श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर

वीर, ता. पुरंदर, पुणे


काशी काळखंडाचा राजा काळभैरव म्हणजेच श्रीनाथ म्हस्कोबाचे सासवडजवळील वीर येथे जागृत स्थान आहे. माघ पौर्णिमा ते वद्य दशमीपर्यंत दहा दिवस चालणारी येथील यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्राकाळात सांगितली जाणारी ‘भाकणूक’ ऐकण्यासाठी हजारो भाविक व शेतकरी येथे येतात. फार पूर्वी येथे स्मशानभूमी अर्थात मसणवटा होता म्हणून या देवाचे नाव श्रीनाथ म्हस्कोबा पडल्याचे सांगितले जाते.

मंदिराची अख्यायिका अशी, येथील कमळाजी हा श्रीनाथांचा निःस्सीम भक्त. तो शेळ्या, मेंढ्या, गायी गुरे घेऊन चरायला बेळगाव जिल्ह्यातील सोनारीपर्यंत जायचा आणि रात्री शेळ्या, मेंढ्यांना जवळच्याच एका वाड्यात बांधून सोनारीतील श्रीनाथांना अभिषेक, अभ्यंगस्नान घालून, तरवड्याची पाने- फुले वाहून देवाची पूजा करायचा. देवाला स्वतःकडील भाकरी-कांद्याचा तुकडा नैवेद्य म्हणून दाखवयाचा आणि रात्रभर श्रीनाथांची उपासना करत बसायचा. त्याचा हा नित्यक्रम सुरू असताना स्थानिक ग्रामस्थांनी रात्री मंदिरात गुपचूप येणारा हा पुजारी कोण, याची शहानिशा करण्याचे ठरविले. तेव्हा श्रीनाथांनी कमळाजीला प्रत्यक्ष दर्शन देत मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला. पण कमळाजीने काही झाले तरी तुझी पूजा करणारच, असा हट्ट धरला.भक्ताच्या काळजीपोटी देवाने मीच तुझ्या भेटीला येईन, असे कमळाजीला सांगितले. पण तू आलास हे मला कळेल कसे, असे कमळाजीने विचारल्यावर श्रीनाथ म्हणाले, मी जेव्हा येईन तेव्हा भाकड गाय दूध‌ द्यायला लागेल आणि सुकलेल्या झाडाला पालवी येईल. दुसऱ्या दिवशी गायीच्या पोटाभोवती एक पाच तोंडाचा काळसर्प विळखा घालून बसलेला कमळाजीला दिसला. ती गाय भाकड असतानाही तिला पान्हा फुटला होता आणि त्या काळसर्पाची चार तोंडे ते दूध पित होती. इतर गायी भिऊन पळाल्र्या तर नाहीत ना, हे पाहण्यासाठी माळावर गेला असता तेथे सुकलेल्या झाडाला पालवी आल्याचे कमळाजीला दिसले. श्रीनाथांनी त्यांच्या आगमनाची सांगितलेली खूण तंतोतंत पटली, तसे कमळाजीने मोठ्या भक्तिभावाने डोक्याचे उपरणे काढून देवाला आसन म्हणून जमिनीवर पसरले आणि तो हात जोडून उभा राहिला. तसा तो पंचमुखी सर्प त्यावर येऊन बसला. कमळाजीने मनोभावे पूजा करून त्याला आपल्या घोंगडीत लपवून ठेवले. त्यानंतर रोज तो घोंगडीतून सर्पाला बाहेर काढून त्याची नित्यनेमाने पूजा करत असे. त्याला नैवेद्य देत असे. बारा वर्षे ही पूजा सुरू होती.एकदा एका ग्रामस्थाने हे सर्व पाहिले आणि कमळाजींच्या वडिलांना सांगितले की तुमच्या मुलाने घोंगडीत सर्प पाळलेला आहे. वडिलांना वाटले, आपला मुलगा मंत्रविद्येचा, जादूटोण्याचा अभ्यास करत असावा. त्यांनी कमळाजीला विचारले, तुझ्या घोंगडीत तू सर्प पाळला आहेस का? त्यावर कमळाजी काही न बोलता तेथून निघून गेला. कारण त्याला वडिलांशीही खोटे बोलायचे नव्हते आणि श्रीनाथांपासून पारखेही व्हायचे नव्हते. ही अडचण त्याने श्रीनाथांना सांगितली, तेव्हा तू मला एका वारुळात सोड, असे देवाने कमळाजीला सांगितले. त्यानुसार कमळाजीने सर्पाला माळावरील एका वारुळात सोडले व त्यानंतर रोज वारुळाजवळ येऊन पूजा-आराधना सुरू केली. राऊत कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनीशेजारीच हे वारूळ होते. काही वर्षांनी राऊत कुटुंबीयांनी ही जमीन कसण्याचे ठरविले. तेव्हा कमळाजीने कुठेही नांगरा, पण वारुळाला हानी होऊ देऊ नका, असे विनवले. राऊत कुटुंबीयांनी मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत वारुळावरूनही नांगर नेला, तेव्हा नांगराचे बारा बैल आणि नांगरणारे राऊतांचे कुटुंबीय जागच्या जागी मरून पडले. गावात खळबळ उडाली. कमळाजी तेथे आला तसे त्यांच्या अंगात श्रीनाथांचा संचार झाला. त्यांनी सगळा प्रकार लोकांना उलगडून सांगितला. तेव्हा लोकांनी‌ श्रीनाथांची हात जोडून क्षमा मागितली. तसे कमळाजीने श्रीनाथांचा अंगारा फुंकून बैल आणि मृत्युमुखी पडलेले राऊत कुटुंबीय पुन्हा जिवंत केले.

पूर्णगंगेच्या तीरावर उभारलेले हे मंदिर सातारा जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. या पूर्वाभिमुख मंदिराचे बांधकाम पूर्णपणे काळ्या दगडाचे आहे. मंदिराची रचना ‘देऊळवाडा’ प्रकारातील असून त्याच्या चारही बाजूंनी उंच तटबंदी आहे. मंदिराच्या पूर्वेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर समोरच पादुकामंदिर आहे. यात्रा काळात पादुका मंदिराच्या शिखरापासून मुख्य मंदिराच्या कळसापर्यंत फेटा बांधला जातो. या प्रथेला ‘ध्वज बांधणे’ असे म्हणतात. पादुकामंदिर आणि मुख्य मंदिर याच्यामध्ये भव्य दगडी कासव आहे. या कासवावर उभे राहून नवस बोलल्यावर तो पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तटाच्या आतील बाजूला ओवऱ्या आहेत. येथे शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण, राऊत आदी म्हस्कोबाचे मानकरी यात्रा काळात वास्तव्य करतात.

मंदिराच्या मुख्य द्वाराच्या पायरीवर, बाहेरच्या बाजूला, मोठी घंटा आहे. मंदिरात शिरल्यावर डाव्या बाजूला श्रीनाथांचे वाहन असलेल्या चिंतामणी नावाच्या अश्वाची मोठी मूर्ती आहे. त्याच्या समोर आदिशक्ती तुकाईदेवीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीच्या रूपातील आहे.

मुख्य गर्भगृहात श्रीनाथ म्हस्कोबा आणि आई जोगेश्वरी यांच्या शेंदूरचर्चित तांदळास्वरूप स्वयंभू मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या शेजारी, उजव्या बाजूला, देवाचे शेजघर आहे. त्यामध्ये श्रीनाथांचा पलंग ठेवलेला आहे. दर्शन घेताना आधी प्रथम पादुका, कासव, चिंतामणी अश्व, तुकाईदेवी व नंतर गर्भगृहात श्रीनाथांचे दर्शन घेतले जाते. मग शेजघराजवळच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडून डावीकडे काळूबाईची पूजा केली जाते. मंदिराच्या मागच्या बाजूच्या देवांचे दर्शन घेऊन, गोमुख दर्शन करत भक्तगण मंदिराच्या समोरील बाजूस येतात. येथे उजव्या बाजूच्या मारुतीचे दर्शन घेतले जाते. अखेर पुन्हा पादुकांचे दर्शन घेऊन कासवावर आल्यानंतर मंदिराची एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि आई जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने दरवर्षी येथे माघ पौर्णिमेपासून दहा दिवस यात्रा असते. गोंधळनृत्य, फुगड्या, लेझीम यासोबतच टाळ-मृदंगाचा गजर आणि श्रीनाथ महाराजांच्या नावानं चांगभलं, काळभैरवाच्या नावानं चांगभलं असा अखंड जयघोष यावेळी सुरू असतो. या यात्रेमध्ये भाकणूक म्हणजे पूर्ण वर्षभराचे पीकपाण्याचे भाकीत वर्तविले जातात. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांच्या अंगात श्रीनाथ म्हस्कोबा संचारतात आणि ते भाकणूक सांगतात. हे भाकीतकथन पाच दिवस चालते. राज्यभरातून भाविक शेतकरी ही भाकणूक जाणून घ्यायला येथे येतात. काळभैरवाच्या सूचनेप्रमाणे सर्व काही घडते, अशी त्यांची भावना असते. त्यानुसार आपापल्या पीक पद्धतीत बदलही करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो.यात्रेदरम्यान सर्व काठ्या, पालख्या पूर्व दरवाजातून आत प्रवेश करतात. तसेच माघ शुद्ध पौर्णिमेला लग्नाच्या दिवशी सर्व काठ्या, पालख्या ‘अंधारचिंच’ या पुरातन वृक्षाखाली जाण्यासाठी दक्षिण दरवाजातून जातात. दशमीला यात्रेची अर्थात या विवाह सोहळ्याची सांगता होते. या यात्रोत्सवासोबतच नवरात्र व कार्तिक वद्य अष्टमीचा श्रीकाळभैरव जन्मोत्सव हे येथील प्रमुख उत्सव आहेत.

उपयुक्त माहिती:

  • पुणेपासून ३० तर सासवडपासून ८ किमी अंतरावर
  • गावात जाण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी गाड्या मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • भाविकांना प्रसादाची सुविधा
Back To Home