बारा ज्योतिर्लिंग मंदिर

अकोला, ता. अकोला, जि. अकोला

ज्योतिर्लिंग याचा शब्दशः अर्थ ज्योतिचे म्हणजेच प्रकाशाचे लिंग असा होतो. हिंदू धार्मिक परंपरेनुसार, साक्षात् भगवान शंकर ज्योतिस्वरूपात ज्या ज्या स्थानी प्रकट झाले, त्या स्थानांना ज्योतिर्लिंग असे म्हटले जाते. शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेनुसार, संपूर्ण ब्रह्मांडात शंकराची असंख्य लिंगे व उपलिंगे आहेत. त्यातील बारा लिंगांना मुख्य लिंग मानले जाते. हीच द्वादश ज्योतिर्लिंगे होत. या ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती ऐतिहासिक अकोला शहरातील बारा ज्योतिर्लिंग मंदिरात प्रतिष्ठापित आहे. शहरातील अनेक भाविक येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येतात.
सोमनाथ (सौराष्ट्र, गुजरात), मल्लिकार्जुन (श्रीशैलम्, आंध्र प्रदेश), महाकालेश्वर (उज्जैन, मध्य प्रदेश), ओंकारेश्वर (ओंकारेश्वर, मध्य प्रदेश), केदारनाथ (केदारनाथ, उत्तराखंड), भीमाशंकर (भीमाशंकर, महाराष्ट्र), काशीविश्वनाथ (वाराणसी, उत्तर प्रदेश), त्र्यंबकेश्वर (त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र), वैद्यनाथ (देवघर, झारखंड), नागेश्वर (द्वारका, गुजरात), रामेश्वर (रामेश्वरम्, तामिळनाडू) आणि घृष्णेश्वर (औरंगाबाद, महाराष्ट्र) अशी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. त्यांच्या उत्पत्तीबद्दल विविध आख्यायिका व मते आहेत. काहींच्या मते ही १२ आदित्यांची प्रतिके आहेत, ती ब्रहात्मलिंगे वा सुप्तावस्थेत असलेली ज्वालामुखीची उद्रेकस्थाने आहेत. शिवपुराणातील कथेनुसार, एकदा ब्रह्मा, विष्णु व महेश यांच्यात श्रेष्ठत्त्वावरून वाद झाला. तेव्हा भगवान शिव तिन्ही लोकांना भेदणाऱ्या विशाल व अनंत प्रकाश स्तंभाच्या स्वरूपात प्रकट झाले. ज्योतिर्लिंगे ही त्याच अनादी-अनंत प्रकाशस्तंभाची प्रतिके आहेत.
भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेची जडणघडण करणाऱ्या या पवित्र बारा स्थानांची यात्रा ज्यांना करता येत नाही, अशा भाविकांना एकाच ठिकाणी त्यांचे दर्शन व्हावे या सद्‌हेतूने अकोल्यामध्ये हे मंदिर उभारण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात, मुख्य मार्गावर वसलेल्या या दुमजली मंदिरात १९८२ मध्ये महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर मुख्य शिवलिंगाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी मंदिराचे स्वरूप छोटेखानी होते. कालौघात या मंदिराचा लौकिक परिसरात पसरल्याने येथे दर्शनासाठी शहराच्या विविध भागांतील भाविक येऊ लागले. त्यामुळे मंदिराची जागा अपुरी पडल्याने मंदिर उभारण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला. २०११ मध्ये लोकवर्गणीतून या मंदिराची नवीन वास्तू उभी राहिली. आधुनिक पद्धतीची अद्वितीय वास्तुकला आणि महादेवाच्या महतीमुळे अकोल्यातील हे एक महत्त्वाचे मंदिर ठरले आहे.
१४ हजार फूटांच्या विशाल क्षेत्रफळात हे मंदिर वसले आहे. या मंदिराला आकर्षक प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील परिसरात तसेच मंदिराच्या परिसरात पूजासाहित्य व प्रसाद विक्रीची दुकाने आहेत. रस्त्यालगत असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात घुमटाकार शिखर व मेघडंबरी आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. छोटेखानी प्रांगणात मध्यभागी हे दुमजली मंदिर स्थित आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रशस्त सभामंडपात पुढील बाजूला एका चौथऱ्यावर नंदी व त्यापुढे गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात फरसबंदी केलेल्या वज्रपिठावर मध्यभागी मुख्य शिवपिंडी आहे. या वज्रपिठाच्या प्रदक्षिणा मार्गावर उजव्या व डावीकडील भिंतींवर प्रत्येकी सहा देवकोष्टकांत बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहेत. या देवळ्यांवर घुमटाकार शिखरे आहेत. या मंदिराच्या छतावर बाशिंगी कठडा व गर्भगृहावर उरुशृंग पद्धतीचे शिखर आहे.
या मंदिरात पहाटेपासून रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना देवदर्शन घेता येते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवशी शेकडो भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारीही येथील मुख्य शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून अभिषेक करण्यासाठी अनेक भाविक येतात. दर महिन्यात येथे सुंदरकांड पठणाचे आयोजन करण्यात येते. अनेक भाविक मंदिराच्या सभामंडपात ध्यान-चिंतन करतात.

उपयुक्त माहिती:

  • अकोला एसटी स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून अकोल्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Back To Home