त्र्यंबकेश्वर मंदिर

हिवरे, ता. पुरंदर, जि. पुणे


पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक हिवरे गावात चरणावती नदी आणि खापऱ्याचा ओढा यांच्या संगमावर सुंदर व प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे. प्रसिद्ध मुत्सद्दे व पेशवे दरबारातील साडेतीन शहाण्यांपैकी एक सरदार सखाराम बापू बोकील यांनी या मंदिराची निर्मिती केली. नदी किनाऱ्यावरील हे मंदिर पेशवेकालीन स्थापत्याचा एक अप्रतिम ठेवा आहे. या मंदिराच्या चारही बाजूने दगडी तटबंदी आहे.

सासवडपासून पाच किमी अंतरावर हिवरे गाव आहे. गावाला चारही बाजूने तटबंदी आहे. शनिवार वाड्याला भाजीपाला पुरवणारे गाव म्हणून पेशवेकाळापासून या गावाचे महत्त्व आहे. या गावातील खापऱ्याच्या ओढ्यावर बांधलेला एका लहान पूल पार करून गेल्यानंतर समोर संपूर्ण दगडी बांधणीतील त्र्यंबकेश्वर मंदिर दिसते. परिसरात ते महादेव मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिराबाहेरच्या तटबंदीला लागूनच एक विरगळ आहे. (वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या दगडी वा लाकडी स्तंभाला विरगळ म्हटले जाते.) या विरगळीत कोरलेल्या शिल्पांतील पुरुषांची वेशभूषा ही शुंग कालखंडातील वेशभूषेप्रमाणे असल्यामुळे ही विरगळ हजारो वर्षांपूर्वीची असावी, असा अभ्यासकांचा दावा आहे.

तटबंदीतील एका दगडी कमानीत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तेथून आत प्रवेश करताच मंदिरासमोरील नंदीमंडपात विराजमान असलेला नंदी दिसतो. या नंदीवरील कलाकुसर व नक्षीकाम अप्रतिम आहे. चार दगडी खांबांवर उभ्या असलेल्या या नंदीमंडपाचा कळस आकर्षक आहे.

मंदिराभोवती असणाऱ्या तटबंदीवर जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराच्या मागून पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराच्या भिंतीतील व कळसावरील बारीक नक्षीकाम जवळून न्याहाळता येते. नंदीमंडपाच्या शेजारीच उंच दगडी दीपमाळ आहे. त्यावरही बारीक नक्षीकाम केलेले दिसते.

मंदिराची रचना सभागृह आणि गाभारा अशी आहे. पूर्ण दगडात बांधकाम केलेले हे मंदिर प्रशस्त भासते. सभागृहाच्या वरचा भाग हा गोलाकार निमुळता होत गेलेला आहे. गाभाऱ्यातील दारावर कीर्तिमुख असून आतमध्ये सुंदर शिवपिंडी आहे.

राखी पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. यावेळी हिवरे गावातून देवाची पालखी फिरवली जाते. त्यादिवशी संपूर्ण गावाला महाप्रसाद दिला जातो. सकाळी ६ ते सायंकाळी ७ पर्यंत मंदिरात जाऊन भाविकांना देवदर्शन करता येते.

उपयुक्त माहिती:

  • सासवडपासून पाच किमी, तर पुण्यापासून २६ किमी अंतरावर
  • पुणे, सासवडपासून येथे येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home