बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची कवाडे उघडली. तरीही त्यानंतर आठशे वर्षांपर्यंत दलितांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यास मनाई होती. १९४६ साली १ ते १० मे असे दहा दिवस साने गुरुजींनी उपोषण केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी उपोषणास सक्रीय पाठिंबा दिला. लोकसभेचे तत्कालीन सभापती मावळणकर यांनी पंढरपुरात येऊन याबाबत यशस्वी मध्यस्थी केली व पांडुरंगाचे मंदिर सर्वांसाठी खुले झाले. साने गुरुजींनी ज्या ठिकाणी उपोषण केले तो तनपुरे महाराज मठ आजही पंढरपुरातील एक मुख्य धार्मिक व सामाजिक केंद्र म्हणून कार्यरत आहे. पंढरपुरात येणारे लाखो भाविक तनपुरे मठास आवर्जून भेट देतात.
तनपुरे महाराज म्हणजेच बद्रीनाथ कुशाबा तनपुरे यांचा जन्म पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी गावात रुख्मिणीबाई हिच्या पोटी झाला. भागवत धर्म प्रचारक व सामाजिक समतेच्या पुरस्कर्त्या आई-वडिलांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. मराठी विषयात पदवी संपादन केलेल्या महाराजांनी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेत वेद, उपनिषद, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. ते संस्कृतचे पंडित होते. चारोधाम मंडप ट्रस्टचे अध्यक्ष व अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी होते. त्यांनी भारतभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले. भागवत धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी वारणसी, बद्रीनाथ येथे धर्मशाळा बांधल्या.
या मठाच्या स्थापनेबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी हा मठ अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. याच मठात १९४६ साली साने गुरुजी दहा दिवस उपोषणाला बसले होते. असे सांगितले जाते की याच मठात ३ ऑगस्ट १९४७ साली शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली होती. सर्वोदय संमेलनाच्या वेळी आचार्य विनोबा भावे व डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी याच मठात कार्यकर्त्यांना विचार प्रबोधन दिले होते. या मठात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य अविरत सुरू असते. हा मठ पंढरपूर रेल्वे स्थानक व विठ्ठल-रखुमाई मंदिरांपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. मठाला भक्कम तटबंदी व तटबंदीत सुमारे तीस फूट उंचीच्या प्रवेशद्वाची इमारत आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला दोन चौकोनी स्तंभ व त्यावर महिरपी तोरण आहे. प्रवेशद्वाराच्या छतावर मध्यभागी महादेवाची ध्यानस्थ विशाल मूर्ती व बाजूला इतर देवी देवतांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या इमारतीत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष व वर जाणारे पायरी मार्ग आहेत.
मठाच्या प्रांगणात वाहनतळ व काही प्राचीन वृक्ष आहेत. प्रांगणात तनपुरे महाराजांचे तीन मजली समाधी मंदिर आहे. समाधी मंदिराच्या सभोवतीने लोखंडी जाळ्या असलेली तटबंदी व त्यात प्रवेशद्वार आहे. समाधी मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात तुलसी वृंदावन आहे. अर्धमंडप, सभामंडप व अनेक गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला दोन चौथरे व त्यांवर सिंहशिल्पे आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार सुमारे वीस फूट उंचीचे आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ व स्तंभांवर महिरपी तोरण आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी, ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती व मंडारकावर किर्तीमुख आहे.
सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी सहा गोलाकार स्तंभ व त्यावर तुळई आणि दुसऱ्या मजल्याचा सज्जा आहे. सज्जावर गोलाकार व चौकोनी स्तंभ आणि त्यांवर छत आहे. वितानावर मध्यभागी चक्र व त्यात झुंबर आहे. सभामंडपात तनपुरे महाराजांची मूर्ती असलेला लहान रथ आहे. सभामंडपात महाराजांची समाधी व त्यापुढे दोन स्तंभ असलेल्या नक्षीदार मखरात वज्रपिठावर महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे. सभामंडपात रांगेत अनेक गर्भगृहे आहेत. सर्व गर्भगृहांच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी, ललाट बिंबस्थानी गणपतीची मूर्ती व मंडारकास चंद्रशिळा आहेत. सर्व गर्भगृहांत देवी देवता व साधू संतांच्या मूर्ती आहेत.
समाधी मंदिराच्या छतावर समोरील बाजूला दोन घुमटाकार शिखरे आहेत. त्यावर समाधी मंदिराच्या छतावर डाव्या व उजव्या बाजूला तीन थरांचे गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखरावर विविध प्रकारची नक्षी व देवकोष्टके आहेत. या शिखरांच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहेत. समाधी मंदिराच्या छतावर मध्यभागी भजनात दंग असलेल्या मारूतीची विशाल मूर्ती आहे.
मठाच्या विस्तीर्ण प्रांगणात अनेक बहुमजली वास्तू आहेत. त्यात पौराणिक चित्र प्रदर्शन दालन, भक्त निवास, स्वयंपाकघर, विधवा व वृद्धाश्रम, वारकरी शिक्षण संस्था आदी इमारतींचा समावेश होतो. भक्त निवासात सुमारे दोनशे खोल्या आहेत. यात्राकाळात भाविकांच्या राहण्याची येथे व्यवस्था केली जाते. येथील अन्नछत्रात भाविकांना रोज अन्नदान केले जाते. प्रांगणात औषधालय व आरोग्य सुविधा देणारे कक्ष देखील आहेत. प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ आहे.
पंढरपुरातील इतर सर्व मठ व मंदिरांप्रमाणे याही मठात आषाढी व कार्तिकी एकादशी हे मुख्य वार्षिक उत्सव साजरे केले जातात. यावेळी शेकडो भाविक येथे निवासासाठी व लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मठात सर्व एकादशी, वार्षिक सण व उत्सव साजरे केले जातात. याशिवाय मठात नित्य अन्नछत्र सुरू असते.