पुण्याची ग्रामदेवता असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरीचे मंदिर बुधवार पेठेत आहे. पुराणात उल्लेख असलेली योगिनी म्हणजेच योगेश्वरी आणि तीच प्राकृतातील जोगेश्वरी, असे अभ्यासकांचे मत आहे. पुण्याची ही जोगेश्वरी ताम्रवर्णी म्हणून तिला ‘तांबडी जोगेश्वरी’ असे नाव प्राप्त झाले आहे. ‘देवी भागवत’, ‘मार्कंडेय पुराण’, ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथांत या स्थानाचा उल्लेख आहे.
आर्यांनी भरतखंडात वास्तव्य करताना रेवाखंड, दंडकारण्य, अंगवंगादी प्रांतांत शत्रूंबरोबर अनेक युद्धे केली. त्यावेळी जोगेश्वरीने महिष्मती नगरीतील मुख्य महिषासुराचा पराभव करत त्याच्या बारा सेनापतींपैकी एक ताम्रसुराचाही वध केला. म्हणून तिला महिषासूरमर्दिनीबरोबरच ताम्र योगेश्वरी अर्थात ‘तांबडी जोगेश्वरी’ या नावाने ओळखले जाते, अशी आख्यायिका आहे.
मंदिरातील उभ्या रूपातील स्वयंभू तांबडी जोगेश्वरीची मूर्ती चतुर्भुज आहे. ती मातेश्वरी, सावित्री आणि चामुंडा अशी देवत्रयात्मक आहे. तिच्या वरच्या उजव्या हातात डमरू व डाव्या हातात त्रिशूल आहे. खालच्या हातांत उजवीकडे मुंडके व डावीकडे कमंडलू आहे. सव्वा हात उंचीच्या मूर्तीला लागूनच पाठीमागे पाषाण आहे.
मंदिराभोवती दगडातील कोरीव नक्षीकाम आहे. गर्भागृहासमोर व्हरांडा, तर शेजारी मोठे सभागृह आहे. त्यात कीर्तन, भजन, प्रवचनासारखे धार्मिक कार्यक्रम केले जातात. मंदिरातील मुख्य मंडप काळ्या दगडाचा असून त्यावर छोटेखानी कळस आहे. मंडपाच्या प्रवेशद्वारावर सिंहाची प्रतिमा आहे व ते जोगेश्वरीचं वाहन असल्याची मान्यता आहे. मुख्य मंडपात नागधारी गणपती आणि विठ्ठल-रुक्मिणीचेही मंदिर आहे.
हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असून मराठा साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा शिवाजी महाराजांनी पुण्यातील या भूमीवर सोन्याचा नांगर फिरविला, त्यावेळेस ही मूर्ती सापडली, असेही म्हटले जाते.
इतिहासातही तांबडी जोगेश्वरीचा उल्लेख आढळतो. मुघल अंमलदार हुसेनखान याच्या शके 1627 (इसवी सन 1705) मधल्या पत्रात जोगेश्वरी देवी आणि तिचा पुजारी बेंद्रे यांचा उल्लेख सापडतो. त्याच बेंद्रे घराण्याकडे अजूनही देवीच्या पूजेची जबाबदारी आहे.
बुधवार पेठेतील आंबील ओढ्याच्या काठी, तीनशे वर्षांपूर्वी जोगेश्वरी मंदिराच्या चारही बाजूला जंगल होते. मंदिराच्या दक्षिणेस स्मशान होते. अर्थातच या परिसरात कुठेही लोकवस्ती नव्हती, पण पेशवाईत पुणे गावठाणाच्या विस्ताराची गरज भासल्यानंतर स्मशानभूमीचे स्थलांतर करण्यात आले आणि आंबील ओढ्याचा प्रवाह वळवून तेथे नवीन लोकवस्ती वसविण्यात आली. तीच आजची बुधवार पेठ. पेशवे दप्तरी रुमाल क्रमांक 165 मधल्या कागदपत्रांत हा उल्लेख सापडतो.
श्रीमंत माधवराव पेशव्यांनी ऑक्टोबर १७६६ आणि जून १७६७ या साली हैदरवर तिसऱ्या स्वारीला जाण्यापूर्वी आणि तेथून परतल्यानंतर तांबडी जोगेश्वरीचे दर्शन घेतल्याचे उल्लेखही पेशवेदफ्तरी सापडतात.
जोगेश्वरीची आणखी एक कथा सांगितली जाते, ती अशी की मूळ श्रीवर्धनचे असलेले देशमुख भट पेशवे यांचे श्रीवर्धनची योगेश्वरी हे कुलदैवत, पण पुण्याला आल्यानंतर त्यांना योगेश्वरीचे दर्शन मिळेनासे झाले. तेव्हा पेशव्यांनी पुण्याच्या जोगेश्वरीलाच आपली योगेश्वरी मानले. पेशव्यांच्या पत्नी सगुणाबाई, पार्वतीबाई, रमाबाई, राधाबाई, आनंदीबाई जोगेश्वरीच्या दर्शनाला येत आणि जोगेश्वरीची ओटी भरत. दुसर्या बाजीरावाचा विवाह असो वा विनायकराव अमृत याचा व्रतबंध, पेशव्यांच्या लग्नमुंजीच्या अक्षता मोठ्या थाटामाटाने जोगेश्वरीला अर्पण केल्या जात. इचलकरंजीकर, देवासकर, होळकर, भोरकर आदी सरदारही जोगेश्वरीच्या दर्शनास येत.
तुळजापूरच्या भवानीमातेची पालखी नवरात्रीच्या यात्रेस पुण्याहून जाण्याची परंपरा होती. त्यावेळी पेशव्यांकरवी जोगेश्वरी देवस्थानकडून तुळजाभवानीला भेट देण्याची प्रथा होती. जोगेश्वरीचा मुख्य उत्सव म्हणजे नवरात्र. या उत्सवासाठी पेशव्यांकडून एक बकरा, निशाणासाठी गेरू व तेल आणि नवचंडी होमासाठी लागणारे साहित्य मिळत असे.
जोगेश्वरीच्या दररोज दोन पूजा होतात. नवरात्रात दहाही दिवस देवीला वाहनांवर बसवून तिचे पूजन केले जाते. प्रत्येक पौर्णिमेला, मंगळवारी, शुक्रवारी देवीच्या दर्शनाला असंख्य भाविक मंदिराला भेट देतात. लोक लग्न, मुंज इत्यादी मंगलकार्याची प्रथम अक्षता देवीला देतात. मुंजीची भिक्षावळ आणि लग्नाची वरातही येथे आणली जाते. नवजात बाळाला घेऊन बाळंतीण स्त्रिया देवीच्या दर्शनाला येतात आणि मगच नेहमीचे व्यवहार सुरू करतात.
पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवात भव्य विसर्जन मिरवणूक निघते, तेव्हा कसबा गणपतीच्या पाठोपाठ जोगेश्वरी देवस्थानच्या गणपतीला स्थान मिळते. या दोन्ही देवस्थानांना पुण्याचे ग्रामदैवत म्हणून हा मान दिला जातो. पुण्यात देवींची एकूण बत्तीस मंदिरे आहेत; परंतु प्राचीन काळापासून पुण्याची ग्रामदेवता म्हणून अग्रपूजेचा मान आहे तो तांबडी जोगेश्वरीला. अंदाजे नवव्या शतकापासूनचा इतिहास असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराला पुणे महापालिकेने आता पहिल्या श्रेणीतील वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. ही देवी अनेक कुटुंबीयांचे, विशेषत: कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण आणि कऱ्हाडे ब्राह्मणांची कुलस्वामिनी म्हणूनही पूजली जाते. भाविकांना सकाळी साडेसात ते दुपारी एक व दुपारी साडेतीन ते रात्री नऊपर्यंत देवीचे दर्शन करता येते.