थापलिंग खंडोबा

नागापूर, ता. आंबेगाव, जि. पुणे


पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील नागापूरचे प्रसिद्ध थापलिंग मंदिर म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या खंडोबाचे आणखी एक महत्त्वाचे स्थान. एका छोट्याशा टेकडीवर ते वसले आहे. मंदिरात जाण्यासाठी देवस्थान ट्रस्टने १५७ पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्यांच्या विशिष्ट रचनेमुळे हा मार्ग चढण्यासाठी सोपा झाल्याने आबालवृद्धांसह सर्वांना अगदी सहज या मंदिरात पोचता येते.

पायऱ्यांवरून जाताना उजव्या बाजूला साईबाबांचे छोटेसे मंदिर आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर मंदिराचे प्रवेशद्वार आहे. तेथून मंदिराच्या प्रांगणात दगडी दीपमाळ पाहायला मिळते. या भव्य दीपमाळेनेच हा ठेवा किती पुरातन आहे याची साक्ष पटते. प्रांगणाच्या चारही बाजूंनी दगडी संरक्षक भिंत आहे. उत्सवकाळात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने लोखंडी खांबांचा वापर करून दर्शन मार्ग तयार केला आहे.

पूर्ण काळ्या दगडांनी बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम आटोपशीर आहे. सभामंडपात नंदी आणि त्याशेजारी खंडोबाचे वाहन असलेल्या अश्वाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना जय व विजय यांच्या प्रतिमा; तर वरच्या भागात गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. काळ्या दगडातील गर्भगृहाची रचना अतिशय सुंदर आहे. वारसास्थळ म्हणून या स्थानाचे महत्त्व त्यावरून अधोरेखित होते. गर्भगृहात श्री थापलिंग प्रतिष्ठापित आहे. त्याच्या बाजूला म्हाळसा, बानूबाई आणि दासी यांच्या काळ्या दगडातील मूर्ती आहेत. त्यांच्यापुढे पंचलिंगाचेही दर्शन होते. मंदिरात आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी कासवाच्या मूर्ती आहेत. या बांधकामाच्या निश्चित काळाचा उल्लेख कुठेही सापडत नाही; मात्र ही वास्तू साधारणतः ५०० वर्षे जुनी आहे, असे सांगितले जाते. मंदिराच्या मागच्या बाजूलाही मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणेच भव्य कमान आहे. प्रांगणाचा प्रशस्त, स्वच्छ व नीटनेटका परिसर मंदिराच्या सौंदर्यात विशेष भर घालतो.

पौष पौर्णिमेच्या दिवशी थापलिंगाचा मुख्य उत्सव होतो. या दिवशी भरणारी यात्रा ही पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या यात्रांपैकी एक म्हणून प्रख्यात आहे. दोन दिवसांचा हा सोहळा असतो. पहिल्या दिवशी भल्या पहाटे देवाची पूजा झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. हा दर्शनोत्सव दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत सुरू असतो. या कालावधीत राज्यभरातील राजकीय नेत्यांसह अनेक मान्यवर आवर्जून थापलिंग मंदिरात हजेरी लावतात. यात्रेत मिष्ठान्न आणि अन्य खाद्यपदार्थांची दुकाने थाटलेली असतातच; पण विशेष ठरतो तो शेतीस उपयोगी अवजारांचा बाजार. खंडोबाचा आशीर्वाद लाभलेल्या या यात्रेत अशी शेतीची अवजारे खरेदी करणे हे शेतकऱ्यांना अधिक भावते.

नवसाचे बैलगाडे आणि बैलगाडा शर्यती हे या यात्रेचे आणखी एक आकर्षण. भंडाऱ्याची उधळण करीत बैलगाडे त्यासाठी बांधण्यात आलेल्या खास घाटातून पळवण्यात येतात. हा जल्लोष बघण्यासारखा असतो. बैलगाडा शर्यतीला परवानगी नसल्याने काही वर्षे हा घाट सुना सुना होता; पण कालांतराने परवानगी मिळाल्याने ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने पौष पौर्णिमेच्या बैलगाडा शर्यतींचा उत्साह पुन्हा खंडोबाचरणी सुरू झाला आहे.

यावेळी काठी नाचवण्याचा सोहळाही उल्लेखनीय असतो. गावातून ही काठी सुंदर पद्धतीने सजवून मंदिरापर्यंत आणण्यात येते. नंतर ती दीपमाळेजवळ उभी करण्यात येते. यात्रेचा समारोप पायथ्याशी असणाऱ्या वळती गावातील शिळ्या यात्रेने होतो. मुख्य उत्सवाप्रमाणेच सोमवती अमावास्येच्या दिवशी या ठिकाणी तळी भरण्याची परंपरा आहे. (तळी भरणे म्हणजे, एका ताटात कुळातील खंडोबा देवाचा टाक म्हणजेच देवघरातील पंचकोनी खंडोबाची मूर्ती, विड्याची पाने, सुपारी, खोबरे, भंडारा आदी वस्तू ताटात घेऊन ‘येळकोट येळकोट…’च्या गजरात विधिवत पूजा करून ते ताट मस्तकाला लावणे.) यावेळी मंदिराच्या बाजूलाच भारूड, गोंधळ असे कार्यक्रम होतात. काही भाविक थापलिंगाच्या साक्षीने आवारातच विवाहबंधनात अडकतात.

उपयुक्त माहिती:

  • नारायणगावपासून १७ किमी; तरपुणे शहरापासून ७४ किमी अंतरावर
  • नारायणगाव, राजगुरूनगरपासून एसटीची सुविधा
  • पायथ्यापासून पायी १० मिनिटांचा प्रवास
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाण्याची व्यवस्था
  • परिसरात निवास व न्याहारीची व्यवस्था
Back To Home