सांस्कृतिक वारसास्थळांच्या यादीतील पुण्यातील आणखी एक भव्य, निसर्गरम्य आणि तेवढेच आध्यात्मिक शांती देणारे मंदिर म्हणजे येरवडा येथील तारकेश्वर मंदिर. पर्वतीवरील मंदिरात जाताना जसा निसर्गभ्रमंतीचा आनंद मिळतो आणि पुणे शहराचे विहंगम दर्शन घडते, तसाच अनुभव तारकेश्वर मंदिरात जाताना येतो. विशेष म्हणजे १९९० च्या दशकानंतर झालेला मंदिराचा जीर्णोद्धार आणि टेकडी परिसराचे सुशोभीकरण यांमुळे मिळणारा आनंदानुभव आता द्विगुणित झाला आहे.
तारकेश्वराचे हे मंदिर तीन ते चार हजार वर्षे जुने आहे आणि ते स्वतः पांडवांनी बांधल्याचे सांगितले जाते. मूळ काळ्या दगडांत कोरलेले हे मंदिर लेणी स्वरूपात आहे.
तारकेश्वर अवताराची कथा अशी की शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी असुर कुळातील तारकासुराने कठोर तपश्चर्या केली. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन तारकासुराची अमरत्वाची मागणी पूर्ण करून, त्रिलोकात माझा पुत्र सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही, असा वर दिला. तोपर्यंत शंकर-पार्वती भेट झाली नव्हती. त्यामुळे निर्धास्त असलेल्या तारकासुराने अहंकाराने उन्मत होऊन पापकर्मे करण्यास सुरुवात केली. पृथ्वीलोकावर साधू-मुनींचे आश्रम उद्ध्वस्त करून, तारकासुर त्यांचा अनन्वित छळ करू लागला. देवलोकावरही आक्रमण करून त्याने देवांना बंदी बनवले.
तारकासुराच्या दहशतीने देव, साधू-मुनी सुरक्षित स्थळी लपून बसले आणि मदतीसाठी शंकराचा धावा करू लागले. त्याच वेळी शंकराने पार्वतीशी विवाहगाठ बांधली आणि कार्तिकेयाचा जन्म झाला. बालवयातच कार्तिकेयने अधम तारकासुराला लढाईचे आव्हान दिले आणि त्यात तारकासुर पराभूत झाला. मात्र, मृत्युशय्येवर असताना त्याला आपल्या पापकर्मांचा पश्चात्ताप झाला आणि मरता मरता त्याने शंकराची आराधना केली. शंकर पुन्हा या असुर भक्ताच्या हाकेला धावून गेला. तारकासुराने शंकराकडे आपल्या कर्मांविषयी माफी मागितली. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन तुझ्या नावाने माझे स्मरण केले जाईल, असा वर देत आपले निळकंठ उग्र रूप धारण केले. तोच हा तारकेश्वर अवतार. त्यानंतर तारकेश्वर मंदिराची स्थापना तारकासुराच्या तपश्चर्येच्या ठिकाणी करण्यात आली. आजमितीला देशात अनेक ठिकाणी तारकेश्वर मंदिरे आहेत. त्यापैकीच येरवड्याच्या टेकडीवरील हे एक मंदिर.
या मंदिरात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक थेट टेकडीवर जाणारा गाडीरस्ता; तर दुसरा पुणे-नगर रस्त्यावरील बंड गार्डनचा पूल ओलांडल्यानंतर लागणारा पायऱ्यांचा रस्ता. पायऱ्यांच्या या रस्त्यावर सुरुवातीलाच निळकंठ स्वरूपातील शिवशंकराची भव्य प्रतिमा पाहायला मिळते. येथे भव्य कमानही उभारण्यात आली आहे. येथून टेकडीवरील मंदिरापर्यंत पोचण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. या लांब लांब पायऱ्या चढताना आजूबाजूचा हिरव्या लताराजींनी नटलेला आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने भारलेला निसर्ग अनुभवायला मिळतो. येथे अनेक ठिकाणी बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे. टेकडीवर पोचल्यावर मंदिराबाहेर दीपमाळ दिसते. वेगवेगळ्या टप्प्यांत विभागलेल्या मंदिराच्या आवारात रेणुकामाता, राधाकृष्ण, गुरुदेव दत्त, श्री साईबाबा यांच्यासह अनेक देव-देवतांची छोटेखानी मंदिरे आहेत. त्यातील रेणुकामातेचे मंदिर हा मूळ जुन्या मंदिराचा भाग आहे. इतर मंदिरे कालांतराने बांधण्यात आली आहेत.
मुख्य सभामंडपाबाहेर डाव्या बाजूला विठ्ठल-रखुमाई; तर उजव्या बाजूला शनिदेवाचे मंदिर आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यासमोर नंदीचे दर्शन घडते. गाभाऱ्यात गेल्यानंतर तेथे दगडांत कोरलेल्या जागेमध्येच स्वयंभू शिवलिंग आहे. तेथेच बाजूला गणपती, हनुमान, काळभैरव-जोगेश्वरी आणि श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची मंदिरे आहेत. असे सांगितले जाते की मंदिराचा मूळ सभामंडप हा लाकडी होता; पण त्याची दुरवस्था झाल्याने त्या जागी पक्के बांधकाम करण्यात आले आहे. गाभाऱ्याच्या दगडांतील कोरीव भाग, तसेच मंदिराबाहेरील टेकडीच्या उताराचा परिसरही पक्क्या बांधकामाने संरक्षित करण्यात आला आहे.
या पांडवकालीन मंदिराजवळच टेकडीवर एक भुयारही असल्याचे सांगण्यात येते. मूळ मंदिराचे बांधकाम आणि हा परिसर लक्षात घेता, एकेकाळी याचे स्थानमाहात्म्य खूप असल्याची प्रचिती येते. मात्र, या मंदिराबाबत कोणताही ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नसल्याने येथील अनेक रहस्ये अजूनही अनुत्तरित आहेत. येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी होते. श्रावणी सोमवारच्या दिवशीही तारकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी व अभिषेक करण्यासाठी भाविकांची रीघ लागते. भाविकांना दर सोमवारी सकाळी ६ ते सायंकाळी ७ या दरम्यान देवदर्शन करता येते. मंगळवार ते रविवार हीच वेळ सकाळी ६ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते ७ अशी आहे.