
मुंबईहून महाडकडे जाताना माणगावच्या आधी सुमारे तीन किलोमीटर अंतरावर मुगवली गाव लागते. मुख्य रस्त्यापासून साधारणतः दीड किलोमीटर आत निसर्गसमृद्ध परिसरात स्वयंभू गणेशाचे सुंदर आणि प्रशस्त मंदिर आहे. मुगवली हे लहानसे खेडे असले तरी या स्वयंभू गणपती स्थानामुळे या गावाची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या गणेशाचा कोकणातील अष्टविनायकांत समावेश होतो. दर मंगळवारी व संकष्टी चतुर्थीस येथे भाविकांची मोठी रीघ असते.
या मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे ३२५ वर्षापूर्वी सध्या मंदिर असलेल्या जागेवर शेती होती. येथील एक शेतकरी तुकाराम आबाजी म्हसके नांगरणी करीत असताना अचानक नांगराचा फाळ एका दगडाला लागला व त्या दगडातून रक्त येऊ लागले. हे पाहून घाबरलेल्या त्या शेतकऱ्याने गावाकडे धाव घेतली व ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला. गावकऱ्यांनी येथे येऊन या पाषाणाभोवतालची माती बाजूला केली असता सर्वांना स्वयंभू गणेशाचे दर्शन झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी पाषाणाभोवतालची जागा स्वच्छ करून स्वयंभू गणेशाभोवती एक छोटेसे मंदिर बांधण्याचा संकल्प केला. त्यानुसार काही दिवसांनी येथे मंदिर बांधले. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मंदिराचा परिसर प्रशस्त आहे व प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. सभामंडप, अंतराळ व जमिनीपासून खोल असलेले गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला उंच चौथरे आहेत. त्यातील उजवीकडील चौथऱ्यावर गदाधारी हनुमानाची व डावीकडे गरुडदेवतेची मोठी मूर्ती आहे. प्रांगणातून काही पायऱ्या उतरून मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप खुल्या स्वरूपाचा आहे व बाजूने
भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. या सभामंडपात एकाचवेळी हजार ते बाराशे भाविक बसू शकतात. येथेच होमकुंड व भाविकांच्या दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सभामंडपाच्या वर कौले आहेत. येथून पुढे अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात एक खोलगट चौकोनी भाग आहे. त्यात मध्यभागी गणपतीचे स्थान आहे. ही मूर्ती जमिनीतून वर आलेल्या दोन फूट लांबी–रुंदीच्या पाषाणावर नैसर्गिक अवस्थेत आहे. त्यामध्ये मस्तक, उभी वळलेली सोंड, पोट हे अवयव स्पष्ट दिसतात. ही गणेशमूर्ती सिंहासनाधिष्ठित व पाय खाली सोडलेल्या अवस्थेत आहे. ३२५ वर्षांपूर्वीची ही मूर्ती असल्याचे सांगितले जाते. पूर्वीभिमुख मंदिर असल्यामुळे वर्षातील काही दिवस सकाळची सूर्यकिरणे थेट या मूर्तीवर पडतात. हा किरणोत्सव येथे उत्साहाने साजरा करण्यात येतो. गर्भगृहावर शिखर आहे व त्यातील देवकोष्टकांमध्ये अष्टविनायकांसह अनेक देवतांच्या मूर्ती आहेत.
हा जागृत व स्वयंभू गणेश नवसास पावतो, अशी भाविकांची व ग्रामस्थांची श्रद्धा आहे. दरवर्षी माघी गणेश जयंतीला येथे मोठी यात्रा असते. या
उत्सवासाठी हजारो भाविक येथे हजेरी लावतात. या काळात प्रत्येक घरासमोर रांगोळी काढली जाते व रोषणाई केली जाते. सकाळी गणेश महापूजनाने उत्सवाला सुरुवात होते. मध्यान्ही गणेश जन्मदिनाचा सोहळा, तर मध्यरात्री महानैवेद्य केला जातो.
मध्यरात्रीचा महानैवेद्य हा येथील विशेष सोहळा समजला जातो. त्याचा प्रारंभ १९८४ पासून झाल्याचे सांगतात. हा महानैवेद्य खास सोवळ्यात बनविण्याची परंपरा आहे. केळीच्या पानात तो बाप्पासमोर वाढला जातो. रात्री बाराच्या सुमारास बाप्पास भोजनाचे आवाहन करण्यात येते. त्यानंतर सारे मंदिराबाहेर जातात. अर्ध्या तासानंतर मंदिराचे दार जेव्हा पुन्हा उघडते, तेव्हा नैवेद्यातील भाताची मूद फोडलेली, लाडू फुटलेले, तर मोदकातील काही भाग खाल्लेला आणि केळीच्या पानातील इतर जिन्नस हललेले दिसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाप्पाने ग्रहण केलेल्या या महानैवेद्याचे दर्शन घेण्याकरीता भाविकांची पहाटे चार वाजेपर्यंत येथे रीघ असते. मंदिर परिसरात भाविकांसाठी भक्त निवासाची सुविधा करण्यात आलेली आहे. याशिवाय जवळच असलेल्या माणगावमध्ये निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.