तळ्यावरील गणपती मंदिर

मिरज, ता. मिरज, जि. सांगली

ऐतिहासिक, संस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज शहराची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. येथील महत्त्वाचे आकर्षण स्थळ म्हणजे तळ्यावरील गणपती मंदिर. या मंदिराला संस्थानकालीन इतिहास आहे. गणेश ही येथील पटवर्धन घराण्याची आराध्य देवता असल्याने त्यांनी सांगलीमिरजेत अनेक गणेश मंदिरांची स्थापना केली. त्यातीलच एक म्हणजे तळ्यावरील गणेश मंदिर. गणेश तलावासमोरील मंदिर म्हणून तळ्यावरील गणेश मंदिर असे त्याचे नामकरण झाले. मिरजेतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेला येथील गणपती जागृत नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे

सांगलीमिरज संस्थानचे अधिपती असलेल्या पटवर्धन घराण्याचे मूळ पुरूष हरभट बाळंभट हे मूळचे रत्नागिरीतील कोतवडे गावचे होते. त्यांच्याकडे तेथील ग्रामोपाध्ये वृत्ती होती. घरच्या दारिद्र्यामुळे हरभट हे गणपतीपुळे येथे जाऊन राहिले होते. तेथे त्यांनी बारा वर्षे गणेशाची आराधना केली. कोल्हापूरचे सेनापती संताजी घोरपडे यांचे मंत्री नारो महादेव यांच्या ओळखीने ते घाटावर कापशी येथे आले घोरपडे यांचे कुलोपाध्ये म्हणून काम करू लागले. हरभट यांच्या सात मुलांपैकी त्र्यंबक हरि, गोविंद हरि आणि रामचंद्र हरि यांनी पेशव्यांच्या काळात आपल्या पराक्रमाने नाव कमावले. यातील गोविंद हरि यांना श्रीमंत नानासाहेब पेशव्यांकडून मिरजसह मंगळवेढा कुरुंदवाडची जहागिरी प्राप्त झाली होती. या गोविंद हरिंचे पुत्र गंगाधरराव यांनी तळ्यावरील गणेश मंदिर उभारले

सांगली शहराचे संस्थानचे संस्थापक चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन हे गंगाधरराव यांचे पुतणे होते. चिंताणराव लहान असताना राज्यकारभाराची सर्व सूत्रे गंगाधरराव पाहात असत. ते वृत्तीने धार्मिक होते. त्यांनी मिरजेत कृष्णा नदीवरील घाट मार्कंडेश्वराचे, तसेच येथील भुईकोटातील माधवजीचे (विष्णू) मंदिर बांधले होते. गणेश हे त्यांचे आराध्य दैवत असल्याने त्यांनी .. १७९९ मध्ये हे गणेशाचे मंदिर बांधले. पुढे मंदिरातील अन्य इमारती बांधण्यासाठी समोरील मैदान खोदून दगड काढले. त्यामुळे मैदानास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यावरून मंदिराला तळ्यावरील गणपती मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. हा तलाव गणेश तलाव म्हणून ओळखला जातो. हे मंदिर ज्या पेठेत आहे, तिला त्यांनी गणेश पेठ असे नाव दिले होते. सध्या येथे मंगळवारचा बाजार भरत असल्याने या पेठेला आता मंगळवार पेठ म्हणूनही ओळखले जाते. गंगाधर पटवर्धनांनी या मंदिराच्या पूजेचे अधिकार कुडळ प्रांतातील मौजे मोपाडे तर्फ पेडणे येथे वास्तव्यास असणार्‍या गोपाळभट रघुनाथभट आचार्य यांना दिले होते. हे अधिकार १८०१ मध्ये म्हणजे स्थापनेच्या दोन वर्षांनी एका सनदेद्वारा देण्यात आले होते. या सनदेत मंदिरस्थापनेच्या काळाची नोंद आहे.

या मंदिराच्या दुमजली तटबंदीच्या तळमजल्यातून प्रांगणात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस असलेल्या नक्षीदार स्तंभांत दीपकोष्टके आहेत. दुसऱ्या मजल्याच्या दर्शनी भिंतीत तब्बल १४ खिडक्या आहेत. प्रवेशद्वाराच्या नक्षीदार द्वारशाखांना शेंदूर लावलेला आहे. येथून पुढे मंदिराचे पेव्हर ब्लॉक लावलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपात प्रत्येकी पाच चौकोनी लाकडी स्तंभाच्या चार रांगा मध्यभागी चार लाकडी स्तंभ आहेत. सर्व लाकडी स्तंभ चौकोनी दगडी पायावर उभे आहेत. सभामंडपाच्या पुढे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हेमाडपंती स्थापत्यशैलीतील अंतराळ गर्भगृह आहे. तीन अर्धचंद्राकार कमानींनी जोडलेले चार नक्षीदार स्तंभ असे अंतराळाच्या प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दीपकोष्टके आहेत. अंतराळातील मेजावर गणेशाची उत्सव मूर्ती आहे. येथून गर्भगृहातील गणेशमूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर अस्पष्ट नक्षी ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर गणेशाची चतुर्भुज मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती अतिशय रेखीव आहे. मूर्तीच्या मागील दोन हातात शस्त्र आहेत. उजवा हात आशीर्वादाचा तर डाव्या हातात मोदक अशी रचना आहे. मूर्तीचे कान आयतकृती आहेत. डोळे कोरीव ठळक आहेत. सोंडेच्या बाजूचे दोन्ही दात अर्धे तुटलेले आहेत उदरावर नाग आहे

गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर चार घुमटाकार लघू शिखरे मध्यभागी मुख्य शिखर आहे. मुख्य शिखर खालील बाजूस द्वादशकोनी वरील बाजूस घुमटाकार आहे. घुमटावर कमळ फुलांच्या नक्षी आहेत. शिखरात शीर्षभागी आमलक, त्यावर कळस ध्वजपताका आहे. मंदिराच्या प्रांगणात पुजाऱ्यांची निवास स्थाने इतर काही इमारती आहेत

मंदिरात माघ मासातील गणेश जयंती भाद्रपदात पाच दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र भाद्रपद गणेशोत्सवात पार्थिव गणेशाची मूर्ती बसवली जात नाही. उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला मंदिरात भाविकांची वर्दळ वाढते. या प्रसंगी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येथे येतात

उपयुक्त माहिती

  • मिरज रेल्वे स्थानकापासून किमी, तर सांगली शहरापासून किमी अंतरावर
  • सांगली जिल्ह्यातील अनेक शहरातून मिरजसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home