नाशिकमधील सर्वात जुने, प्राचीन मंदिर म्हणून पंचवटी येथील ‘तिळा गणपती मंदिर’ ओळखले जाते. मंदिरातील सध्याची मूर्ती ही १३व्या शतकातील आहे. या मंदिरामुळे येथील वस्तीचे ‘गणेशवाडी’ हे नाव पडले. नाशिकमधील अष्टविनायक मंदिरांमध्ये या गणपतीचे महत्त्वाचे स्थान आहे. नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून या गणपतीची ख्याती आहे.
असे सांगितले जाते की १३व्या शतकात पंचवटी परिसरात दामोदर दगडूशेठ सोनार (भडके) हे घर बांधण्यासाठी पाया खोदत असताना त्यांना जमिनीत डाव्या सोंडेची गणेशमूर्ती सापडली होती. मग घर बांधत असतानाच घरासमोरील भागात मंदिर बांधून या मूर्तीची त्यांनी प्राणप्रतिष्ठापना केली. या मंदिराचे काम चुना, वाळू व विटांमध्ये केलेले आहे. दरवर्षी तीळ-तीळ वाढणारा हा गणपती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे, म्हणून याचे नाव ‘तिळा गणपती’ असे पडले.
या गणपती मंदिराची देखभाल आजही भडके (सोनार) कुटुंबाकडून केली जाते. मध्यंतरी त्यांनी मंदिराच्या दुरुस्तीचे आणि डागडुजीचे काम केले. हे करताना त्यांनी मंदिराच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता जुन्या पद्धतीने गूळ, चुनखडी, रेतीचा वापर केला आणि मंदिराला पूर्वीसारखे भक्कम केले.
श्री तिळा गणपती मंदिर हे नाशिकच्या भूषणांपैकी एक आहे. पंचवटीतील श्रीराम मंदिरापासून पायी १० मिनिटांच्या अंतरावर, तर तपोवनपासून पायी २० मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आलेले अनेक भाविक आवर्जून या गणेशाच्या दर्शनाला जात असतात. असे सांगितले जाते की, पंचवटीतील राम मंदिर आणि कपालेश्वर मंदिर यांच्या आधीपासून हे मंदिर येथे आहे.
नाशिकमधील गाडगे महाराज पुलावरून गणेशवाडीत जाताना उजवीकडे एका उंचवट्यावर हे मंदिर आहे. सुमारे वीस पायऱ्या चढल्यावर हे मंदिर नजरेस पडते. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे. सभामंडप आणि गर्भगृहाच्या दाराची उंची अतिशय कमी असल्यामुळे थोडे वाकून आत जावे लागते. सभामंडप, त्यापुढे गर्भगृह असून त्यावरील दोन्ही छत घुमटाकार आहेत. गर्भगृहाला समोरासमोर दोन खिडक्या आहेत. सभामंडपात हात जोडून उभा असलेला व उपरणे पांघरलेल्या उंदराची मूर्ती दिसते. त्यासमोर गाभाऱ्यात अडीच फूट उंचीची तिळा गणपतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गर्भगृहातील तीन कोनाड्यांपैकी मध्ये असलेल्या मुख्य कोनाड्यात गणपती आहे. त्याच्या उजवीकडच्या लहान कोनाड्यात मारुतीची मूर्ती आहे. ही मूर्ती जेव्हा जमिनीत सापडली तेव्हा ती लहान होती, परंतु सतत शेंदूर लावल्यामुळे त्या मूर्तीचा आकार वाढत गेला.
दरवर्षी पौष महिन्यात मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी (विनायक चतुर्थी) म्हणतात. या चतुर्थीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. या दिवशी गणेशमूर्तीला छान सजवून अलंकार घातले जातात. त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य आणखी खुलते. यावेळी मंदिरात दर्शनाला येणारे भाविक गणपतीला प्रसाद म्हणून तिळाचे लाडू व तिळगूळ वाहतात. असे सांगितले जाते की या गणपतीला तिळगूळ दिल्याशिवाय नाशिककरांची संक्रांत पूर्ण होत नाही. माघी गणपतीच्या दिवशीही येथे मोठा उत्सव असतो. दर मंगळवारी व प्रत्येक संकष्टी चतुर्थीला या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक येतात.