तीर्थ रामकुंड

पंचवटी,नाशिक जि. नाशिक

भारतातील ‘पश्चिम काशी’ म्हणून ओळखले जाणारे नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या ठिकाणी लहान-मोठी २०० हून अधिक मंदिरे आहेत. त्याखेरीज आध्यात्मिक महत्त्व असलेली तीर्थस्थानेही आहेत. यातील पंचवटीमधील रामकुंड हे तीर्थ अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

प्राचीन काळापासूनच पंचवटीचा भाग अत्यंत पवित्र मानला गेला आहे. येथे पाच वटवृक्षांचा समूह आहे. ‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड. त्यामुळे या परिसराला ‘पंचवटी’ असे म्हटले जाते. काळाराम मंदिर, सीता गुंफा, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठल मंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, दुतोंड्या मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काट्यामारुती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे ही रामकुंडाच्या परिसरात गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. याशिवाय सीताकुंड, लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड, अहिल्याकुंड, शारंगपाणीकुंड, दुतोंड्या मारुतीकुंड आणि निळकंठेश्वर व गोराराम मंदिराच्या समोर सर्वांत मोठे दशाश्वमेघकुंड आहे.

याबाबत अख्यायिका अशी की समुद्रमंथनातून देवांना अमृतकलश प्राप्त झाला व तो राक्षसांनी पळविला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून तो राक्षसांकडून परत मिळविला. विष्णूरुपी मोहिनी अमतृकलश घेऊन परतत असताना त्यातील चार थेंब पृथ्वीवर पडले. ही चार ठिकाणे म्हणजे प्रयाग, हरिद्वार, नाशिक व उज्जैन. नाशिकमध्ये ज्या ठिकाणावर अमृतकलशातील थेंब पडले ते ठिकाण म्हणजे रामकुंड, असे सांगितले जाते. त्यामुळे या कुंडात स्नान करणे पवित्र मानले जाते.

श्रीराम हे लक्ष्मण आणि सीता यांच्यासमवेत वनवासकाळात नाशिकमधील पंचवटीत गौतमी तीरावर (गोदावरी) आले होते. इथे विधिपूर्वक स्नान करून वडील दशरथ राजा यांचा श्राद्धविधी त्यांनी केला. त्यावेळेपासून हे ठिकाण ‘रामकुंड’ नावाने ओळखले जाते. या तीर्थावर स्नान केल्याने ब्रह्महत्या आदी पापांचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशी आख्यायिका आहे की, ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तीसाठी महादेवांनीही या रामकुंडात स्नान करून येथेच वास्तव्य केले होते.

ज्या ठिकाणी श्रीरामाने आपले वडील दशरथ यांचे श्राद्धविधी केले होते, त्याला आता ‘अस्थिविलय तीर्थ’ असेही म्हणतात. आजही भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थींचे अस्थिविलयकुंडात विसर्जन करतात. महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आदी अनेक नेत्यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या आहेत. या रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्ह्यातील खटावचे जमीनदार चित्रराव खटाव यांनी १६९६ मध्ये केले. त्यानंतर श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.

रामकुंडाजवळ असलेल्या गोदावरी माता मंदिराच्या बाजूला अरुणा, वरुणा आणि गोदावरीचा संगम होतो, असे सांगतात. याचेच प्रतीक म्हणून या ठिकाणी एका चौथऱ्यावर तीन गोमुखे असून त्यातून तीनही नद्यांचे पाणी सतत वाहत असते. ते पाणी रामकुंडात येते. या ठिकाणी दीपदानही केले जाते.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतो. हा कुंभमेळा येथे दर बारा वर्षांनी होतो. गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि ज्या दिवशी आमावस्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. मात्र, यावेळी साधूंचे शाहीस्नान हे दोन ठिकाणी होते. त्यापैकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त आणि दुसरे म्हणजे रामकुंड. हे स्नान दोन ठिकाणी का होते, याचीही एक कथा आहे. नाशिकमधीलच कपिलाधारा तीर्थ येथे सत्ययुगापासून कुंभमेळा सुरू होता. असे सांगितले जाते की १७५५ मध्ये पहिल्या स्नानावरून शैव आणि वैष्णव पंथीयांमध्ये वाद झाला व तो विकोपाला गेला. त्यामुळे माधवराव पेशव्यांच्या काळात या कुंभमेळ्याचे दोन भाग करण्यात आले. त्यापैकी शंकराचे उपासक असलेल्या शैवपंथींना त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्तावर स्नानासाठी जागा देण्यात आली, तर श्रीरामाचे उपासक म्हणजेच वैष्णवपंथींना रामकुंडावर पाठवण्यात आले. त्यामुळे कुंभमेळ्याच्या दृष्टीनेही रामकुंडाचे विशेष महत्त्व आहे.

उपयुक्त माहिती:

  • नाशिक एसटी बस स्थानकापासून ३ किमी, तर नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून १० किमी अंतरावर
  • नाशिकमध्ये येण्यासाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • रामकुंडावर येण्यासाठी नाशिक महापालिका बसची सुविधा
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • खासगी वाहने रामकुंडाशेजारी गोदावरीच्या तीरावर येऊ शकतात
Back To Home