श्रीराम हे जळगाव शहराचे ग्रामदैवत आहे. शहरात दोन राम मंदिरे आहेत. त्यापैकी एका मंदिरात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या एक ते सव्वा फूट उंचीच्या मूर्ती आहेत. त्यामुळे हे मंदिर चिमुकले राम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. येथील श्रीरामाच्या मूर्तीला दररोज काजळ भरले जाते. मागील शंभरहून अधिक वर्षांपासून ही परंपरा आहे. याशिवाय येथील नालाभाग परिसरात प्राचीन राम मंदिर आहे. या मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही अयोध्येतील आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जळगावतील धार्मिक व सांस्कृतिक चळवळीत या मंदिरांना मोठा इतिहास लाभलेला आहे.
जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात प्रतापनगर येथील चिमुकले राम मंदिराचे काम शके १८३७ (सन १९१५) रोजी श्रीकृष्ण जयंतीच्या मुहूर्तावर सुरू झाले व चैत्र शुध्द पौर्णिमा, शके १८३९ (सन १९१७) म्हणजेच हनुमान जयंतीला ते पूर्ण झाले. मंदिराची स्थापनेच्या वेळी येथे एक शिलालेख तयार करण्यात आला होता. या शिलालेखावर ‘सरकारची सर्व धर्मासंबधी समबुध्दी आणि पूर्व खान्देशच्या लोकांची धर्मबुध्दी या दोन्हींचा मिलापाचे स्मारक’ असा मजकूर कोरण्यात आला आहे.
या मंदिरात प्रवेश करतानाच हा मोठा शिलालेख दिसतो. यातून मंदिर स्थापनेचे ध्येय व उद्धिष्टे लक्षात येतात.
या मंदिरातील देवतांच्या मूर्ती आकाराने लहान असल्या तरी हे मंदिर मात्र प्रशस्त आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रागंणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. उंच जगतीवर असलेल्या या मंदिराची खुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना आहे. सभामंडपाला लागून पूर्वेकडे दासमारुती मंदिर आहे. यातील नमस्कार मुद्रेतील मारुतीची मूर्ती ही शुभ्र संगमरवरी आहे. सभामंडपात मध्यभागी गाय व वासराचे मोठे पितळी शिल्प आहे. मारुती मंदिराच्या समोरील बाजूस मंदिराचे अंतराळ व गर्भगृह आहे. तीन पायऱ्या चढून उंचावर असलेल्या अंतराळात प्रवेश होतो. या अंतराळात नक्षीदार आठ स्तंभ आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दीपकोष्टके आहेत. गर्भगृहात एका वज्रपिठावर असलेल्या मखरात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. या मूर्तींवर मुकुट व वरील बाजूस छत्र आहे. मखराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल व मागील भिंतीत देवकोष्टके आहेत. त्यामध्येही विविध देवतांच्या मूर्ती आहेत.
या मंदिराला लागून अंबाई देवीचे मंदिर आहे. यामध्ये वाघावर स्वार अंबाईदेवीची मूर्ती आहे व त्याखाली सात पाषाण आहेत. या पाषाणांवर देवींचे मुखवटे लावलेले आहेत. याशिवाय येथे पंचमुखी महादेव, सिद्धि विनायक व श्रीदत्त यांची मंदिरे आहेत.
श्रीरामजन्मोत्सवाच्या दिवशी येथे पहाटे ५.३० वाजता मंगलआरती होते. त्यात हजारो भाविक सहभागी होतात. यावेळी श्रीरामाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात येतो. भजन व किर्तने होतात. रामजन्माचा कार्यक्रमानंतर मूर्तींवर पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. रामनवमीच्या दिवशी रस्त्यांवर जागोजागी फुलांनी मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. या फुलांच्या गालिचावरून ढोल-ताशाच्या गजरात निघालेला श्रीरामाचा रथ संपूर्ण गावभर फिरवला जातो.
चैत्र शुद्ध नवमीच्या या दिवशी शोभायात्रांमुळे शहरात उत्साही वातावरण असते. या शोभायात्रेत जिवंत देखावेही असतात.
या मंदिराशिवाय येथील नालाभाग परिसरात असलेले प्राचीन राम मंदिरही प्रसिद्ध आहे. या मंदिरातील उत्सवमूर्तीविषयी आख्यायिका अशी की पूर्वी उत्तर भारतातील श्रीक्षेत्र अयोध्या व परिसरातील अनेक साधू, संन्याशी आणि महंत हे नाशिक आणि पंचवटी येथे दर्शनासाठी जात असत. त्यावेळी अयोध्या येथील रामानुज संप्रदायातील महंत श्रीरामानंद स्वामी जळगाव येथे श्रीराम मंदिरात साधारण महिनाभर राहिले होते. येथून नाशिक क्षेत्री जातेवेळी त्यांनी त्यांच्याजवळील नित्य पूजेची उत्सव मूर्ती येथे दिली. तेव्हापासून ही मूर्ती या मंदिरात आहे. त्यामुळे अयोध्येतील श्रीरामाचे जळगावात वास्तव्य आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही उत्सव मूर्ती श्रीराम रथोत्सव व पंढरपूर येथील संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यातही जाते. तसेच दसऱ्याच्या सीमोल्लंघन पालखीत ती विराजमान होते. या काळात या उत्सवमूर्तीचे भाविकांना स्पर्शदर्शन घेता येते.
या मंदिराचा रथोत्सव प्रसिद्ध आहे. सन १८७२ पासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेस येथे रथयात्रा काढली जाते. या यात्रेसाठी वापरण्यात येणारा २५ फूट उंचीचा वैशिष्ट्यपूर्ण रथ २५० मण साग व तिवसाच्या लाकडांचा वापर करून बनविण्यात आलेला आहे. दररोज सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते.