नागांचा नाथ व महादेवाचा अंश असलेल्या सोपीनाथ महाराजांवर विदर्भातील अनेक भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे. अकोला जिल्ह्यात सोपीनाथ महाराजांची तीन प्रसिद्ध मंदिरे आहेत. पातुर तालुक्यातीस दिग्रस व मळसूर यासोबतच मूर्तीजापूर तालुक्यातील कवठा सोपीनाथ येथील मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरामुळे या गावची ओळखही कवठा सोपीनाथ अशी झालेली आहे. येथील स्वयंभू मूर्ती सुपारीतून प्रगट झाल्याची आख्यायिका आहे. सोपीनाथ महाराजांच्या अन्य मंदिरांप्रमाणेच येथेही शेषनागाची पूजा केली जाते. या मंदिरात पुजाअर्चा केल्यास निपुत्रिक दाम्पत्यास अपत्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
‘सुपीनाथ’ किंवा ‘सुपोबा’ या नावानेही संबोधले जाणाऱ्या सोपीनाथ महाराजांची विदर्भात अनेक स्थाने आहेत. मळसूर हे त्यांचे मुख्य व स्वयंभू स्थान असल्याचे सांगण्यात येते. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये मळसूर येथील मंदिराची तसेच तेथे होणाऱ्या उत्सवांची माहिती देण्यात आली आहे. त्यावरून सोपीनाथ महाराजांना ‘सुपोबा’ या नावाने संबोधले जात असे व सुपोबा हा महादेवाचा अंश मानण्यात येत असे, हे स्पष्ट होते. शिवशंकरांच्या गळ्यात नाग असतो, त्या प्रमाणेच सोपीनाथ महाराजांच्या येथील मंदिरांतही सर्पमूर्ती आहेत.
या मंदिराच्या अख्यायिकेनुसार, सोपीनाथ महाराज सुपारीतून येथे प्रगट झाले. त्यानंतर या स्थानाचा आकार दिवसेंदिवस वाढत गेला. सुरुवातीला हे मंदिर छोटेखानी होते. कालौघात या मंदिराचे अनेक जीर्णोद्धार झाले. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
मूर्तिजापूर तालुक्यातील चिचखेड फाट्यापासून उत्तरेकडे तीन किमी अंतरावर कवठा सोपीनाथ हे लहानसे गाव आहे. या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. मंदिरासमोर खुला मंडप आहे. भाविकांच्या सुविधेसाठी त्यावर पत्र्याची शेड टाकलेली आहे. त्यापुढील प्रवेशद्वारातून मंदिराच्या छोटेखानी प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नागप्रतिमा व दीपकोष्टके आहेत. या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला प्रांगणात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती व त्रिशूळ आहे.
तीन पायऱ्या चढून उंच अधिष्ठानावर असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. हे गर्भगृह हेच येथील मूळ मंदिर होय. गर्भगृहात एका उंच वज्रपिठावर सोपीनाथ महाराजांची तांदळा स्वरूपातील मोठी शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीचा आकार काहीसा हत्तीच्या मुखाप्रमाणे भासतो.
मुख्य गर्भगृहाशिवाय या मंदिराच्या आवारात गणपती, विठ्ठल-रखुमाई व गजानन महाराज यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथे नागदेवतेचेही स्थान आहे. मंदिराच्या गर्भगृहावर वरच्या बाजूने निमुळते होत जाणारे उंच शिखर व त्यावर लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. वरच्या बाजूस द्विस्तरीय आमलक व कळस आहेत.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या मंदिरात आणल्यास विषाचा प्रभाव कमी होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सोपीनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. यावेळी अनेक भाविक येथे दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात. या मंदिरातील काडी घरात नेल्यास भूतबाधा होत नाहीत तसेच घरात साप येत नाहीत, अशी भाविकांची समजूत आहे. सोमवार हा सोपीनाथ महाराजांचा वार असतो. त्यामुळे या दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी असते. सोपीनाथ महाराजांना रोडग्यांचा नैवद्य दाखवण्यात येतो.
नागपंचमीच्या दिवशी आणि पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी येथे यात्रा असतात. त्यापैकी नागपंचमीला भरणाऱ्या यात्रेचे स्वरूप मोठे असते. विदर्भातील मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या या यात्रेसाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील भाविक दर्शनासाठी येतात. पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागतात. यावेळी सात-आठ तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भाविकांना सोपीनाथ महाराजांचे दर्शन घडते. या यात्रेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात प्रसाद तसेच विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने थाटली जातात. पोळा सणासाठी लागणाऱ्या साहित्यांची या सणासाठी, तसेच बैलांच्या शृंगारासाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकानेही येथे असतात. या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कारंजा, अमरावती, मूर्तिजापूर आदी आगारांतून विशेष बसेसही सोडण्यात येतात.