ग्रामदेवता, जलदेवता, गिरीदेवता, वनदेवता असे स्थानदेवतांचे विविध प्रकार सांगितले जातात. आपापल्या स्थानाचे रक्षण करणे हेच स्थानदेवतांचे मुख्य काम मानले जाते. नदी, सरोवर, विहीर, तलाव या ठिकाणी वास करणाऱ्या जलदेवता जलसाठ्याचे संरक्षण करतात, तर वनात वास करणाऱ्या वनदेवता वनातील झाडाझुडुपांचे, पशुपक्ष्यांचे रक्षण करतात. या देवतांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गावाच्या डोंगरावर वास करणारी टोकाई माता ही याच स्थानदेवतांपैकी एक आहे. येथील देवीचे स्थान जागृत व ही देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे सहाशे वर्षांहून अधिक प्राचीन आहे. अलीकडील काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांनी या मंदिरास भेट दिली होती. ही देवी सप्तमातृकांपैकी एक असल्याची मान्यता आहे. याबाबत आख्यायिका अशी की आदिशक्ती देवीचा जेव्हा रक्तबीज राक्षसाशी संघर्ष झाला, तेव्हा त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक राक्षस निर्माण होऊन देवीशी लढू लागे. त्यामुळे राक्षसाला परास्त करणे अशक्य होऊ लागले.
त्यावेळी दुर्गादेवीने मदतीसाठी सप्तमातृकांना आवाहन केले. सप्तमातृकांनी रक्तबीज राक्षसाचे रक्त जमिनीवर पडण्याआधीच पिऊन टाकल्याने त्याच्या रक्तातून नवे राक्षस तयार झाले नाहीत. तेव्हा दुर्गादेवीने रक्तबीजाचा नाश केला व युद्धानंतर सप्तमातृकांची स्थानदेवता म्हणून विविध ठिकाणी स्थापना केली. टोकाई देवी त्यापैकीच एक देवता आहे.
गावापासून जवळ उंच डोंगरावर हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्की सडक व कोरीव पाषाणात बांधलेला पायरीमार्ग असे दोन पर्याय आहेत. नवस केलेले भाविक पायरीमार्गाने डोंगर चढून मंदिरापर्यंत येतात, तर इतर भाविक खाजगी वाहनाने थेट मंदिरापर्यंत येतात. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. तसेच पूजा साहित्याची दुकाने व भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून या मंदिर परिसरात हजारो वृक्षांचे संवर्धन व संगोपन केले असल्याने परिसरास हिरवाई लाभली आहे. मंदिराच्या मागील बाजूस पायऱ्यांची प्राचीन विहीर आहे. अलीकडील काळात विहिरीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या विहिरीतील जलसाठा अक्षय असल्याचे सांगितले जाते. मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात पार बांधलेले विशाल वृक्ष आहेत. मंदिरासमोर डाव्या बाजूला तुळशी वृंदावन आहे, तर उजव्या बाजूला वज्रपीठावर टोकाई मातेच्या सेवकाची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे.
वज्रपीठामागे वृक्षाच्या फांदीवर नवसाच्या शेकडो बांगड्या बांधलेल्या आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. सभामंडपात लोखंडी सुरक्षा कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन केलेले आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात दोन गोलाकार स्तंभ आहेत. सभामंडपाच्या भिंतीवर मंदिर व परिसराची सचित्र माहिती असलेला छापील फलक लावलेला आहे. सभामंडपात आरतीच्या वेळी वाजवला जाणारा नगारा आहे. सभामंडपात उजव्या बाजूला लहान चौथऱ्यावर शेंदूरचर्चित इच्छापूर्ती चिंतामणी गणेशाची पाषाण मूर्ती आहे.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या बाजूला ढाल-तलवार लावलेली आहे. प्रवेशद्वारात मेजावर देवीच्या पितळी पद्मपादुका व पूजेचे साहित्य ठेवलेले आहे. गर्भगृहास डाव्या बाजूला आणखी एक प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात जमिनीवर टोकाई देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. एकाच पाषाणातून निघालेली देवीची षष्ठमुखी (सहा मुखी) मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या मूर्तीस सहा मुखवटे व सहा मुकुट आहेत. देवीच्या समोर मंगल कलश व संबळ वाद्य ठेवलेले आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक आहे. या आमलकावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या परिसरात मारुतीची शेंदूरचर्चित पाषाण मूर्ती आहे.
शारदीय नवरात्रौत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. या दरम्यान सुमारे एक लाखाहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी मंदिरात येतात. यावेळी सलग दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ, यज्ञयाग, होमहवन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिरात प्रत्येक पौर्णिमेला दिवट्या मिरवणूक काढली जाते. यावेळी परिसरातील आंब्याची आई, बारडची आई, रत्नागिरी देवी, कुर्मा देवी, कारळची आई इत्यादी सात गावांतील सात देवी टोकाई देवीच्या भेटीला येतात. दर पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार इत्यादी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची विशेष गर्दी असते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात टोकाई मातेचे दर्शन घेता येते.