हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीत अनेक मंदिरे आहेत. यात काही प्राचीन तर काही अर्वाचीन मंदिरांचा समावेश आहे. यापैकी रोहा तालुक्यातील वरसगाव येथील मुंबई–गोवा महामार्गालगत असलेले तुळजाभवानी शिवराया मंदिर हे प्राचीन व अर्वाचीन स्थापत्याचा सुंदर मिलाफ आहे. जिल्ह्यातील हजारो भाविक व शिवप्रेमींचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे. येथील जागृत तुळजाभवानी देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
असे सांगितले जाते की येथे राहणाऱ्या चंदाराणी कोंडाळकर यांना तुळजा भवानीचा दृष्टांत झाला व देवीने येथे आपले मंदिर बांधण्याबाबत त्यांना सांगितले. हे मंदिर कोठे बांधावे, मंदिरांचा आराखडा, देवीची मूर्ती, दागिने, मंदिराभोवती इतर देवतांच्या मूर्ती व फुलझाडे कोणती असावी वगैरे सविस्तर गोष्टी देवीने दृष्टांत देऊन सांगितल्याचे त्या सांगतात. दृष्टांतानुसार त्यांनी दिराशेजारी विहीर बांधून विहिरीस भवानी सागर नाव दिले. सन १९८९ मध्ये अक्षय तृतियेला मंदिरात तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
मुंबई गोवा महामार्गालगत रोहा तालुक्यातील वरसगाव येथे असलेल्या या मंदिराच्या स्वागतकमानीच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. पुतळ्यासमोर वाघ शिल्प आहे. येथील कमानीतून मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला सवत्स धेनूची मूर्तीं व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मुखमंडप, सभामंडप, मुख्यसभामंडप व गर्भगृह असे स्वरूप असलेले मंदिर सुमारे चार फूट उंच जगतीवर आहे. मंदिरासमोर दोन्ही बाजूला देवीचे वाहन असलेल्या वाघाच्या मूर्ती आहेत. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या मुखमंडपास तीन पायऱ्या आहेत. चार नक्षीदार गोलाकार स्तंभ व त्यावर छत असे मुखमंडपाचे स्वरूप आहे. मुखमंडपाचे चारही स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत.
मुखमंडपापेक्षा सभामंडप काहीसा उंच आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस उठाव शैलीतील द्वारपाल शिल्पे आहेत. लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा व झडपांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. सभामंडपात जमिनीवर मध्यभागी यज्ञकुंड व कासवशिल्प आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात उजव्या बाजूला वज्रपिठावर स्वामी समर्थांची मूर्ती व डावीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती आहे. रस्ता रूंदीकरण होण्याआधी ही मूर्ती मंदिराच्या प्रांगणात होती. दोन्ही मूर्तींच्या मधोमध मुख्य सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर व झडपांवर पानफुलांची नक्षी व वरच्या बाजूला कीर्तीमुख शिल्प आहे.
मुख्य सभामंडप प्रशस्त आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला मारूती व सप्तशृंगी देवीची सोळा भूजा असलेली मूर्ती आहे. डावीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. मुख्य सभामंडपात उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या मुख्य सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. पुढे गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीत प्रवेशद्वाराच्या उजवीकडे मारूतीची व डावीकडे गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारासमोर मेजावर तुळजाभवानीची पितळी उत्सव मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर देवीची हातात विविध आयुधे धारण केलेली अष्टभुजा मूर्ती आहे. देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मूर्तीच्या मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. गर्भगृहास लागून डाव्या व उजव्या बाजूला भांडार कक्ष आहेत. मंदिराच्या बाह्यबाजूने जगतीवरून प्रदक्षिणा मार्ग आहे.
मुखमंडपाच्या छतावर चौकोनी पिरॅमिडसारखे निमुळते शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. सभामंडप व गर्भगृहाचे छत समपातळीवर आहे. त्यावर चारही बाजूंना चार चौकोनी लघू शिखरे व त्यावरील अमालकांवर कळस आहेत. दुमजली मुख्य सभामंडपाच्या छतावर पिरॅमिडसारखी पायऱ्या पायऱ्यांची रचना व शीर्षभागी आमलक आणि त्यावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे निमुळते होत गेलेले उंच शिखर आहे. त्यावर एकावर एक असे दोन आमलक, कळस व ध्वजपताका आहेत.
प्रांगणात मंदिराच्या उजव्या बाजूला मेघडंबरीत महादेवाची मूर्ती आहे. जमिनीवर शिवपिंडी व त्यासमोर नंदी आहे. याशिवाय मंदिराच्या डाव्या बाजूला दत्तात्रेयांचे लहान मंदिर आहे. मागील बाजूस मेघडंबरीत सिद्धिविनायकाची पितळी मूर्ती आहे. बाजूला चौथऱ्यावर नक्षीदार तुलसी वृंदावन आहे. तुलसी वृंदावनात पायाजवळ चारही बाजूंना गजराज शिल्पे व त्यावर कमळ फुलांची प्रतिकृती आहे. तुळसकुंडावर समोरील बाजूस उठाव शैलीतील गणपती शिल्प आहे.
मंदिरात चैत्र व शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी आदी वार्षिक उत्सवांचे आयोजन केले जाते. त्यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिसरातील शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. मंदिरात मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची संख्या जास्त असते.