सोपानदेव समाधी मंदिर

सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे

महाराष्ट्राला शूरवीरांची आणि संतांची मोठी परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन हा संप्रदाय समृद्ध केला, असे अनेक संत होऊन गेले. या संतांनी सोप्या भाषेत या मातीत भक्तीचा प्रसार केला. याच संतपरंपरेतील महत्त्वाचे संत म्हणजे ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू संत सोपानदेव होत. सासवड शहरातील कऱ्हा आणि चांबळी नद्यांच्या संगमावर त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांचे हे समाधी स्थान आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या स्थानाच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल ‘ज्याची घडेना काशी। त्याने यावे सासवडाशी। जेथे गुप्त गंगा। सोपानाच्या पायाशी।।’ असे म्हटले जाते.

महाराष्ट्र भूमीतील आध्यात्मिक क्रांतीचे अध्वर्यू म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चार भावंडांचे नाव आदराने घेतले जाते. त्यापैकी संत सोपानदेवांचा जन्म शके ११९९ मध्ये झाला. त्यांनी आपले थोरले बंधू संत ज्ञानेश्वर महाराज यांना गुरू मानले होते. सोपानदेवांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शांत, संयमी आणि ज्ञाननिष्ठ होते. पौराणिक संदर्भांनुसार, या चार भावंडांना विविध देवतांचे अंश मानतात. त्यात सोपानदेवांना ब्रह्मदेवाचा अवतार मानले जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेचा गुह्य अर्थ प्राकृत भाषेत मांडला. त्याच परंपरेला सोपानदेवांनी ओघवत्या शैलीत पुढे नेले. त्यांनी वयाच्या १५-१६ व्या वर्षी भगवद्गीतेवर ७०० ओव्यांचा ‘सोपानदेवी’ हा ग्रंथ लिहिला. त्यांची भाषा साधी, सरळ आणि स्पष्ट आहे. त्यांनी ब्रह्मविद्येचे क्लिष्ट सिद्धांत सामान्य भक्तांना समजतील अशा सोप्या ओव्यांमध्ये गुंफले. या साहित्यासोबतच त्यांनी सुमारे ५० अभंगांची आणि सहा अभंगांच्या हरिपाठाची रचना केली. त्यांच्या साहित्यात पंढरीचा महिमा व गुरुकृपेचे महत्त्व प्रकर्षाने दिसते. त्यांनी ज्ञानाचा अहंकार बाजूला ठेवून केवळ भक्ती आणि समत्वावर भर दिला. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर बरोबर एका महिन्याने, मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके १२१८ रोजी सोपानदेवांनी सासवडमध्ये कऱ्हा नदीच्या तीरावर संजीवन समाधी घेतली. या प्रसंगी संत नामदेव, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई उपस्थित होते. नामदेवांच्या अभंगगाथेनुसार पांडुरंगाने या समाधीसाठी जागा निवडली आणि सोपानदेवांना अखेरचे स्नान घातले. वारकरी संप्रदायात संत सोपानदेवांना सोपानकाका असे म्हटले जाते.

काही पायऱ्या चढून एका दगडी बांधणीच्या महाद्वारातून समाधी मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. फरसबंदी प्रांगणात ओवऱ्यांचे बांधकाम आहे. प्रांगणात प्रथम नागेश्वर मंदिराचे दर्शन होते. सोपानदेवांचे समाधी मंदिर या नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे आहे. हे नागेश्वर मंदिर सोपानदेवांच्या समाधीपूर्वीपासून अस्तित्वात होते. नागेश्वर मंदिरासमोर एका चौथऱ्यावर काळ्या पाषाणात कोरलेली नंदीची मूर्ती आहे. नंदीच्या अंगावरील दागिने, पाठीवरील झूल आणि गळ्यातील घुंगूरमाळ कौशल्याने कोरलेली आहे. याशिवाय नंदीमंडपात हनुमानाची आणि गणपतीची प्रतिमा कोरली आहे. नागेश्वर मंदिर पूर्णतः दगडी बांधणीचे आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराच्या भिंतींवर बसवलेल्या शुभ्र संगमरवरी फरशांवर सोपानदेवांच्या ‘सोपानदेवी’ ग्रंथातील ओव्या कोरल्या आहेत. येथील स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्य असे की सभामंडपाच्या एका कोपऱ्यात हळू आवाजात बोलल्यास दुसऱ्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला ते स्पष्ट ऐकू येते. मात्र मध्यभागी असलेल्या व्यक्तीला काहीही ऐकू जात नाही. हे प्राचीन ध्वनीशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे. मुख्य समाधी मंदिरासमोर पाण्याचे एक मोठे कुंड आहे. त्याला भगीरथी कुंड म्हणतात. याबाबत अशी अख्यायिका आहे की सोपानदेवांच्या समाधीच्या स्नानासाठी पांडुरंगाने सर्व तीर्थांना येथे पाचारण केले होते. म्हणून या कुंडातील पाणी पवित्र मानले जाते. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना वीणामंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. दुमजली वीणामंडपात लाकडी स्तंभ आणि पत्र्याचे छत आहे. या मंडपात वारकरी परंपरेनुसार अखंड वीणावादन सुरू असते. येथील लाकडी खांबांवर सुंदर नक्षीकाम केले असून त्यावर पाने, फुले, वेली आणि पोपट अशी शिल्पे कोरली आहेत. या खांबांवर दुसऱ्या मजल्याचा लाकडी सज्जा आहे. वीणामंडपातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांमध्ये श्रीराम, सीता आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवले आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखेवर वेली आणि फुलांचे कोरीव काम असून ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात मध्यभागी संत सोपानदेवांची संजीवन समाधी आहे. ही समाधी काळ्या पाषाणाची आहे व ती चांदीच्या पत्र्याने आच्छादलेली आहे. समाधीवर सोपानदेवांचा चांदीचा मुखवटा ठेवलेला असतो. समाधीच्या पाठीमागील भिंतीतील कोनाड्यात भगवान श्रीकृष्णाची आणि शेजारी राधा-कृष्णाची लहान मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूला दत्त मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहावर निमुळते होत जाणारे उंच शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक स्तरावरील देवकोष्टकात विविध देवतांच्या आणि संतांच्या मूर्ती आहेत.

मंदिराच्या उत्तर बाजूला असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली दगडी चौथरा आहे. या ठिकाणाहून संत सोपानदेवांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी समाधी घेण्यासाठी प्रवेश केला, असे मानले जाते. या झाडाच्या शेजारीच ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवल्याच्या घटनेचे प्रतीक असलेले एक शिल्प आहे.

सोपानकाकांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली. यानिमित्ताने मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात समाधी सोहळा साजरा होतो. त्रयोदशीच्या मुख्य दिवशी दुपारी १२ वाजता समाधीवर पुष्पवृष्टी करून गुलालाची उधळण केली जाते. यानंतर सोपानदेवांची पालखी सासवड गावातून फिरवली जाते. आषाढी वारीच्या निमित्ताने सोपानदेवांची पालखी सासवड ते पंढरपूर असा पायी प्रवास करते. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सासवड हा महत्त्वाचा मुक्काम असतो. यावेळी सासवड शहराला उत्सवाचे स्वरूप येते. त्रिपुरारी पौर्णिमेला सोपानदेवांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या समाधी मंदिरात दररोज सकाळी साडेपाच वाजता काकड आरती होते. त्यानंतर पंचामृत पूजा, नैवेद्य आणि आरती होते. रोज सायंकाळी सात वाजता प्रवचन होते. भाविकांना दररोज सकाळी साडेपाच ते रात्री दहा या वेळेत समाधीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • सासवड बस स्थानकापासून १ किमी अंतरावर
  • पुणे शहरापासून ३० किमी अंतरावर
  • स्वारगेटपासून एसटीची सुविधा
  • स्वारगेट, कात्रज, हडपसर येथून पीएमपीएमएल बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
Back To Home