स्वामीनारायण संप्रदाय हा भारतातील प्रसिद्ध धार्मिक संप्रदाय आहे. या संप्रदायाने देश-विदेशात उभारलेली स्वामीनारायण मंदिरे ही स्थापत्यकला, सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा सुंदर मिलाफ मानली जातात. नीलकंठवर्णी तथा स्वामी सहजानंद हे या संप्रदायाचे संस्थापक होत. त्यांना स्वामीनारायण म्हणजे श्रीकृष्णाचे अवतार मानले जाते. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात स्वतः काही मंदिरे उभारली होती. आज त्यांच्या नावाने ओळखली जाणारी मंदिरे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांना समर्पित असलेले भव्य व सुंदर असे एक मंदिर भुसावळ शहरातही आहे.
१९व्या शतकाच्या आरंभापासून सुरू झालेल्या या संप्रदायाचे संस्थापक स्वामी सहजानंद यांचे मूळ नाव घनश्याम पांडे असे होते. इ.स. १७८१ मध्ये उत्तर प्रदेशातील अयोध्येजवळील छपैया या गावात त्यांचा जन्म झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी सात वर्षे भारतभ्रमण केले, तसेच हिमालयात तपश्चर्या केली. या काळात नीलकंठ वर्णी या नावाने ते ओळखले जात. इ.स. १८०० मध्ये ते सौराष्ट्रातील मांगरोळ येथे आले. तेथे स्वामी मुक्तानंद यांच्याकडून आणि नंतर पीपलाणा येथे गुरू रामानंद यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी गुजरात हे आपले धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्यक्षेत्र म्हणून निवडले. रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत व वल्लभाचार्यांच्या शुद्धाद्वैत या तत्त्वज्ञानाचा आधार घेत त्यांनी समन्वयकारी धर्माचा प्रसार केला.
नीलकंठ वर्णी यांना सहजानंद हे नाव रामानंद यांनी दिले. इ.स. १८०१ मध्ये सहजानंद हे रामानंद यांच्या उद्धव संप्रदायाचे प्रमुख बनले. स्वामी नारायण म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत व लोकांनी त्याला शरण जावे हा त्यांचा उपदेश असे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की सहजानंद ऊर्फ नीलकंठ वर्णी हेच स्वामीनारायण म्हणजे ईश्वराचा अवतार आहेत. स्वामी सहजानंद हे स्वतःही तसे मानत असत. असे सांगितले जाते की नोव्हेंबर सन १८२० मध्ये स्वतः सहजानंद यांनी गोपालानंद स्वामी यांना आपण अवतार का घेतला याची सहा कारणे सांगितली होती.
त्यांनी आपल्या जीवनकाळात अहमदाबाद, भूज, वडताल, धोलेरा, जुनागड व गधाडा येथे मंदिरे उभारली होती. या सहापैकी अहमदाबाद येथील मंदिर सुप्रसिद्ध आहे. स्वामीनारायण यांचे तत्कालिन सत्ताधारी असलेल्या ब्रिटिशांशी उत्तम संबंध होते. ब्रिटिशांनी त्यांना अहमदाबाद येथे मंदिर बांधण्यासाठी जमीन दिली होती. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी ब्रिटिशांनी २१ तोफांची सलामी दिली होती. स्वामीनारायण यांनी समाजसुधारणेचीही अनेक कामे केली. ब्रिटिश सरकारने सती प्रथेच्या विरोधात कार्यवाही करावी याकरीता त्यांनी ब्रिटिश गव्हर्नर जेम्स वॉकर यांना प्रोत्साहित केले होते.
जेष्ठ शुद्ध दशमी, संवत १८८६ (१ जून १८३०) रोजी स्वामीनारायण यांचा देहान्त झाला. आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी नरनारायण देव गादी, अहमदाबाद व लक्ष्मीनारायण देव गादी, वडताल या दोन गाद्यांची स्थापना केली होती. त्यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या दोन चुलत भावांच्या दोन मुलांना दत्तक घेतले व या गाद्यांवर आचार्य म्हणून त्यांची नियुक्ती केली. अयोध्याप्रसाद पांडे (अहमदाबाद गादी) व रघुवीर पांडे (वडताल) अशी त्यांची नावे होत. त्यांनाच मंदिरात मूर्ती स्थापित करण्याचा आणि साधू व गृहस्थांना सांप्रदायिक दीक्षा देण्याचा अधिकार स्वामीनारायण यांनी दिला होता. कालांतराने या संप्रदायातील मूळ गाद्यांशी मतभेद होऊन काही संस्था निर्माण झाल्या. बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था, स्वामीनारायण गादी (मणिनगर), गुणातीत समाज या त्यातील काही प्रसिद्ध संस्था होत. भुसावळ येथील मंदिर हे मूळ स्वामीनारायण संप्रदायाच्या वडताल गादीशी संबंधित आहे.
या मंदिराचा इतिहास असा की ‘वडताल टेंपल मॅनेजिंग ट्रस्टी बोर्ड’च्या अनुमतीने, तसेच अक्षरमूर्ती गोपाळानंद स्वामी यांच्या सहाव्या शिष्यपरंपेतील आचार्य राकेशप्रसाद महाराज यांच्या आज्ञेने या मंदिराची उभारणी करण्यात आली. १५ डिसेंबर २००८ रोजी स्वामी प्रभुजीवनदास व पुरुषोत्तमचरणदास यांच्या हयातीत या मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. सुमारे आठ वर्षे या मंदिराचे बांधकाम सुरू होते.
राकेशप्रसाद महाराज यांचे गुरुबंधू स्वामी धर्मस्वरुपदास व अन्य संत मंडळींनी या मंदिर उभारणीचे कार्य पूर्ण केले. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी, संवत २०७३ (सोमवार, ५ डिसेंबर २०१६) रोजी मंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
भुसावळमधील तुकाराम नगर परिसरात मोठ्या प्रांगणात हे मंदिर वसले आहे. मंदिर प्रांगणाच्या लोखंडी गेटमधून आत प्रवेश करताच समोर सुशोभित स्तंभांवर टांगलेल्या दोन घंटा दिसतात. येथे नक्षीदार दीपस्तंभही आहेत. येथून मंदिराच्या मुखमंडपात जाण्यासाठी ११ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना अंबारीधारी गजराजांच्या सुंदर मूर्ती आहेत. मुखमंडप, सभामंडप, त्याच्या दोन्ही बाजूंना उपमंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंडपांतील कोरीव नक्षीकामाने नटलेले स्तंभ, त्या स्तंभांमधील मकरतोरणे, तसेच भव्य शिखरे व उपशिखरे ही स्वामीनारायण मंदिरांच्या स्थापत्य रचनेची वैशिष्ट्ये या मंदिरातही पाहावयास मिळतात. मंदिराच्या मुखमंडपातील देवळ्यांमध्ये विघ्नविनायक गणपती आणि कष्टभंजनदेव हनुमानाच्या मूर्ती आहेत. हनुमानाच्या देवळीच्या द्वारचौकटीवरील भागात आसनाधिष्ठित श्रीराम, सीतेची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी मूर्ती आहे. त्यात श्रीरामाची पदकमले हनुमानाने आपल्या अंकावर घेतली आहेत.
सभामंडपाच्या कमानदार प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची रंगीत शिल्पे आहेत.
त्यावरील भाग मयूरनक्षीने सुशोभित आहे. गुळगुळीत संगमरवरी फरशा बसवलेल्या या सभामंडपास डाव्या व उजव्या बाजूंनीही प्रवेशद्वारे आहेत. समोरच मंदिराचे एक मुख्य व दोन उप अशी तीन गर्भगृहे आहेत. गर्भगृहांच्या द्वारचौकटी नक्षीदार सुवर्णरंगी स्तंभाने सुशोभित आहेत. उत्तरांग भागांत तीन छोटी शिखरे आहेत. मुख्य गर्भगृहात संगमरवरी अधिष्ठानावर हरिकृष्ण महाराजांची काळ्या पाषाणातील समपाद मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीस गुजराती पद्धतीचे वस्त्रेप्रावरणे व मस्तकी फेटा आहे. डाव्या बाजूच्या उपगर्भगृहात उंच संगमरवरी वज्रपिठावर राधा-कृष्णाची, तर उजवीकडील उपगर्भगृहात लक्ष्मी-नारायणाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या उपगर्भगृहानजीक स्वामीनारायणांच्या प्रतिमा आणि पादुकांचे, तसेच बैठकीचे स्थान आहे. गर्भगृहांसमोरच्या जागेत सुंदर कोरीव व रंगकाम केलेला झुला आहे. गजशिल्पांवर उभारलेले स्तंभ, त्यांच्या शीर्षस्थानी वादकांची शिल्पे, त्यावरील भागात मेघडंबऱ्या, मध्यभागी त्रिकोणी बाशिंगासारखा भाग. त्यावर मयुरशिल्पे अशा प्रकारे हा झुला सजवलेला आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने ओवरीत प्रदक्षिणामार्ग आहे. येथील स्तंभांच्या शीर्षस्थानी विविध वादकांची शिल्पे आहेत. बाशिंगी छतावर छोट्या मेघडंबऱ्या आहेत. मंदिरास पाच उंच शिखरे आणि तीन घुमटाकार शिखरे आहेत.
या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. येथे कृष्ण जन्माष्टमी, हनुमान जयंती, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, वामन जयंती, जलझीलणी उत्सव, भागवत सप्ताह ज्ञानयज्ञ आदी उत्सव व सण मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात.