगरीच्या स्थापनेबाबत अख्यायिका अशी की क्षेम राजा हा उज्जैन नगरीच्या चंद्रसेन राजाचा पुत्र. चंद्रसेनाने आपले राज्य पुत्राच्या हवाली करत, त्याचे लग्न चक्रवर्ती राजाच्या कन्येसोबत लावून दिले. मात्र या लग्न सोहळ्यानंतर राजा क्षेमच्या शरीराला अचानक दुर्गंधी येऊ लागली. त्यातून रक्त आणि पू वाहू लागले. लग्नासाठी आलेल्या त्रिकालदर्शी साधुमहाराजांना हा प्रकार कळाला. मागच्या जन्मी मिळालेल्या शापाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. उपाय म्हणून त्यांनी क्षेम राजाला दक्षिण दिशेला असलेल्या सप्तलिंग कुंडात स्नान करण्यास सांगितले. राजाने दक्षिण दिशेकडे आपली भ्रमंती सुरू केली. पण सप्तलिंगकुंड सापडेना. त्याच्या शोधात राजा करमाळ्यातील माळवाडी म्हणजेच मलवडी येथे पोहोचला. तेथून दक्षिणकडे जात असताना त्याला एक झरा दिसला. त्याचे पाणी पिण्यासाठी प्रवाहात हात घातल्याबरोबर राजाच्या हाताची व्याधी नाहीशी झाली

हा चमत्कार पाहून राजा आनंदित झाला. त्याने आपल्या सेवकांना सांगून तो झरा मोठा करण्यास सांगितले. त्यासाठी केलेल्या खोदकामात तिथे एकामागोमाग एक अशी सात शिवलिंगे सापडली. मग राजाने तेथे एक मोठे कुंड निर्माण करून त्यात स्नान केले त्याची व्याधी नष्ट झाली. त्यानंतर राजाने या ठिकाणी क्षेमवती नगरी उभारण्याचे ठरवले. त्या नगरीच्या अवतीभवती त्याने कुंडात सापडलेल्या या सात लिंगांची स्थापना केली. उत्तर दिशेला उत्तरेश्वर, दक्षिण दिशेला दक्षिणेश्वर आणि मध्यभागी असलेल्या मंदिराला मध्यमेश्वर असे नाव मिळाले. इतर चार ठिकाणी उभारलेल्या मंदिरांना घुटकेश्वर, रामेश्वर, केमेश्वर आणि शंकरेश्वर अशी नावे पडली. उत्तरेश्वर महात्म्य या ग्रंथात याचा उल्लेख आहे.

केम गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिरासमोर मोठी प्रवेशकमान आहे. या कमानीच्या महाद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वारावर असलेल्या देवकोष्टकांत हनुमानाच्या समोरासमोर दोन मूर्ती आहेत. मंदिराभोवती असणाऱ्या आवारभिंतीत आतील बाजूला अनेक ओवऱ्या आहेत. खुला मंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील मंडपात एका चौथऱ्यावर पांढराशुभ्र नंदी आहे. मुळ मंदिरासमोर हा मंडप नंतरच्या काळात बांधल्याचे जाणवते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या छताकडील बाजूला देवकोष्टकांमध्ये गणपती, गरुडहनुमान, शंकरपार्वती आदी देवदेवतांच्या मूर्ती आहेत. ललाटबिंबावर गणपती विराजमान आहे.

हेमाडपंती रचना असलेल्या या मंदिराचा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. येथे दोन कासवमूर्ती आहेत. त्यापैकी एक संगमरवरी तर दुसरी धातूची आहे. येथील देवकोष्टकांत लक्ष्मीविष्णू आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तींची उठावशिल्पे द्वारपाल आहेत. गर्भगृहाचा उंबरठा आणि ही सारी शिल्पे चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहेत. गर्भगृहात अखंड काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहे. या पिंडीच्या मागे त्यावर उत्सवप्रसंगी चढविण्यात येणारा मुखवटा आहे

मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. आख्यायिकेत उल्लेख असलेली मोठी बारवही येथे आहे. तिची बांधणी पुष्करणीकुंड स्वरूपाची आहे. त्यात उतरण्यासाठी दोन बाजूंनी दरवाजे आहेत. तेथून पायऱ्या उतरून बारवेच्या पाण्यापर्यत जाता येते. याशिवाय या परिसरात संगमरवरी मूर्ती असलेले दत्त मंदिर, काळ्या कातळात घडवलेली मोठी मूर्ती असलेले हनुमान मंदिर नृसिंह मंदिर या लहान लहान मंदिरांचा समावेश आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला काही वीरगळ, पुरातन मूर्ती शिवपिंडी आहेत.

मंदिरात वर्षभर अनेक सणउत्सव साजरे करण्यात येतात. त्यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा, मृग नक्षत्र चंदन उटी सोहळा, नागपंचमी, विजयादशमी, श्रीदत्त जन्मोत्सव, मकर संक्रात, ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधी सोहळा, तुकाराम बीज, एकनाथ षष्ठी आदी दिवस उत्सवांचा समावेश आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारी देवाची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा असते, तसेच तिसऱ्या सोमवारी पंचक्रोशीतील सप्तलिंग बंधुभेट पालखी सोहळा असतो. महाशिवरात्रीची यात्रा हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असतो. हा उत्सव पाच दिवस चालतो

महाशिवरात्रीला लघुरुद्र अभिषेकाने या सोहळ्याची सुरूवात होते. यावेळी पंचधातुच्या नंदीवरून देवाची मिरवणूक काढली जाते. रात्री बारानंतर निघालेला हा देवाचा छबिना पूर्वेकडील वेशीतून गावात प्रवेश करतो. गावात आणि गावाभोवती असलेल्या सप्तलिंगापैकी साऱ्या लिंगांच्या ठिकाणी देवाचा छबिना जातो. प्रत्येक ठिकाणी आरती होते. मग पुन्हा वेशीतून बाहेर येऊन पहाटे सूर्योदयाच्या वेळी छबिना मंदिरात परततो. मात्र यावेळी एक प्रथा पाळण्यात येते. सूर्याची किरणे गर्भगृहातील पिंडीवर पडल्याखेरीज छबिना मंदिरात प्रवेश करत नाही. चिखलठाण आणि बिटरगाव येथूनही यावेळी खास दिंड्या येतात. दुसऱ्या दिवशी गावात कुस्ती स्पर्धा होते. या स्पर्धेलाही मोठी परंपरा आहे. त्यासाठी खूप दूरवरून मल्ल येथे येत असतात

या गावातील उत्सवात वाजणारी हलगी नागनाथ मंजुळे यांच्याफॅण्ड्रीया चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली. त्यातील प्रमुख कलाकार असलेला सोमनाथ अवघडे याच गावचा रहिवासी आहे. त्या चित्रपटात केम गाव आणि हलगी याचा उल्लेख येतो. सोमनाथचे वडिल लक्ष्मण अवघडे हेही हलगी वादक आहेत त्यांचा हलगी वाद्यवृंद परिसरात प्रसिद्ध आहे. केम गावात हळद, कुंकू आणि अन्य अनुषंगिक उत्पादनांची मोठी उलढाल होते. गावात रोज चार ते पाच टन कुंकू हळदीची निर्मिती होते देशात ते अनेक ठिकाणी पाठवले जाते. त्यामुळे गावात अनेकांना रोजगार मिळाला आहे

उपयुक्त माहिती

  • करमाळा येथून ३६ किमी, तर सोलापूर येथून ११० किमी अंतरावर
  • करमाळा येथून एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिरात भक्तनिवासाची सुविधा आहे
Back To Home