नाशिकमध्ये ऐतिहासिक व पौराणिक वारसा सांगणाऱ्या अनेक वास्तू आणि मंदिरे आहेत. त्यातील एक अतिशय प्राचीन मंदिर आहे सुंदर नारायण मंदिर! नाशिकच्या मुख्य बस स्थानकापासून जवळच असलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. भाविकांसाठीही ते भक्तिभावाचे स्थान आहे, कारण देवी लक्ष्मी आणि तुलसी यांच्यासोबत भगवान विष्णू यांचे हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या उभारणीत १८व्या शतकातील हिंदू आणि मुस्लिम वास्तुकलेचे मिश्रण आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की भगवान विष्णूंना जालंदर पत्नी वृंदा हिच्या शापाने कृष्णवर्णरूप प्राप्त झाले होते. तेव्हा विष्णूंनी गोदावरी येथील तीर्थावर स्नान करून आपले रूप पूर्ववत प्राप्त करून घेतले. शापमुक्त झाल्यानंतर भगवान विष्णूंनी याच ठिकाणी वास्तव्य करण्यास सुरुवात केली. मग त्याच ठिकाणी मंदिर बांधले गेले हे सुंदर नारायणाचे मंदिर!
गोदावरीच्या काठावर होळकर पुलाजवळ असलेले हे मंदिर पेशव्यांचे सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी १७५६ मध्ये तब्ब्ल १० लाख रुपये खर्च करून बांधले होते. मंदिराची काहीशी पडझड झाली असली तरी जो भाग उभा आहे त्यातून त्याची रचना किती सुंदर असावी याची कल्पना येते. या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे २० व २१ मार्च रोजी सूर्याची किरणे भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडतात. दिवाळीनंतर येणाऱ्या एकादशीला येथे ‘हरिहर भेट’ साजरी केली जाते. यावेळी कपालेश्वर मंदिराचे पुजारी मध्यरात्री सवाद्य येत कपालेश्वराचा बेलाचा हार स्वामी नारायण म्हणजेच विष्णूंना अर्पण करतात, तर सुंदरनारायण मंदिराचे पुजारी तुळशीचा हार कपालेश्वर मंदिरात शिवलिंगाला अर्पण करतात. हा सोहळा पाहण्यासाठी नाशिक शहर व परिसरातील भाविक येथे आवर्जून येतात.
हे मंदिर औरंगजेबाने उद्ध्वस्त करून याच ठिकाणी थडगे बांधले होते. मात्र, पेशव्यांनी हे थडगे काढून त्याच ठिकाणी या मंदिराची स्थापना केली. त्यामुळेच या मंदिराची रचना मिश्र दिसते. दगडात केलेले कोरीव काम आणि दगडी बांधीव काम, असे एकत्रित दिसते. मंदिरावर मुघल वास्तुकलेचीही छाप पाहायला मिळते. मंदिराचा गोल घुमट याची साक्ष देतो. हे मंदिर दगडी चौथऱ्यावर बांधण्यात आले असून, मंदिराचे शिखर दुरूनही दिसते. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या बांधकामाची अचूक तारीख देणारा शिलालेखही येथे आहे. काळ्या पाषणातील या मंदिरासाठी कुठेकुठे दगड, चुना, नवसागर, शिसे यांचा वापर करण्यात आल्याचेही दिसते.
मंदिरात अनेक ठिकाणी कलाकुसर दिसते, जी अतिशय रेखीव आणि आखीव आहे. मंदिरात हनुमान, नारायण या मूर्तींसह काळ्या पाषणातील अनेक मूर्ती दिसतात. मंदिराची खांबांवरील कलाकुसर उत्तम पद्धतीने केलेली पाहायला मिळते.
मंदिराच्या गर्भगृहात सरस्वती, लक्ष्मीसोबत तुलसी आणि स्वामी नारायण यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाचा घुमटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो उभ्या आणि आडव्या रेषांनी सजवण्यात आला आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या तिन्ही बाजूला छत्र्या असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे.
कार्तिक पौर्णिमेला या मंदिरात दिव्यांची आरास करण्यात येते. त्यासाठी मंदिराच्या भिंतींत पेटते दिवे ठेवण्याची खास सोय आहे. दिव्यांची ही आरास करण्याची परंपरा पेशवे काळापासून अखंड सुरू आहे. दिव्यांच्या मंद प्रकाशात मंदिराचे सौंदर्य आणखी खुलते. सुंदर नारायण मंदिरासमोर कपालेश्वराचे मंदिर आहे. नाशिकला दर्शनाला येणारे भाविक या दोन्ही मंदिरांना आवर्जून भेट देतात. येथील एक खास वैशिष्ट्य म्हणजे एका मंदिराच्या गाभाऱ्यात उजळलेले दिवे दुसऱ्या मंदिरातून अगदी सहजपणे दिसावेत, अशी रचना ही दोन्ही मंदिरे उभारताना करण्यात आली आहे.