बीड जिल्ह्याची ओळख सध्या ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी असली, तरी एकेकाळी हा प्रदेश अत्यंत समृद्ध होता. या जिल्ह्यात अनेक राजघराण्यांनी आपल्या राजधानीची शहरे वसवली होती. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून मांजरा, तेरणा आणि कारंजा यांसारख्या नद्या वाहतात. या तालुक्यात इतिहासाचा समृद्ध वारसा सांगणारी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. तालुक्यात कंकाळेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, संत रामगिरी बाबा समाधी आणि धारूरचा किल्ला ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. याच तालुक्यातील पिंपरी गावातील उत्तरेश्वर महादेव मंदिर हे पौराणिक संदर्भ असलेले प्राचीन मंदिर विशेष प्रसिद्ध आहे.
मूळ हेमाडपंती स्थापत्यशैलीतील बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे आठशे ते हजार वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज जाणकार व्यक्त करतात; परंतु हे मंदिर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे येथील पुजारी सांगतात. या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की श्रीराम वनवासात असताना रावणाने सीतेचे हरण केले. सीतेला घेऊन रावण आकाशमार्गे जात असताना जटायू पक्ष्याने त्याच्याशी युद्ध केले. या युद्धात जटायू जखमी होऊन जमिनीवर पडला. श्रीराम सीतेचा शोध घेत असताना त्यांची जखमी जटायूशी गाठ पडली. त्यावेळी सीतेचे हरण रावणाने केल्याचे आणि तो तिला लंकेला घेऊन गेल्याचे जटायूने रामाला सांगितले व प्राण सोडले. याच जटायू पक्ष्याचे उत्तरकार्य रामाने या ठिकाणी केले, म्हणून या मंदिरास ‘उत्तरेश्वर महादेव’ असे नाव पडले.
हे मंदिर गावापासून जवळच रहदारीच्या रस्त्याला लागून आहे. मंदिराला सुमारे बारा फूट उंच भक्कम तटबंदी आहे आणि त्यामध्ये दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांची चित्रे रंगवलेली आहेत, तर प्रवेशद्वारावरील पाषाण तोरणाखाली गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारावर चक्रनक्षी व दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. छतावरील कठड्यात गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती प्रतिष्ठित आहेत. तटबंदीमध्ये आणखी तीन दरवाजे आहेत.
तटबंदीतील मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर सभामंडपात प्रवेश होतो. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी पाच नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. येथे देवाची उत्सवकाळात वापरली जाणारी पालखी ठेवलेली आहे. सभामंडपात, अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर व्यासपीठावर नंदीची मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणातील व पांढऱ्या रंगाने रंगविलेली आहे. नंदीसमोर कासवाचे शिल्प आहे आणि त्यापुढे अंतराळ आहे. अंतराळात सुमारे बारा गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत. अंतराळाच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंग व अन्य देव-देवतांची चित्रे चितारलेली आहेत.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार अरुंद व कमी उंचीचे आहे. द्वारशाखांवर वेलबुट्टीची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात जमिनीवर असलेली शिवपिंडी स्वयं श्रीरामाने स्थापन केली असल्याचे सांगितले जाते. शिवपिंडीवर छत्र धरलेला चांदीचा नाग आहे आणि जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत व्यासपीठावर उत्तरेश्वर महादेवाचे चांदीचे मुखवटे ठेवलेले आहेत. उत्सवकाळात हे मुखवटे पालखीत व दर्शनासाठी ठेवले जातात.
मंदिराच्या गर्भगृहावर तीन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या खालील दोन थरांत प्रत्येकी आठ देवकोष्ठके व त्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या वर निमुळत्या होत गेलेल्या तिसऱ्या थरात पर्णलता नक्षी आहे. शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत. त्यावरील कळस व ध्वजपताका लक्ष वेधून घेतात. या मंदिराच्या बाजूला प्रांगणात संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर, श्रीराम मंदिर व मारुतीचे मंदिर आहे. या तिन्ही मंदिरांच्या छतावर तीन थरांचे अष्टकोनी शिखर आहे. मंदिराच्या प्रांगणात भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास, मंदिर ट्रस्ट कार्यालय व इतर वास्तू आहेत.
मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक जत्रोत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवकाळात तीन दिवस येथे विविध वस्तूंची दुकाने सजत असल्याने परिसरास तात्पुरत्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. गृहोपयोगी वस्तू, कृषी अवजारे, मनोरंजनाची साधने, कृषी उत्पादने, कपडे, घोंगड्या आणि खाद्यपदार्थ इत्यादी वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून लाखोंची उलाढाल होते.
महाशिवरात्रीला व श्रावणातील चौथ्या सोमवारी देवाची पालखी मिरवणूक नदीपर्यंत जाते. तेथे देवाचा महाअभिषेक झाल्यावर पालखी ग्रामप्रदक्षिणेला निघते. पहाटे पाच वाजता पालखी पुन्हा मंदिरात येते. फाल्गुन मासात देवाचा विशेष उत्सव साजरा केला जातो. चैत्र पाडवा ते रामनवमी दरम्यान हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सर्व सण व उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या आणि प्रदोष अशा दिवशी भाविकांचा ओघ वाढलेला असतो.