दिशेवरून महादेवाला उत्तरेश्वर, दक्षिणेश्वर अशी नावे दिली गेली आहेत. भारतात उत्तरेश्वर नावाने अनेक प्रसिद्ध शिव मंदिरे आहेत. त्यापैकी ओडिशातील भुवनेश्वर येथील १२ व्या शतकातील उत्तरेश्वर शिवमंदिर आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर व तळेगाव-धामढेरे येथील उत्तरेश्वर महादेव मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. याशिवाय नांदेड, बीड आदी जिल्ह्यांत उत्तरेश्वर महादेवाची देवालये आहेत. असेच एक प्राचीन व प्रसिद्ध देवालय माढा शहरातील कसबा पेठेत आहे. येथील जोड मंदिर उत्तरेश्वर परमेश्वर नावाने ओळखले जाते.
काही अभ्यासकांच्या मते ही मंदिरे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीची यादव राजांच्या काळातील असावीत. मंदिरावरील शिल्पकाम व स्तंभाची रचना पाहता ती यादवकालीन मंदिरांशी साधर्म्य सांगणारी वाटतात. दुसरा मत प्रवाह असा आहे की ही मंदिरे सुमारे तीनशे वर्षापूर्वी निंबाळकर घराण्यातील कर्तबगार राजे रावरंभा निंबाळकर यांनी बांधली असावीत. निंबाळकर घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी पूर्वापार सोयरिकीचे संबंध होते. याच घराण्यात रावरंभा निंबाळकर जन्मास आले व कर्तबगारीने जहागिरदार झाले. पुढे पेशवा बालाजी विश्वनाथ यांच्याशी वितुष्ट झाल्याने निंबाळकर मोगलांकडे व तिथून निजामाच्या पदरी गेले. इसवीसन १७१० ते १७३६ सालादरम्यान रावरंभा निंबाळकर माढा येथे वास्तव्यास असताना त्यांनी ही मंदिरे बांधली असावीत, असा अभ्यासकांचा कयास आहे. एकंदरीत ही मंदिरे कमीतकमी ३०० वर्षे प्राचीन आहेत हे मात्र नक्की.
मंदिराबाबत असे सांगितले जाते की उत्तर दिशेला मुख असलेल्या शिवमंदिरास उत्तरेश्वर नावाने ओळखले जाते तर पूर्वेकडे मुख असलेल्या शिवमंदिरास पूर्वेश्वर नावाने संबोधले जात असे. पुढे अपभ्रंश झाल्याने पूर्वेश्वरास परमेश्वर नावाने संबोधले जाऊ लागले. त्यामुळे येथील मंदिरे उत्तरेश्वर व परमेश्वर नावाने प्रसिद्धी पावली. असे सांगितले जाते की परमेश्वर मंदिराच्या गर्भगृहात पहाटेची सूर्यकिरणे अभिषेक करतात तर संध्याकाळची सूर्य किरणे उत्तरेश्वराच्या गर्भगृहात अभिषेक करतात.
ही मंदिरे शहराच्या वेशीजवळ कसबा पेठ भागात आहेत. मंदिरास दगडी बांधणीची भक्कम तटबंदी व त्यात प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात दोन्ही मंदिरांना सामायिक असा एकच नंदीमंडप आहे. नंदीमंडपात पाषाणी बांधणीच्या चौथऱ्यावर चारही कोनांवर चार नक्षीदार स्तंभ आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व कणीवर हस्त आहेत. हस्तांवरील तुळईवर छत आहे. अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहेत. चौथऱ्यावर मध्यभागी नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीचे मुख परमेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आहे. नंदीच्या गळ्यात घुंगरमाळा व पाठीवर झुल कोरलेली आहे. नंदी मूर्तीच्या बाजूला स्तंभाला टेकलेली चतुर्भुज विष्णूची पाषाणमूर्ती आहे. विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहे. देवाच्या पायाजवळ गरूड व हनुमान कोरलेले आहेत. विष्णू मूर्तीच्या बाजूला तीन शिवपिंडी आहेत. नंदीमंडपाच्या चौथऱ्यास लागून जमिनीवर काही वीरगळ शिल्पे, सतीशिळा व कन्या शिल्प आहेत. प्रांगणात प्राचीन विहीर आहे. या परिसरातही काही वीरगळ, नंदी व इतर शिल्पे विखुरलेली आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी उत्तरेश्वर मंदिराची संरचना आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कठडा व त्यावर चार अर्धस्तंभ आहेत. सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. प्रवेशद्वाराकडील चार अर्धस्तंभ व सभामंडपाच्या मध्यभागी असलेले चार स्तंभ नक्षीदार आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. चार स्तंभांच्या मधील अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहेत. मंदिरात दगडी फरसबंदी आहे व येथील चार स्तंभांच्या मधे चौकोनी रंगशिळा आहे. कधीकाळी रंगशिळेवर देवाच्या रंगभोगासाठी नृत्य, नाटीका, गायन, वादन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन व अंतराळाच्या दर्शनी भिंतीत दोन अशी एकूण चार देवकोष्टके आहेत.
अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर पाषाणात कोरलेली स्वागतनक्षी आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला खाली शैव व वैष्णव द्वारपाल, द्वारापलिका आणि चामरधारिणी शिल्पे आहेत. द्वारशाखांवर पर्णशाखा, पुष्पशाखा व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व तोरणात पुष्प नक्षी आहेत. मंडारकास असलेल्या चंद्रशिळेच्या दोन्ही बाजूस कीर्तीमुख व गजथर आहे. गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. गर्भगृहाचे छत भिंतींवर तोललेले आहे व वितानावर चक्राकार नक्षी आणि त्यामध्ये पाषाणी झुंबर आहे.
उत्तरेश्वर मंदिराच्या बाजूला परमेश्वर मंदिर आहे. दोन्ही मंदिरांची रचना साधारणतः सारखीच आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत. कठड्यावरील चार अर्धस्तंभ व सभामंडपाच्या मध्यभागी असलेले चार स्तंभ नक्षीदार आणि इतर स्तंभ सपाट चौकोनी आहेत. मधील चार स्तंभांच्या मध्यभागी चौकोनी रंगशिळा आहे. सभामंडपात देवकोष्टके आहेत व अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर स्वागतशिळा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला द्वारपाल, चामरधारिणी यांची शिल्पे व नक्षीदार द्वारशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आणि मंडारकास चंद्रशिळा व कीर्तीमुख आहेत. गर्भगृहातील शिवपिंडी उत्तरेश्वराच्या शिवपिंडीपेक्षा तुलनेने लहान आहे.
महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. या काळात मोठ्या संख्येने भाविक या मंदिरांत दर्शनासाठी येतात. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासोबतच नागपंचमी, श्रावण मास व वर्षभरातील इतर सण व उत्सवांच्या वेळी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या तुलनेने अधिक असते. इतिहासाची धरोहर असलेली ही मंदिरे पाहण्यासाठी स्थापत्यशास्त्र व शिल्पकला अभ्यासकांची येथे कायमच ये-जा असते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक या मंदिरांमध्ये दर्शनासाठी येऊ शकतात.