सुमारे २२ हजार फूट उंचीच्या केदारनाथ पहाडाच्या कुशीत वसलेले केदारनाथ मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. रुद्रप्रयागच्या त्या भूमीत जाऊन बाबा केदारनाथांचे दर्शन घेणे सर्वच भाविकांना शक्य होत नाही. त्यांना त्र्यंबकेश्वरच्या या पावन भूमीतच केदारनाथांचेही दर्शन घेता यावे, या हेतूने अंजनेरीनजीक हुबेहूब केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभी करण्यात आली. तेच हे श्री स्वरूपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर. ‘प्रतिकेदारनाथ मंदिर’ म्हणून ते ओळखले जात आहे.
अंजनेरी पर्वतरांगेमध्ये वाढोली गावात हे मंदिर उभे आहे. माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या संकल्पनेतून आणि पुणे येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून हे मंदिर साकारण्यात आले आहे.
उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर हे अत्यंत प्राचीन आहे. सध्याचे केदारनाथ मंदिर हे आठव्या शतकात आदि शंकराचार्यांद्वारे निर्माण करण्यात आले असून पांडवांनी द्वापार युगात बांधलेल्या मूळ मंदिराच्या शेजारीच हे मंदिर उभे आहे, असे सांगितले जाते. अंजनेरीनजीकचे प्रतिकेदारनाथ मंदिर ४ मे २०१४ रोजी पूर्ण झाले. तेव्हा भाविकांना त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मंदिर परिसरात छायाचित्रणास बंदी आहे, पण २०२२ च्या प्रारंभी मंदिराची काही छायाचित्रे, तसेच चित्रफिती समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसूत झाल्या आणि ‘प्रतिकेदारनाथ मंदिर’ म्हणून भाविकांची येथे मोठी गर्दी होऊ लागली.
मंदिरात जाण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना वाढोली फाटा लागतो. त्या फाट्यावरून डावीकडे वळल्यानंतर काही अंतरावर वाढोली गाव आहे. गावातून मंदिराकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे. गावापासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. तसेच अंजनेरी फाट्यावरूनही मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे.
मंदिराकडे जाणारा रस्ता वळणावळणाचा व झाडांनी आच्छादलेला आहे. मंदिराचे बांधकाम सिमेंट व विटांच्या साह्याने करण्यात आले असले, तरी बांधकामाची शैली मात्र प्राचीन, हुबेहूब केदारनाथ मंदिराप्रमाणे आहे. केदारनाथाचे मंदिर ६ फूट उंचीच्या चौकोनी चबुतऱ्यावर उभारलेले असून सभामंडप, मध्यभाग आणि गर्भगृह असे त्याचे तीन भाग आहेत. त्याच्या प्रांगणात नंदीची मूर्ती आहे.
मंदिरास तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी दोन प्रवेशद्वारे खुली असतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोनेरी नक्षीकाम केले असून बाजूला द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. समोरच नंदीची सुबक मूर्ती आहे. सभामंडपात भवतारिणी श्री नर्मदा देवी व आदि शंकराचार्य यांच्या छोट्या मूर्ती आहेत. मंदिराचे गर्भगृह प्रशस्त आहे. बाणासुराने भगवान शंकराची पूजा करून नर्मदेत विसर्जित केलेल्या बाणलिंगांपैकी ते एक असल्याचे सांगितले जाते.
मंदिराजवळ शिवशक्ती ज्ञानपीठाचे प्रशासकीय कार्यालय आहे. कार्यालयाच्या जवळ ‘शंकर सत्संग भवन’ आहे. येथे आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद घेता येतो. साधनेसाठी पवित्र, अनुकूल स्थान असल्याने याठिकाणी अनेक साधू-संत भेट देतात. आदि शंकराचार्यांची सुंदर मूर्ती येथे पाहायला मिळते. भवनाजवळच नारळाच्या झाडांनी वेढलेले ‘गौरीकुंड’ आहे. या कुंडालगत मंदिरापासून काही अंतरावर आदिशक्ती मातेचे छोटेखानी मंदिर आहे. या दुर्गा परमेश्वरी मंदिराच्या खांबांवर सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. मंदिरात जाताना २७ नक्षत्रांची नावे असलेल्या पायऱ्या चढून जावे लागते. मंदिरात आदिशक्ती मातेची सिंहावर आरूढ देखणी मूर्ती आहे. या मंदिरातून सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. मंदिराशेजारी भोजनालय असून उत्सव काळात येथे मोफत अन्नदान केले जाते. भोजनालयापासून काही अंतरावर ‘नर्मदा भक्तनिवास’ आहे. उत्सवादरम्यान भाविकांची राहण्याची सोय येथे केली जाते.
श्री स्वरूपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिराचा ‘प्रतिकेदारनाथ मंदिर’ म्हणून प्रचार, प्रसार हा भाविकांनीच केला असून येथील निसर्गरम्य वातावरण पाहून भाविकांना केदारनाथला आल्याचा भास होतो. मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. मंदिर परिसर वनभागात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर लवकर बंद केले जाते. ‘शिवशक्ती ज्ञानपीठा’तर्फे येथे प्रत्येक महिन्याला वेद, वेदांत शिबिर घेण्यात येते. तसेच मंदिरात महाशिवरात्री, श्रावणी सोमवारी, गुरुपौर्णिमा, आदि शंकराचार्य जयंती, नर्मदा जयंतीनिमित्त या दिवशी मोठा उत्सव होतो.