पुण्यातील अजब नाव असलेल्या देवस्थानांपैकी एक म्हणजे उंटाड्या मारुती मंदिर. शहरातल्या रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयासमोरील हे प्रसिद्ध मंदिर ३५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
उंटाड्या मारुतीविषयी वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. राजस्थानातील व्यापारी उंटावरून सामान लादून पुण्यात व्यापारासाठी येत असत. त्यावेळी या परिसरात एक विहीर होती. तेथे उंटांना बांधण्याची व्यवस्था होती. तेथे हे व्यापारी आपले उंट बांधून व्यापाराला पुढे जात असत. त्यामुळे या देवस्थानाला ‘उंटाड्या मारुती’ असे नाव पडले, असे म्हटले जाते. दुसरी कथा अशी की, मराठा सरदार रास्ते यांच्या सैन्यात उंट दळ होते. त्या दळातील उंट बांधून ठेवण्याची जागा येथे होती. या उंट दळाच्या वतीने हे देवस्थान बांधले गेले. म्हणूनच हा ‘उंटाड्या मारुती’ .
या मंदिराला ‘मद्रासी मारुती’, असेही म्हटले जाते. या परिसराची मालकी अखेरच्या काळात सरदार श्रीनिवास मुदलीयार यांच्याकडे होती. मुदलीयार हे आडनाव मूळचे तमीळ अर्थात तत्कालीन मद्रास प्रांतातील. त्यामुळेच नंतरच्या काळात त्याला ‘मद्रासी मारुती’, असे बोलले जाऊ लागले. सरदार मुदलीयार यांनी आपल्या जमिनी अनेक धर्मादाय कामांसाठी दान केल्या. १९०८ मध्ये त्यांनी केईएम रुग्णालयाला जागा दिली. त्याच वेळी रुग्णालयाच्या उभारणीबरोबर देवस्थानाचाही जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. मुदलीयार कुटुंबीयांनी पुढे ट्रस्ट स्थापन करून, त्यामार्फत या परिसराची देखभाल करण्यास सुरुवात केली. त्यांनीच १९५३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवस्थानाचे आणखी एक नाव म्हणजे रास्ता पेठेतला म्हणून रास्ता पेठ मारुती.
हे देवस्थान उंटाड्या व मद्रासी या अजब नावांनी प्रसिद्ध असले तरी त्याचे मूळ नाव ‘व्याधीहर मारुती’, असे आहे आणि तसे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच चिन्हांकित करण्यात आले आहे. व्याधीहर म्हणजे वेदना, दु:ख दूर करणारा. ३५० वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात लाकडावरील कलाकुसर पाहायला मिळते.
गाभाऱ्याच्या बाहेर भिंतीला लागून डाव्या बाजूला गणेशाचे दर्शन होते. व्याधीहर गणपती म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. ही मूर्ती द्विभुज आहे. असे सांगितले जाते की, पेशवे लढाईवर जाताना या मंदिरात मारुती आणि गणपतीचा आशीर्वाद घेऊन पुढे निघायचे. पेशव्यांप्रमाणे त्यांचे सेनाप्रमुख सरदार रास्ते हेदेखील निस्सीम गणेशभक्त. ते या गणपतीच्या दर्शनासाठी नियमितपणे येत असत, असे म्हटले जाते. आजही दर मंगळवारी येथे गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला भिंतीत विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे. या स्थानाचे जतन करण्याच्या दृष्टीने आता गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सर्वांना काही अंतरावरून देवाचे दर्शन मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वीच्या काळात हे मंदिर लहान होते. मंदिरासमोर मोठी विहीर होती; पण पुढे नूतनीकरण करताना सुरक्षेच्या कारणास्तव ही विहीर बुजवण्यात आली. रविवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत, तसेच शनिवारी सकाळी ७ ते १ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत देवदर्शन करता येते.