नागांचा नाथ व महादेवाचा अंश असलेल्या सोपीनाथ महाराजांचे प्रसिद्ध स्थान पातूर जिल्ह्यातील दिग्रस (बुद्रुक) येथे आहे. येथे शेषनागाची पूजा केली जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथे सुपारीवर प्रतिष्ठापना केलेल्या सोपीनाथ महाराजांच्या स्थानाचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. येथील पाच दिवसांची यात्रा विदर्भात सुप्रसिद्ध आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत देवाला ‘धरणे’ (साकडे) घालणारे शेकडो भाविक मंदिरानजीकच्या परिसरात राहुट्या बांधून पाच दिवस सहकुटुंब राहतात. यावेळी येथे जणू छोटे गावच वसते.
अकोला तालुक्यात सोपीनाथ महाराजांची अनेक स्थाने आहेत. मळसूर हे देवाचे मुख्य, स्वयंभू स्थान असल्याचे सांगण्यात येते. सोपीनाथ महाराजांना सुपीनाथ किंवा सुपोबा या नावानेही संबोधले जाते. ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अंड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये मळसूरच्या मंदिराची व त्यातील उत्सवांची माहिती देण्यात आली आहे. त्यावरून ११५ वर्षांपूर्वी सोपीनाथ महाराजांना सुपोबा या नावाने संबोधले जात असे व सुपोबा हा महादेवाचा अंश मानण्यात येत असे, हे स्पष्ट होते. महादेवाच्या गळ्यात नाग असतो, त्या प्रमाणेच सोपीनाथ महाराजांच्या येथील मंदिरातही सर्पमूर्ती आहेत.
दिग्रस (बुद्रुक) येथील महाराजांच्या स्थानाबाबत आख्यायिका अशी की अनेक वर्षांपूर्वी या गावातील भगतबुवा नावाची एक व्यक्ती सोपीनाथ महाराजांची निस्सिम भक्त होती. हे भगतबुवा नित्यनेमाने मळसूर येथे दर्शनासाठी जात. मात्र, कालांतराने वार्धक्यामुळे त्यांना तेथे दर्शनासाठी जाणे शक्य होत नसे. एके दिवशी सोपीनाथ महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला. ‘यापुढे तुला माझ्या दर्शनासाठी मळसूर येथे येण्याची गरज नाही. मीच स्वतः तुझ्याकडे येईन. तू गावात सुपारीच्या रूपात माझी प्रतिष्ठापना कर, तेथेच माझे कायम वास्तव्य असेल,’ असे सोपीनाथ महाराजांनी त्यांना सांगितले. भगतबुवांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर येथे सुपारीच्या रूपात सोपीनाथ महाराजांची प्रतिष्ठापना करण्यात आली. कालांतराने येथे छोटे मंदिर बांधण्यात आले. अलिकडेच केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
दिग्रस गावाच्या वेशीवर सोपीनाथ महाराज मंदिर स्थित आहे. मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर पुजासाहित्यविक्री करणारी अनेक दुकाने आहे. मंदिराभोवती असलेल्या तटभिंतीत मंदिराचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गजराज व वरच्या बाजूला असलेल्या पाच देवळ्यांमध्ये गणपती, दोन शिवपिंडी, एक नागप्रतिमा व गजानन महाराज यांच्या मूर्ती आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या फरसबंदी केलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रशस्त प्रांगणात अनेक प्राचीन व मोठे वृक्ष असल्यामुळे मंदिर परिसर सुंदर भासतो. तटभिंतींमध्ये आतील चारही बाजूला अनेक ओवऱ्या आहेत. मंदिरासमोरील चौथऱ्यावर गोमातेचे शिल्प व दीपमाळ आहे. सभामंडप व तीन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. संगमरवरी फरसबंदी असलेल्या या सभामंडपातील भिंतींमधील देवकोष्टकांत डावीकडे श्रीराम-सीता, राधा-कृष्ण यांची तर उजवीकडे संत ज्ञानेश्वर, श्रीविष्णू-लक्ष्मी, विठ्ठल-रखुमाई व संत तुकाराम यांच्या मूर्ती आहेत. या सभामंडपाच्या वितानावर, गर्भगृहांच्या दर्शनी भिंतीवर तसेच मंदिराच्या अंतर्गत भागात काचेची सुंदर कलाकुसर आहे. सभामंडपात पुढील बाजूला गर्भगृहांशेजारी आणखी दोन दरवाजे आहेत. त्यांतून भाविकांना गर्भगृहांभोवती प्रदक्षिणा घालता येते.
सभामंडपापुढे असलेल्या तिन्ही गर्भगृहांसमोर भाविकांच्या गर्दीचे नियोजन व्हावे यासाठी स्टीलचे रेलिंग आहे. या गर्भगृहांना महिरपी कमानीच्या आकाराची प्रवेशद्वारे आहेत. डावीकडील गर्भगृहात एका मोठ्या आयताकृती वज्रपिठावर गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर देवाच्या पादुका आहेत. मध्यभागी असलेल्या मुख्य गर्भगृहात आयताकृती वज्रपिठावर सोपीनाथ महाराजांचे स्वयंभू स्थान आहे. येथील त्यांची पाषाणमूर्ती शेंदूरचर्चित आहे. या मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. या स्थानाच्या मागील बाजूस पंचधातूच्या काही शेषनागाच्या मूर्ती आहेत. उजवीकडील गर्भगृहात गजानन महाराजांची मूर्ती आहे.
गणपती गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्या वर गणपतीची मूर्ती, सोपीनाथ महाराज गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्या वर शेषशाही विष्णू व लक्ष्मीमाता आणि गजानन महाराजांच्या गर्भगृहावर गजानन महाराजांची प्रतिमा आहे. मंदिराच्या छतावर चहुबाजूने कठडा व या तिन्ही गर्भगृहांवर तीन शिखरे आहेत. यापैकी सोपीनाथ महाराज यांच्या गर्भगृहावरील शिखर हे मुख्य व उंच आहे. या शिखरावर एकावर एक असे तीन आमलक व त्यावर कळस आहे. याशिवाय प्रांगणात हनुमान मंदिर, शारदा माता मंदिर, स्व. माधवजी महाराज समाधी मंदिर अशी लहान मंदिरे आणि मंदिर संस्थान कार्यालय आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील शेकडो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात. शारिरीक व्याधी होऊ नयेत, यासाठी देवाला चांदीच्या पत्र्याचा ‘विंचूकाटा’ अर्पण करण्याची येथे परंपरा आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला येथे आणल्यास ती बरी होते, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. नागपंचमीच्या दिवशीही येथे हजारो भाविक येतात. पंचक्रोशीतील अनेक शेतकरी या दिवशी आपल्या बैलांना घेऊन मंदिराभोवती पाच प्रदक्षिणाही घालतात.
रथसप्तमीनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येथे देवाचा विवाह सोहळा पार पडतो. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. या सोहळ्यानंतर पाच दिवसांनी सोपीनाथ महाराजांची यात्रा भरते. अकोला, वाशिम, बुलडाणा आदी जिल्ह्यांतून हजारो भाविक या यात्रेदरम्यान सोपीनाथ महाराजांचे दर्शन घेतात. या यात्रेदरम्यान मंदिराच्या दोन्ही बाजूंनी तसेच मागील भागातही तात्पुरत्या राहुट्या बांधून शेकडो भाविक पाच दिवस सहकुटुंब मुक्कामी असतात. यास धरणे धरणे असे म्हणतात. देवाचे धरणे धरल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मुक्कामादरम्यान रोडगे, वांग्याची भाजी तसेच वरणाचे सेवन केले जाते. दररोज सकाळी पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात देवदर्शन करता येते.