गोपी व कृष्णाच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीकम्हणजेरासक्रीडा’. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने रासक्रीडा केली होती, अशी देशात तीन स्थाने सांगितली जातात. त्यात मथुरा, द्वारका व नाशिकमधील ‘मुल्हेर’ या ठिकाणांचा समावेश आहे. मुल्हेर येथील उद्धव महाराज मठात कोजागरी पौर्णिमेच्या रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत रासक्रीडा उत्सव साजरा होतो. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व असलेल्या येथील या सोहळ्याला ४०० वर्षांची परंपरा आहे.
उद्धव महाराज यांचे मूळ नाव शिवबा. १६४६ साली शिवबाचा जन्म झाला. अल्पावधीत माता-पित्याचे छत्र हरपल्याने मुल्हेर येथे राहणाऱ्या मामाने त्याचा सांभाळ केला. लहानपणापासूनच शिवबाचा कृष्णभक्तीकडे ओढा होता, परंतु त्याची ही कृष्णभक्ती मामाला रुचत नव्हती. त्यामुळे कोजागरी पौर्णिमेला मुल्हेरमधील काशिराज महाराजांच्या मठात होणाऱ्या रासक्रीडा उत्सवाच्या दिवशी मामाने त्याला घरात कोंडून ठेवले. आपल्या प्रिय भक्ताची ही अडचण ओळखून प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्याच्यासमोर येऊन त्याला रासक्रीडा दाखवली, अशी आख्यायिका आहे. या घटनेनंतर शिवबाचे महत्त्व परिसरात वाढू लागले. १६६० साली रामदास स्वामी मुल्हेर येथे आले असता त्यांनी शिवबाचे खरे स्वरूप ओळखले व हा कृष्णाचा भक्त म्हणून त्याचे नाव उद्धव ठेवले. तेव्हापासून शिवबाची ओळख ‘उद्धव महाराज’ अशी झाली. काशिराज महाराजांच्या अनुग्रहानंतर त्यांनी स्वतःला धर्मकार्य व समाजकार्याला झोकून दिले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेल्या दृष्टांतामुळे उद्धव महाराजांनी ‘स्वात्मबोध’ हा ग्रंथ, तर संत एकनाथांच्या दृष्टांतानुसार ‘भक्ती प्रकाश’ ग्रंथ लिहिला.
असे सांगितले जाते की स्वतः श्रीरामांनी भील्लाच्या रूपात येऊन उद्धव महाराजांना भागीरथीच्या पवित्र पाण्याने स्नान घातले होते. तेव्हापासून दर १२ वर्षांनी भागीरथी येथे प्रगट होते. उद्धव महाराजांच्या समाजकार्यास हातभार म्हणून बादशाह औरंगजेबाने त्यांना चार गावे जहागिरी म्हणून दिली होती. १७२२ साली उद्धव महाराजांनी आश्विन शुद्ध पौर्णिमेला (कोजागरी) मुल्हेर येथे समाधी घेतली. या उद्धव महाराजांचा संप्रदाय देशभर पसरला असून संपूर्ण देशात मुल्हेरमधील मठ हा उद्धवस्वामी संप्रदायाचा एकमेव मठ समजला जातो.
उद्धव महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांचे मंदिर बांधले. मुल्हेर गावाला लागूनच असलेल्या निसर्गरम्य परिसरात हे स्थान आहे. हे मंदिर लाकडी बांधणीचे व दुमजली आहे. तीनही बाजूंनी मोकळ्या असलेल्या सभामंडपातील लाकडी खांबांवर पूर्ण मंदिर उभे असल्याचे दिसते. या मंदिराला भिंती नाहीत. केवळ लाकडांचा वापर करून ते बांधण्यात आले आहे. सभामंडपाच्या पुढील भागात उद्धव महाराजांची संजीवन समाधी आहे. या समाधी स्थानाच्या मागे उद्धव महाराजांची मूर्ती व त्यामागे श्रीलक्ष्मी व नारायण यांच्या काळ्या पाषाणातील कोरीव मूर्ती आहेत.
मंदिराच्या आवारात अनेक प्राचीन वृक्ष आहेत. त्यामध्ये एक आहे उद्धव महाराज यांच्या निर्वाणानंतर (१७२२ साली) त्यांच्या शिष्याने लावलेले जाईचे झाड. याच झाडाची फुले उद्धव महाराज यांच्या समाधीवर वाहिली जातात. याशिवाय मंदिराच्या आवारात हनुमंत व गणेश यांची मंदिरे आहेत. असे सांगितले जाते की, समर्थ रामदास स्वामी यांचे येथे सहा महिने वास्तव्य होते. येथील हनुमंताची मूर्ती त्यांनीच स्थापित केली आहे.
उद्धव महाराज मंदिरात दरवर्षी आश्विन शुद्ध पौर्णिमेला (कोजागरी पौर्णिमा) साजरा होणारा रासक्रीडा उत्सव हा येथील मोठा सोहळा. उद्धव महाराजांचे गुरू काशिराज महाराज यांनी १६४० पासून हा उत्सव येथे सुरू केला. त्यानंतर ती परंपरा उद्धव महाराजांनी सुरू ठेवली. येथील उत्सवाची सुरुवात रासचक्राच्या सजावटीपासून सुरू होते. मंदिरासमोरील मोकळ्या जागेत सुमारे २५ फूट व्यासाचे चक्र तयार करून दोरीच्या साह्याने ते विणले जाते. त्याला केळीची पाने व झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. सर्व उपस्थित भाविक ‘उद्धव महाराज की जय’ असा जयघोष करत हे चक्र रासस्तंभावर चढवतात. हे चक्र म्हणजे ‘मंडल’ होय. अशा मंडलाखाली गोपिका कृष्णासोबत वृंदावनात रासक्रीडा खेळत. त्या मंडलाचे प्रतीक म्हणजे हे ‘रासचक्र’ मानले जाते.
या उत्सवाच्या वेळी गावापासून मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर रांगोळ्या काढल्या जातात. मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते. रात्री ९ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत हा खेळ सुरू असतो. यावेळी ‘रासचक्रा’खाली अनेक रागांतील १०५ पदे गायली जातात. त्यामध्ये परंपरागत दुर्मिळ शास्त्रीय रागांचा समावेश असतो. ही सर्व पदे संस्कृत, हिंदी, गुजराती, अहिराणी भाषेतील आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवीनंतर ‘रासचक्र’ रासस्तंभावरून खाली उतरविल्यावर या महोत्सवाची सांगता होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश येथून हजारो भाविक उपस्थित असतात. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व असलेला हा सोहळा शतकानुशतके अखंडपणे येथे साजरा होत आहे. दररोज सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मंदिरात जाऊन उद्धव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेता येते.