महाराष्ट्राला शूरवीरांची आणि संतांची मोठी परंपरा लाभली आहे. वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन या संप्रदायाला समृद्ध करण्याचे काम केले, असे अनेक संत आहेत. या संतांनी सोपी भाषा व रसाळ वाणीने या मातीत भक्तीचा मळा फुलविला. याच संतपरंपरेतील मानाचे संत म्हणजे ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू संत सोपानदेव.
पुण्यापासून ३० किमी अंतरावर सासवड या तालुक्याच्या ठिकाणी कऱ्हा आणि चांबळी नद्यांच्या संगमावर हे समाधी मंदिर उभे आहे. काहीसे उंचावर असलेल्या या मंदिर परिसरात प्रवेश करताच प्रथम नागेश्वर मंदिर दिसते. या मंदिराच्या भिंतींवर सोपान काकांचे व इतर संतांचे अभंग संगमरवरावर कोरले आहेत. या मंदिराच्या मागील बाजूस संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर आहे. समाधी मंदिराच्या समोर पाण्याचे एक मोठे कुंड पाहायला मिळते. या कुंडाला भगीरथी कुंड असे म्हटले जाते.
पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना वीणामंडप, मंडप व गर्भगृह अशी आहे. वीणामंडप लाकडी असून वर पत्र्याचे छत बांधण्यात आले आहे. मंडपाच्या लाकडी खांबांवर नक्षी कोरण्यात आली आहे. या मंडपामध्ये अखंड वीणा वादन सुरू असते. वीणा मंडपातून मंदिराच्या मुख्य मंडपात जाता येते. या मंडपात गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवडी आहेत. त्यात राम-सीता व विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहातील संत सोपानदेवांची संजीवन समाधी पाहिली की आपसूकच नतमस्तक व्हायला होते. काळ्या पाषाणातील समाधीवर सकाळच्या पूजेनंतर मुखवटा ठेवला जातो. समाधीमागील कोनाड्यात कृष्णाची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूला दत्त मंदिरही आहे. मंदिराच्या उत्तर बाजूला असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली एक दगडी चौथारा असून या ठिकाणाहून संत सोपानदेवांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी समधिस्त होण्यासाठी प्रवेश केला, असे म्हटले जाते. वारकरी संप्रदायात संत सोपानदेव यांना सोपान काका असे संबोधले जाते. त्यांनी अगदी लहान वयातच गीतेचे सार आत्मसात केले होते. प्रगल्भ बुद्धिमत्तेचा जोरावर त्यांनी आपले स्थान सिद्ध केले होते. संत सोपानदेवानी अनेक अभंग, ओव्या लिहून अजरामर केल्या आहेत. म्हणूनच ‘ज्याची घडेना काशी त्याने यावे सासवडाशी। जेथे गुप्त गंगा सोपानाच्या पायाशी’ असे म्हटले जाते.
सोपानकाकांनी सासवड येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी घेतली. यानिमित्ताने मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात समाधी सोहळा साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती असते. संत सोपानदेव महाराजांची पालखी ही सासवड ते पंढरपूर असा प्रवास करते. यावेळी संपूर्ण सासवड भक्तीत तल्लीन झालेले दिसून येते.
मंदिरात दररोज सकाळी ५.३० वाजता काकड आरती होते. त्यानंतर पंचामृत पूजा, नैवेद्य व आरती होते. रोज सायंकाळी ७ वाजता प्रवचन होते. भाविकांना दररोज सकाळी ५.३० ते रात्री १० या वेळेत येथील समाधीचे दर्शन घेता येते.