श्रीदत्त मंदिर / कर्दम ऋषी आश्रम

करंजी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

श्रीदत्तात्रेयांचे आजोळअशी मान्यता असलेले दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी येथे कर्दम ऋषींचा आश्रम आहे. येथील मंदिरात श्रीदत्तात्रेयांची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती आहे. श्रीदत्तात्रेयांनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्याने ही मूर्ती पद्मासनातील असल्याचे मानले जाते. संपूर्ण राज्यात श्रीदत्तात्रेयांची पद्मासनातील ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते.

ग्रंथांमधील उल्लेखानुसार, सृष्टीची रचना विस्तार करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आपल्या सावलीपासून कर्दम ऋषींची निर्मिती केली. कर्दम ऋषींनी आपल्या विद्या सामर्थ्याच्या बळावर विमानाची रचना केली होती. त्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या मनू ऋषींनी आपली कन्या देवहूतीशी लग्न करावे, असा प्रस्ताव कर्दम ऋषींकडे ठेवला. या प्रस्तावाचा स्वीकार करून ते मनू कन्या देवहूतीशी विवाहबद्ध झाले. त्यांना एक मुलगा नऊ मुली झाल्या. मुलगा कपिल ऋषी विष्णूचे अवतार मानले जातात. विष्णूच्या २४ अवतारांमध्ये त्यांचा समावेश आहे. कर्दम ऋषींनी आपल्या मुली कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गति, क्रिया, ख्याति, अरुंधती तथा शान्ति या मुलींची लग्ने अनुक्रमे मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, भृगु, वसिष्ठ तथा अथर्वा या ऋषींशी लावली.

कपिल ऋषींनी आई देवहूतीकडून कर्दम आश्रमात राहून भक्तीवैराग्याचे धडे घेतले. देवहूतीने गृहस्थाश्रमाचा त्याग करून अध्यात्म मार्गाची निवड केली. काही दिवसांनी कपिल ऋषी कर्दम आश्रमातून ईशानकोण आश्रमात गेले. अनसूया अत्री यांचा झालेला मुलगा पुढे दत्तात्रेय म्हणून परिचित झाला. दत्तात्रेयाचे पालनपोषण त्यांचे आजोबा कर्दम ऋषींच्या याच आश्रमात झाले असावे, असे मानले जाते.

दिंडोरी तालुक्यातील करंजी हे क्षेत्र निसर्गसमृद्ध परिसरात वसले आहे. पूर्वी दंडकारण्य असलेल्या या भागात कर्दम ऋषी तपश्चर्या करीत होते. येथे करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे परिसराला करंजी येथील आश्रमाला कर्दमाश्रम नाव पडल्याचे सांगितले जाते. त्यातही श्रीदत्तात्रेयांचे आजोळ म्हणून हे क्षेत्र जास्त परिचित आहे. त्यामुळे येथील पद्मासनात असलेल्या दत्तात्रय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दररोज शेकडो भाविक येतात.

या आश्रमातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे काशीची गंगा अवतरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पर्वणीकाळात हजारो साधूमहंत या गंगेत स्नान करण्यासाठी कर्दम ऋषींच्या आश्रमात येतात, म्हणून या क्षेत्राला प्रति गाणगापूर असेही म्हटले जाते. प्राचीन काळापासून नाशिकमधील आखाड्यांतील साधूंही येथे मोठ्या प्रमाणावर येतात.

कर्दमाश्रमात गंगास्थानावर घाट बांधण्यात आला आहे. या घाटाजवळ गंगा मंदिर आहे. याशिवाय गणेश मंदिर, महादेव मंदिर, सप्तशृंगी माता विठ्ठलरुक्मिणी ही मंदिरेही आहेत. येथे स्वामी शिवदयाळ गिरी रामचंद्र महाराज यांचे समाधी मंदिर आहे. असे सांगितले जाते की शिवदयाळ स्वामी यांच्या तपसामर्थ्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष गंगा अवतरली श्रीदत्तात्रेयांची मूर्ती प्रकट झाली. शिवदयाळ स्वामींकडे एकदा ज्येष्ठ शुक्ल दशमीस एक वृद्ध दाम्पत्य आले होते. स्वतः स्वामी त्यांच्याबरोबर दशमी, एकादशी द्वादशीपर्यंत थांबले. जेवण आटोपल्यानंतर त्यांनी त्या स्त्रीचे साडीचोळीने ओटीभरण करून त्यांना निरोप दिला. स्वामींच्या या कृतीबाबत भक्तांनी विचारले असता, साक्षात पंढरपूरचे विठ्ठलरुख्मिणी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. स्वामींनी या परिसरात १८२७ साली जिवंत समाधी घेतली. असे सांगितले जाते की समाधीनंतर पुढील सहा महिने ते जिवंत होते. त्यांना श्वास घेता यावा यासाठी जमिनीच्या उंचीपर्यंत तांब्याची नळी लावली होती, ती नळी आजही येथे पाहायला मिळते.

करंजीतील या ठिकाणी दत्त आखाड्याचीही परंपरा आहे. आखाड्याचे मठाधीपती शिवदयाळ गिरी स्वामी, सदगुरू रामचंद्र ब्रह्मचारी, मुकुंद महाराज ब्रह्मचारी, हरी गिरीजी ब्रह्मचारी, भास्करानंद ब्रह्मचारी आणि त्यानंतर महंत सुभाषगिरी महाराज यांनी या आखाड्याची जबाबदारी सांभाळली.

कर्दमाश्रमात चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती हे उत्सव साजरे केले जातात. ज्येष्ठ शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा या काळात गंगादशहरा (गंगाउत्सव) नामसप्ताहाचे आयोजन करण्यात येते. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा या काळात दत्तजन्मोत्सव साजरा केला जातो. देवस्थानतर्फे विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, भाविकांसाठी भक्तनिवास गोशाळा चालविली जाते.

उपयुक्त माहिती:

  • दिंडोरीपासून १४ किमी, तर नाशिकपासून ३८ किमी अंतरावर
  • दिंडोरीपासून आंबेवणी गावापर्यंत एसटीची सुविधा
  • आंबेवणी गावापासून एक किमी अंतरावर
  • खासगी वाहने आश्रमापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर ट्रस्टतर्फे दुपारी भाविकांना महाप्रसादाची सुविधा
  • मंदिर ट्रस्टतर्फे भक्तनिवासाची सुविधा
Back To Home