महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गणपतीची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. पुणे शहरातील मानाच्या पाच गणपतींशिवाय येथील दगडूशेठ हलवाई देवस्थान प्रसिद्ध आहे. याशिवाय अष्टविनायक क्षेत्रांपैकी तब्बल पाच क्षेत्रे पुणे जिल्ह्यात आहेत. या अष्टविनायक क्षेत्रांपैकी लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचे अर्धपीठ मानले गेलेले एक क्षेत्र आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथे आहे. अत्यंत जागृत व नवसाला पावणारा गणपती, अशी या स्थानाची ख्याती आहे.
मंदिराबाबतची आख्यायिका अशी की मंचर ते भीमाशंकर हा परिसर म्हणजे पुराणात प्रसिद्ध असलेली मणिपूर नगरी. या समृद्ध भूमीत प्राचीन काळी अनेक ऋषी-मुनी तपश्चर्येला बसत असत. एक बलाढ्य राक्षस भीमासुर त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणून त्यांना त्रास देऊ लागल्याने सर्व ऋषींनी ही समस्या सोडविण्यासाठी शंकराचा धावा केला. त्यानुसार भगवान शंकर या मणिपूर नगरीत भीमासुराचा वध करण्यासाठी आले. हे समजताच राक्षसाने आपल्या सामर्थ्याने शंकराला जागेवरच थोपवले. शंकराचे भीमासुरासमोर काही चालत नाही, हे पाहून ऋषींनी शंकराला तेथून जवळच असलेल्या वडगाव काशिंबेग येथील गणपतीचा सल्ला घेण्यास सांगितले. या गणपतीने दिलेल्या सल्ल्यानुसार शंकराने या भूमीत १२ वर्षे तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांनी भीमासुराचा वध करून सर्व परिसर त्याच्या दहशतीतून मुक्त केला.
मंचर-भिमाशंकर रस्त्यावर घोडेगावपासून जवळच वडगाव काशिंबेग गाव आहे. या गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर स्वयंभू मोरया अर्धपीठ आहे. अष्टविनायकांपैकी श्री लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणपतीची पाठीची पूजा करण्यात येत असल्यामुळे त्याची सोंड दिसत नाही, तर वडगाव काशिंबेग येथील या गणपतीची केवळ सोंडेचीच पूजा केली जाते. या गणपतीच्या सरळ रेषेत पाहिले असता श्री क्षेत्र लेण्याद्री दृष्टिक्षेपात येते. लेण्याद्री व मोरया अर्धपीठ ही दोन्ही देवस्थाने एकाच उंचीवर आहेत. मोरया गणपतीची सोंड उत्तराभिमुख असून लेण्याद्री गणपतीची पाठ दक्षिणाभिमुख आहे. लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाची सोंड स्वयंभूपणे या ठिकाणी प्रकट झाली, अशी मान्यता आहे. त्यामुळे या क्षेत्राला अर्धपीठ संबोधले जाते. या स्वयंभू मोरया अर्धपीठाचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही, असे मानले जाते. महाराष्ट्रात अशा प्रकारची एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते.
मुख्य रस्त्यावर असलेल्या कमानीतून पुढे गेल्यावर डोंगरावरील मंदिरात जाण्यासाठी सुमारे १०० पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वर गेल्यावर जुन्या देवघराप्रमाणे चौकोनी आकाराचे एक छोटेखानी मंदिर आहे. संपूर्ण दगडी बांधकामातील या मंदिरात सोंडस्वरूपातील गणेशमूर्ती आहे. तिची उंची साडेतीन फूट आहे. अनेक जुन्या ग्रंथांमध्ये या देवस्थानाचा उल्लेख आढळतो.
हेमाडपंती रचनेचे हे मंदिर पेशवेकालीन असून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई यांचे ते देवघर मानले जाते. त्या या गणपतीच्या निस्सीम भक्त होत्या. लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाच्या दर्शनाबरोबरच त्या येथे आवर्जून दर्शनासाठी येत. पेशवाईत मंदिरात तेलवातीसाठी दरवर्षी एक रुपया एवढी रसद पाठविली जायची. १८१८ मध्ये पेशव्यांच्या पाडावानंतर ज्या ज्या मंदिरांना पेशव्यांनी इनामे दिली होती, ती इनामे पुढे इंग्रजांनी चालू ठेवली. पेशवे काळात दिलेली इनामे तपासण्यासाठी इंग्रजांनी सन १८५२ मध्ये इनाम कमिशन नेमले. या कमिशनने वडगावच्या गणपतीचे दस्तऐवज तपासले व त्या आधारे १५ एप्रिल १८७५ रोजी सनद देऊन गणपतीला दरवर्षी एक रुपया मदत सुरू केली. ती सनद मोडी लिपी व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.
दर चतुर्थीला भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते. शासनातर्फे तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्गाचा दर्जा या मंदिराला देण्यात आला आहे. सध्या हे मंदिर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित असल्याने तेथे कोणतेही बदल करण्यास मज्जाव आहे. डोंगराच्या पायथ्याशी मंदिर समितीतर्फे भाविकांसाठी भक्तनिवासाची सुविधा करण्यात आली आहे.